Sunday, 17 July 2016

राजिनामा

कचेरीतील कारकून अतिशय गरीब प्राणी. कधी कुणाला काही न बोलणारा ; उलट उत्तरं न देणारा; जणू काही वाचाहीनच. एखाद्या कामगाराकडे रोखून पहा, तो पण तुमच्याकडे तसाच रोखून बघेल; हमालाशी उद्धटपणे बोला, तो सरळ सामान टाकून चालू पडेल; एखाद्या भिकाऱ्याला हटका, तो तुमच्याकडे रागाने बघून जाईल. अगदी एखाद्या गाढवाला वाईट वागणूक दिली तर तो पण लाथा झाडेल. पण, गरीब बिचारा कारकून ! त्याला शिव्या घाला, लाथा मारा, तो यत्किंचितही राग दर्शवणार नाही. अगदी एखाद्या साधूसंतालाही शक्य नसेल एवढा ताबा त्याचा स्वतःवर असतो. मानवजातीचे सर्वोत्तम गुण - समाधान, सहनशीलता व आज्ञाधारकपणा –  यांची जणू मूर्तीच ! 
 अगदी भग्नावशेषांनाही त्यांचा एक वैभवशाली इतिहास असतो. दिवाळीच्या रात्री ते ही दिव्यांनी उजळतात, पावसाळ्यात हिरवळीने नटतात - निसर्गाच्या बदलत्या रूपाचं प्रतिबिंब ती दर्शवतात. पण गरीब कारकून कधीच बदलत नाही; त्याचा म्लान चेहरा हास्याने कधी उजळत नाही, की रेताडासारख्या रुक्ष आयुष्यात पावसाच्या सरींनी सुखाचा शिडकावा होत नाही. 
लाला फतेचंद अशांपैकीच एक कारकून. माणसाचं नाव त्याचं नशीब ठरवत असं म्हणतात. पण लाला फतेचंदच्या बाबतीत हे अगदी खोटं ठरलं होतं. नावाचा अर्थ जरी `विजयी' असला तरी त्याला `हारचंद' म्हटलं असतं तरी काही अतिशयोक्ती झाली नसती. कचेरीत, मित्रांमध्ये सर्वत्र त्याच्या नशिबी हारच आली. आयुष्यभर तो फक्त अडचणी व निराशेशीच  झगडत राहिला.
फतेचंदला मुलगे नव्हते, फक्त तीन मुलीच. त्याला भाऊही नव्हते, होत्या फक्त दोन मेहुण्या. गाठीशी पैसा तुटपुंजा असला तरी हृदयाचा खजिना सोन्याने भरलेला. दयाळूपणा व सहनशीलतेचं जणू मूर्तिमंत रूपच. अनेकांकडून फसवणूक झाल्यामुळे मनमोकळं बोलावं असा जवळचा कुणी मित्र ही नव्हता. तोळामासाची प्रकृती, वयाच्या बत्तिसाव्या वर्षीच डोक्यावरचे अर्धे केस पिकलेले, पचनशक्तीही डोळ्यांप्रमाणेच अतिशय नाजूक, निस्तेज वर्ण, बसलेली गालफट, पाठीला पोक व कसलीच हिंमत नसलेलं काळीज - असा हा फतेचंद रोज सकाळी नऊ वाजता कचेरीत जायचा आणि संध्याकाळी सहाला घरी परतायचा. संध्याकाळी परत बाहेर पडायची त्याच्यात ताकतच नसायची. बाहेरच्या जगात काय चाललंय याची त्याला खबरबतही नव्हती. पूर्ण आयुष्य त्याच कचेरीशीच निगडित होतं. नोकरी जायची भीती त्याला कायम पोखरत राहायची. जातीधर्म, गोरगरीब या कशाचंच त्याला सोयरसुतक नव्हतं. त्याला कला, वाङ्मय, नाटक,सिनेमा, खेळ कशातही काडीचा रस नव्हता. तो पत्ते कधी खेळाला होता हे ही त्याला आठवत नव्हतं. 

     हिवाळ्याचे दिवस होते, आकाशात थोडे ढग जमले होते. फतेचंद घरी आला तेव्हा दिवेलागण झाली होती. कचेरीतुन आल्या आल्या तो कधीच कुणाशी काही बोलत नसे. आधी फक्त पंधरा - वीस मिनिटं शांत पडून राहायचा आणि मग बोलायचा. त्या संध्याकाळी तो असाच शांतपणे पडलेला असताना कुणीतरी त्याला हाक मारली. धाकटी मुलगी कोण आलंय बघायला बाहेर गेली तर कचेरीतुन कुणी निरोप घेऊन आल्याचं समजलं. शारदा आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भांडी घासत होती.
``काय हवंय विचार त्यांना, हे आत्ताच कचेरीतून आलेत; परत बोलावलंय का ?''
``साहेबानी त्यांना तात्काळ यायला सांगितलंय. काही तातडीचं काम आहे.''
``काय आहे ?'' फतेचंदनी त्याचं मौन सोडलं.
``काही नाही कचेरीतला शिपाई '' शारदा उत्तरली.
``कचेरीतला शिपाई ? साहेबांनी बोलावलं की काय ? ''
``तसा निरोप घेऊन तो आलाय. कसले हे साहेब तुमचे ? नेहमी तुम्हाला बोलावून घेत असतात. आत्ताच तर घरी आलात. परत कशाला बोलावलंय ? सांगा, म्हणावं नाही येत. फार तर काय, नोकरीवरुन काढून टाकतील; अजून काय वाईट करू शकणार ? ''
``बघतो का बोलावलंय ते. माझ्या मेजवरची सगळी कामं मी आटपून आलो होतो. पटकन बघून येतो''
``जायच्या आधी जरा काही खाऊन तरी जा. एकदा त्या शिपायाशी बोलायला लागलात की सगळं विसराल.''  शारदा फराळाचं काही घेऊन आली.
``मुलींना खायला काही दिलंस की नाही ?''  फराळाच्या बशीकडे बघत फतेचंदनी विचारलं.
``हो दिलं, तुम्ही खा जरा ''
तेवढ्यात त्याची धाकटी मुलगी आली. शारदाने तिच्याकडे रागाने बघत फटकारले, `` का आलीस इथे माझ्या डोक्यावर बसायला ? जा, बाहेर खेळ जा ''
``कशाला रागावतेस तिला ? '' फतेचंदनी विचारले. ``चुन्नी, हे घे, खा .''
चुन्नीनी घाबरून आईकडे बघितलं आणि बाहेर पळाली.
``कशाला बाहेर पिटाळलीस तिला ? ''  फतेचंदनी नाराजी दाखवली.
``आता या बशीत आहेच कितीस असं ? तिला दिलं असतं तर बाकीच्या दोघी नसत्या आल्या वाटा मागायला ? ''
तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या शिपायांनी आवाज दिला , ``मला उशीर होतोय ''
``आत्ता नाही येऊ शकत म्हणून का नाही सांगत त्याला ?'' शारदानी विचारले
``असं कसं सांगू ? नोकरीचा प्रश्न आहे ''
``म्हणजे काय ? नोकरी पायी जीव का देणार आहात ? चेहरा पाहिलाय आरशात ? सहा महिने आजारी असल्यासारखे दिसताय ''
फतेचंदनी कांही घास घेतले, पेलाभर पाणि प्यायला आणि बाहेर पडला. शारदा बनवत असलेले पान तसेच राहिले.


            ``बाबुजी खुप वेळ घेतलात तुम्ही. आता लवकर चला नाही तर जाम ओरडतील ते तुम्हाला''
``आता ते रागावोत अथवा खरडपट्टी काढोत, मी काही यापेक्षा भरभर चालु शकत नाही. कुठे त्यांच्या बंगल्यावर आहेत का ते ?''
``आता या वेळेस काय ते कचेरीत असणार ? ते काय कुणी ऐरेगैरे आहेत ? मोठे महाराज ते !''
शिपाई झपाझप चालत होता. फतेचंदला काही भरभर चालत येई ना. थोड्यात वेळात त्याला धाप लागली. पाय भरून येई पर्यंत तो पाऊले टाकत राहिला. शेवटी पाय साथ देईनासे झाले. तो घामाने थपथपला, डोकं गरगरू लागलं आणि डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली.
``बाबू चला लवकर '' शिपाई ओरडला.
``तू जा, मी येतो मागून, '' तो हातात डोकं धरून रस्त्याच्या बाजूला कठड्यावर बसला व धाप टाकू लागला. शिपाई पुढे निघून गेला.
`` हा नाठाळ माणूस पुढे जाऊन साहेबांना भलतंच काही सांगायचा '' फतेचंद घाबरला. त्राण एकवटून तो उठला आणि परत चालू लागला.
फतेचंद साहेबांच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा साहेब व्हरांड्यात येरझाऱ्या घालत होते. शिपाई दृष्टिस पडताच ते डाफरले, ``एव्हडा का वेळ लागला ?''
``काय सांगू साहेब ? फतेचंद बाबूंनी एवढा वेळ घेतला. मी धावतच आलो ''
``काय म्हणाले बाबू ?''
तेव्हड्यात फतेचंदने अंगणाच्या कुंपणातून आत डोकावले. साहेबांना सलाम करून त्यांच्या समोर मान झुकवून उभा राहिला.
``कुठे होतात इतका वेळ ?'' साहेब गुरकले.
``साहेब, नुकताच कचेरीतून घरी पोचलो होतो. शिपाई निरोप घेऊन आला तसा लगेच निघालो''
``खोटं बोलताय तुम्ही. मी एक तास इथे उभा आहे ''
``साहेब, मी खोटं नाही बोलत. मी भरभर नाही चालू शकत. शिपायानी निरोप दिल्याक्षणीच मी निघालो''
``गप्प बस. गाढवा, मी तासभर वाट पहातोय. कान धर तुझे '' साहेब गरजले
``हुजूर, गेली दहा वर्षे मी तुमची चाकरी करतोय. मी कधीच .....
``चूप ! कान धर तुझे ''
``पण मी काय केलं ?''
`` चपरासी, या गाढवाचे कांन ओढ; नाही तर मी तुला झोडीन ''
``साहेब, मी येथे काम करायला येतो, मार खायला नाही. मलाही काही मानसन्मान आहे. तुमची नोकरी ठेवा तुमच्याकडे. साहेब, तुम्ही मला काही शिक्षा दिलीत तर चालेल पण मी असा दुसऱ्याचा अनादर करणार नाही''
साहेबांचा राग अनावर झाला. ते त्यांची चालण्याची काठी घ्यायला गेले. साहेबांचा रागरंग पाहून शिपायाने पळ काढला. फतेचंद तिथेच उभा राहिला. शिपाई आसपास नाहीसे पाहून साहेबानींच फतेचंदचे कान पकडले व त्याला गदगदा हालवला, ``माझी आज्ञा न पाळण्याच धाडसच कसं करतोस तू ? आत्ताच्या आत्ता कचेरीत जाऊन फाईल घेऊन ये.''
``कुठली फाईल आणू साहेब?'' फतेचंदनी नम्रपणे विचारले.
``फा sss ईल , फाईल अजून काय ? बहिरा आहेस ? ऐकू नाही येत ?मी फाईल मागतोय. ''
``कोणती फाईल पाहिजे आपल्याला ? '' फतेचंदनी धीर एकवटून विचारले ?
``मी मागतोय ती फाईल. तिच ती फाईल. घेऊन ये पटकन.''
फतेचंदचे अजून काही विचारण्याचे धाडस झाले नाही. एक तर साहेब अतिशय तापट, त्यात सत्तेची व दारूची धुंदी ! जर त्यांनी छडीने मारले असते तर फतेचंद काहीही करू शकला नसता. तो गुपचूप कचेरीत जाण्यासाठी चालू पडला.
``जा पटकन ; धाव '' साहेब ओरडले. 
``साहेब मला धावता येत नाही ''
``फारच आळशी झालायस तू. थांब , तुला दाखवतो कसं धावतात ते. '' साहेबानी फतेचंदला जोरात ढकललं. ``धाव, आता तरी धावतोस की नाही ?''
साहेब त्यांची छडी आणायला गेले. कचेरीतला कारकून झाला म्हणून काय झालं? फतेचंद शेवटी माणूसच. जर तो हट्टाकट्टा असता तर साहेबांचं नरडंच धरलं असतं, हातात एखादं शस्त्र असतं तर वार केला असता ; पण त्या क्षणी मार खाण्यापलीकडे त्याच्या नशिबी काहीच नव्हतं. आता आपल्याला मार पडणार हे ओळखून फतेचंद पटकन फाटकातून बाहेर पडून रस्त्याला लागला.


         फतेचंद कचेरीत गेलाच नाही. जाऊन करणार तरी काय ? साहेबानी काय फाइलच नाव सांगितलं नव्हतं ; दारूच्या नशेत नाव सांगायलाच विसरले होते. फतेचंद हळूहळू पाय ओढत घराकडे निघाला -जणू अपमानाच्या बेड्या पायात पडल्या होत्या. मानलं की फतेचंद साहेबांपेक्षा खूपच कमजोर होता; शिवाय बचावासाठी हातातही काही नव्हतं. पण उलट उत्तर द्यायला काय हरकत होती ? निदान पायात बूट तर होते ? ते फेकून मारायला काय हरकत होती ? का एवढा अपमान सहन केला ? पण काही इलाज ही नव्हता. समजा रागाच्या भरात गोळी वगैरे मारली असती तर त्याचं काय गेलं असतं ? फार तर काय एक - दोन महिने तुरुंगवास झाला असता, कदाचित दोन चारशे रूपये दंड भरावा लागला असता. पण कुटुंबाचा सत्यानाश झाला असता. या जगात तो सोडून अजून कुणी होतं ज्यांनी त्याच्या बायको व मुलींची काळजी घेतली असती ? कुणाच्या तोंडाकडे  पाहिलं असतं त्यांनी ? रस्त्यावर आल्या असत्या. कुटुंबाला पोसण्याएवढा पुरेसा पैसा त्याच्याकडे असता तर आज एवढीं बेइज्जती सहन करायला लागली नसती. एक तर जीव तरी गेला असता नाही तर त्या राक्षसाला धडा तरी शिकवला  असता. फतेचंदला स्वतःच्या जिवाची पर्वा नव्हती. एवीतेवी आयुष्यात असं काय मोठंस  सुख होतं ? काळजी होती फक्त कुटुंबाची ज्यामुळे  तो एवढा कच खात होता. 
आयुष्यात प्रथमच फतेचंदला आपल्या शारीरिक दुर्बलतेचं फार वाईट वाटलं. जर त्यानी पहिल्यापासून तब्येतीची नीट काळजी घेतली असती, रोज थोडा व्यायाम केला असता, लाठी चालवायला शिकला असता तर आज काय त्या सैतानाची हिम्मत झाली असती फतेचंदचे कान पकडायची ? डोळेच फोडले असते त्याचे. घरातून निदान एक सुरी तरी बरोबर आणायला हवी होती. काहीच नाही तर चार सहा लगावून द्यायला हव्या होत्या - काय जेलबील मध्ये जायचं ते नंतर बघता आलं असतं.
पुढे पुढे चालता चालता फतेचंदला आपल्या भित्रेपणाचा व नेभळटपणाचा जामच संताप येऊ लागला. साहेबांना दोन चार थपडा दिल्या असत्या तर होऊन होऊन काय झालं झालं असतं ? त्यांचे नोकर सगळे आपल्यावर तुटून पडले असते आणि सगळ्यांनी धरून मारला असता. पण निदान साहेबांना हे तरी समजलं असतं की विनाकारण गरीब निरपराधी माणसाला त्रास देणं, अपमानित करणं शक्य नाही. समजा तो आज मेला तर मुलं उघड्यावर पडणार. उद्या जरी मेला तरी परिस्थिती काय अशी बदलणार ? मग आजच का नाही ? या विचाराने फतेचंदला अचानक जामच जोर आला. तो अपमानाचा बदला घ्यायला चार पावलं परत पण गेला; पण परत विचार केला -  आता काय उपयोग ? जो काही अपमान व्हायचा तो झालाच. आणि काय माहीत साहेब बंगल्यावर असतील की नाही; नाही तर क्लबवर गेले असायचे. फिरून एकदा शारदाच्या अगतिकतेचा विचार त्याच्या मनाला शिवाला. मुलींच्या पोरकं होण्याच्या विचाराने त्याला पूर्णच परावृत्त केलं. तो परत घराच्या दिशेने वळला.  
घरी गेल्या गेल्या शारदानी विचारले, ``कशाला बोलावलं होतं ? एवढा का वेळ लागला ? ''
``काही नाही , जाम दारू प्यायला होता; शिव्या दिल्या, अपमान केला. परत परत `उशीर का केला ' च पालुपद लावून बसला. हरामखोरानी शिपायाला माझे कान धरायला सांगितले.
``चपलेने मारला नाही त्याला ?'' शारदा फुत्कारली.
शिपाई आमचा भला माणूस. त्यानी सरळ सांगितलं - साहेब, हे काही माझ्याच्यानी होणार नाही; भल्या माणसांना अपमानित करायला काही मी नोकरी घेतली नाही - आणि  सरळ रामराम ठोकून तो चालू पडला.
``चांगलाच धीराचा निघाला. तुम्ही पण का नाही साहेबांची कान उघाडणी केलीत ? ''
``केली तर; सोडतो की काय ? त्यांनी काठी आणली , मी बूट काढून तयार. त्यांनी काठीनं मारलं ; मी बुटांनी''
``उत्तम ! त्यांची लायकी दाखवलीत त्यांना''.
``चांगलाच अवाक झाला तो ''
``चांगलंच केलंत. पुरा झोडूनच यायचंत त्याला. मी असते तर जीवच घेतला असता.''
``मारून तर आलोय; आता परिणाम भोगावे लागणार. बघु  काय होतंय ते. नोकरी तर जाईलच , कदाचित तुरुंगातही जावं लागेल ''
``काय म्हणून तुरुंगात जायचं ? न्याय वगैरे काही आहे की नाही ? त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या , काठीने मारलं.''
``त्याच्या पुढे माझं कोण ऐकणार ? कोर्ट पण त्याचीच बाजू घेईल ''
``झाली तर झाली, बघू. पण या पुढे कोणत्याच साहेबाची कारकुनाला शिवीगाळ करण्याची हिम्मत होणार नाही. खरं तर तुम्ही त्यानी शिवी दिल्यादिल्या मुस्कटात ठेवून द्यायला हवं होत ''
``मग तर त्यांनी मला गोळी घालून ठारच केलं असतं''
``तेव्हाच तेव्हा पाहिलं असतं ''
``हो पण मग तुमचं काय झालं असतं ? कुठे गेला असतात ? ''
``परमेश्वराची इच्छा ! इज्जत जास्त महत्वाची. कुटुंबासाठी स्वत्वाची  का किंमत द्यायची ? तुम्ही निदान त्या सैतानाला मारून तरी आलात; मला तुमचा अभिमान आहे. त्याला प्रतिकार न करता मार खाऊन, अपमानित होऊन तसेच आला असतात तर तुमचं तोंडही मला पाहावंसं वाटलं नसतं. बोलून दाखवलं नसतं तरी तुम्ही मनातून अगदी पार उतरला असतात. आता जे काही वाट्याला येईल त्याला आनंदानी तोंड देईन. अरे ! हे काय ? कुठे निघालात ? ऐका तर जरा. आता परत कुठे चाललात ?''
झपाटल्यासारखा फतेचंद घराबाहेर पडला. शारदा हाक मारत राहिली. फतेचंद परत साहेबांच्या बंगल्याकडे निघाला - धडधडत्या उराने नाही तर ताठ मानेने. चेहऱ्यावर ठाम निर्धार दिसत होता ; पायात आता बळ आलं होतं
आता त्याचा पूर्ण कायापालट झाला होता. एक गरीब नाडलेल्या अशक्त कचेरी कारकून ऐवजी तो आता एक ठाम निर्धार असलेला हिंमतवान तरुण झाला होता. साहेबांच्या बंगल्यावर जायच्या आधी त्यानी  मित्राकडे जाऊन एक काठी घेतली.


        रात्रीचे नऊ वाजले होते. साहेबांचं जेवण चालू होतं. फतेचंद त्यांचं जेवण होई पर्यंतही थांबला नाही. वाढपी खोलीतून बाहेर पडल्या पडल्या  फतेचंद दाराआडून आत घुसला. पूर्ण खोली दिव्यांनी झगमगली होती. जमिनीवर उंची गालिचा हातरला होता. फतेचंद आयुष्यात प्रथमच एवढा उंची गालिचा बघत होता. ``तुझी आत यायची हिम्मत कशी झाली ? चालता हो'' रागाने बघत साहेब ओरडले.
``तुम्हीच मला फाईल आणायला सांगितलं होतत. ती घेऊन आलोय. जेवण आटपा, मग दाखवतो. सावकाश जेवा , कदाचित हे तुमचं शेवटचं जेवण असेल तेव्हा पोटभर जेवून घ्या ''
रागानी आणि भितीनी साहेबाची बोलती बंद झाली. त्याचा थरकाप उडाला, तो समजून चुकला की  फतेचंद मरीन अथवा मारीन अश्या निर्धारानीच आलाय. फतेचंदच हे रूप त्याला नवीनच होत. हा जशास तस उत्तर द्यायच्या तयारीनी आलाय हे साहेबानी ओळखलं. समोरची व्यक्ती सहन करते , प्रतिकार करत नाही तो पर्यंत आपण वाघ असतो. कुत्र्यालाही हाडहाड करा , दगड मारा , लाथ मारा; तो शांतपणे ऐकून घेतो तो पर्यंत ठीक ; एकदा का तो चवताळून अंगावर गुरकावत आला की आपली पळताभुई थोडी होते. फतेचंद हातात काठी घेऊन दबा धरून उभा आहे; एक पण वेडावाकडा शब्द आणि आपल्या डोक्यात काठी हे चतुर साहेबानी ओळखले. जो मारतो त्याला मार खाण्याची भीती असतेच. प्रतिकारात  आपण सरस ठरलो, अधिकाराचा वापर करून याला जेलमध्ये टाकला तरी थोडा फार मार खावा लागेल शिवाय नाच्चकी होईल ती वेगळीच. सारासार विचार करून साहेबानी गोडीगुलाबीने घ्यायचे ठरवले. ``अरे तुम्ही चिडलेले दिसताय. मी चुकून तुम्हाला काही कमी अधीक बोललो का ? ''
``अर्ध्या तासापूर्वीच तुम्ही माझे कान धरलेत, वेडीवाकडी शिवीगाळ केलीत. लगेच सगळं विसरलात ?''
``मी काय तुमचे कान पकडले? हा हा हा .. हा काय विनोद ? मी काय वेडा आहे असं करायला ?''
``मग काय मी खोटं बोलतोय ? शिपाई साक्षी आहे , तुमचे नोकर सगळे बघत होते''
`` कधी झालं हे सगळं ?''
``अर्ध्या तासापूर्वी. मला निरोप देऊन बोलावून घेतलंत आणि आल्यावर काहीही चुकी नसताना माझे कान धरलेत आणि मला मारलं''
``बाबूजी, आज मला जरा थोडी जास्तच झाली होती त्यामुळे मला काहीच आठवत नाही ''
``तुम्ही नशेत मला मारलं असतत तर मी मेलो असतो. नशेत काहीही केलं की माफ का ? आता मी पण नशेत आहे. आता मी काय सांगतो ते ऐका; कान धरा आणि वचन द्या की या पुढे तुम्ही कुठल्याच निरपराध माणसाला वाईट वागणूक देणार नाही. कान धरा नाही तर मी तुमचे कान धरतो. हलू नका. इथून उठण्याचा प्रयत्न केलात तर मी ही काठी तुमच्या डोक्यात घातलीच समजा, मग डोकं फुटलं तर मी जबाबदार नाही. कान धरा ! ''
साहेबानी हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, ``अरे वा, तुमचीपण विनोदबुद्धी कमालीची आहे. जर मी  तुम्हाला काही कमी अधिक बोललो असेल तर क्षमा मागतो.''
``अ हं, ते काही नाही, कान धरा '' काठी उगारत फतेचंदनी हुकूम सोडला.
साहेबाला अपमान असह्य झाला. फतेचंदच्या हातातली काठी हिसकावून घेण्याच्या उद्देशाने तो पटकन उठला. फतेचंद सावध होताच. साहेब उठल्याउठल्या  त्यानी साहेबाच्या डोक्यात काठी हाणली. साहेब तिरमिरला; डोकं हाताने दाबत तो ओरडला, ``तुला नोकरीवरून काढून टाकला ''
``मला त्याची पर्वा नाही.आज तुम्हाला कान धरून कुठच्याही भल्या माणसाला परत कधी वाईट वागणूक देणार नाही असं वचन दिल्याशिवाय सोडणार नाही.''
फतेचंदनी परत काठी उगारली. दुसऱ्या तडाख्याने कवटीच फुटेल या भीतीने साहेबानी पटकन दोन्ही हात कानांवर ठेवले , `` बास ? झालं समाधान ? ''
``म्हणा, परत कधी कुणाला शिवीगाळ करणार नाही .''
``कधीच नाही; वचन देतो''
``ठीक, जातो मी आता. आजपासून मी नोकरीचा राजीनामा दिला. माझ्या राजीनाम्यात मी कारण देणार आहे की तुम्ही मला शिवीगाळ केलीत म्हणून मी राजीनामा देत आहे.''
``तुम्ही राजीनामा का देताय ? मी काही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकत नाहीये.''
``तुमच्या सारख्या वाईट माणसाची चाकरी मला करायची नाही .''

बंगल्यावरून फतेचंद शांतपणे घराकडे निघाला. एवढा आनंद त्याने या पूर्वी कधीच अनुभवाला नव्हता. आज अनुभवत होता तो आनंद जीवनातल्या पहिल्या वाहिल्या फत्तेचा !


(हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या `इस्तीफा ' या कथेचा अनुवाद)

Monday, 4 July 2016

युगप्रवर्तक बनो

    

मौत से हारनेवाले तो आम होते है
जिन्हें मौत ना हारा सके वो ख़ास होते है
जीत तो मौत की निश्चित है
पर जीत उसकी सिमित है
मिट्टी को मिट्टी मे मिलाना ही मौत की जीत है
अनमोल कार्य से तो मौत भी शिकस्त खाती है
ख़ुद का सपना पुरा करने हर कोई झगड़ता है
युगप्रवर्तक का सपना साकार करने पिढियॉ जुट जाती है
युगप्रवर्तक कार्य करने की बात सोच लो
मौत की छोड़ो कुछ ख़ास बननेवाली बात सोच लो

Wednesday, 1 June 2016

लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. लायकी नसणाऱ्याना तर पहिली. लायकी असून प्रसिद्धीपरान्मुख राहणारे थोडेच. ते खरे कर्मवीर. पण वाचाळवीर बनून सवंग प्रसिद्धी मिळवणार्यांचा बाजारच जास्त. सध्या चर्चेत असलेले तन्मय भट हे त्यातलेच एक. हशा आणि टाळ्या ( हल्लीच्या भाषेत लाईक व फालोअर्स) घेण्याची पण एक नशा चढते आणि नशेत सद्सद्विवेक बुद्धीचा अभाव व तोल जाऊन मर्यादा उल्लंघन होणे ओघाने आलेच. अश्या बेताल वक्तव्यांची कितपत नोंद घ्यायची आणि त्याला कितपत महत्व द्यायचं याची सुबुद्धी इतरांनी तरी दाखवावी. रस्त्यावरून एखादा वेडा जर वेडीवाकडी बडबड करत चालला असेल तर कुणी त्याची दखल घेते का ? मानसिक संतुलन ढळलय म्हणून दुर्लक्ष करतोच न ? थोडे काही असतात जे त्यातून स्वताची करमणूक करून घेतात. पण अशांची कीवच करावाशी वाटते कारण त्यांचेही मानसिक आरोग्य प्रश्नार्थक वाटते. तन्मय भट व त्यांचा सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांच्या वरचा व्हिडीओ चवीने पाहणारे याच गटातले. (आक्षेप कुणाची खिल्ली उडवण्यावर नाही. अत्रे तर त्यात अग्रेसर होते.  पण पातळी सोडून बेताल होणे केव्हाही आक्षेपार्ह मग ते कुणीही का असे ना.) अशा व्यक्ती व त्यांचे कार्यक्रम डोक्यावर घेतले जाणे  हे एकंदरीत सामाजिक अभिरुचीच्या घसरगुंडीचे द्योतक होय. दुर्दैवाची गोष्ट अशी कि या सर्व चर्चांना प्रसिद्धी माध्यमे जास्त हवा देतात - रकाने भरवायला व टी आ र पी वाढवायला ! 
तन्मय भट यांनी सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांची माफी मागो अथवा न मागो ; फरक काहीच पडत नाही. त्या दोघांनी याची दखलही न घेण योग्यच . कर्तुत्वाच्या जोरावर प्रसिद्धी व सन्मान मिळतो  तेव्हा स्तुती सुमनांच्या जोडीला कधी पदरात निंदेचे व आसुयेचे निखारही येतात याची जाणीव असण्या एवढे प्रगल्भ व संस्कारी दोघेही आहेत.  तन्मय भट यांचा सध्याचा पराक्रम पाहता  सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांनी एक जन्मात जो कर्तुत्व पहाड उभा केलाय तो तन्मय भट यांना सात जन्मात तरी जमेल का असा प्रश्नच पडतो.

महा दुर्दैव असे कि ज्यांच्या हातात देशरथाचे सारथ्य दिले ते राजकीय पुढारीही या अश्या गोष्टींची दखल घेतात, देशाचे इतर महत्वाचे मुद्दे सोडून ! शेवटी ते हि सवंग लोकप्रियतेला हपापलेले वाचाळवीरच !    

Friday, 11 December 2015

मॅगी कळा जाहिरात कला

 noodles : Instant noodles. Texture. Close up.   आली बाई एकदाची परत. हुश्श ! 

                     चला, केवढा मोठा प्रश्ण सुटला.

अगदी झोकात ऐटीत मोठा भाव वधारून सर्वत्र विराजमान झाली.
हो ! भाव वधारणार नाही तर काय ? आगमनाची दवंडी नको पिटायला ? त्या आधी    ` वी मिस यु ' चा घोषा लावून झाला. (जणू काही सर्वत्र उपासमारच चालली होती. ) ह्या सगळ्याचे पैसे कुठून येणार ?   सगळ्यांच्या खिशात हात नको घालायला ?    पण कुणाचं काही म्हणण ? छे छे ! उलटा सर्वत्र आनंदीआनंद; अगदी दिवाळी आल्याचा झाला नसेल इतका आनंद. साहजिकच म्हणा. `खुशियो की रेसिपी ' न ती ! हो मॅगीच ती ! भारतातील सगळ्यात प्रसिद्ध व यशस्वी फूड ब्रान्ड.  

काही महिन्यांपूर्वी संध्याकाळी घरी आले तर मुलीचे ८-१० मित्रमैत्रिणीं जमलेले. तसे नेहमीच येतात पण आज जरा मूड थोडा वेगळा दिसला - तोंड जर पडलेली.
मी अवाक. रिझल्ट प्रकरण पूर्वीच आटपल होते. कॉलेज सुरु व्हायला पण अजून ५-६ आठवडे बाकी. मग ह्याचं काय बर बिनसले ?
तेव्हड्यात एकजण बोलला ``शी यार, माझा अमेरिकेत एम एस करायला जायचा एकमेव आधाराचा धागा तुटला .''
`ऑ ! हे जी आर ई  तर या वर्षी किवा पुढच्या वर्षी देणार. मग आत्ताच शस्त्र का टाकली ? ''
``आता झटपट जेवणाला दुसरा काही पर्याय आहे का, मॅगी सोडून ? "
आता मामला लक्षात आला. मॅगीच्या अस्तित्वावर गदा म्हणजे या पिढीच्या जीवन मरणाचा प्रश्ण. थेट पोटाचाच प्रश्ण. साधारण या वयोगटातील ( १५-२० वर्षे ) मुलांचे बालपण आणि मॅगी यांची नाळ एकदम घट्ट जुळलेली ! बालपणी उमटलेले काही ठसे पुसणे कठीणच. वर्षनुवर्षे ``मम्मी भूख लगी " म्हणणाऱ्या मुलांना ``बस दो मिनिट " म्हणत गरमागरम मॅगी देणारी सुपर माँम अन मान डोलवत मॅगीचा गुंतावळा तोंडात खेचून घेणारी मुल, वर `फास्ट टु कुक, गुड टु इट' , ` टेस्ट भी, सेहत भी ची ग्वाही.  रोज अगणित वेळा टीव्ही वर दिसणारी जाहीरात. या मॅगीच्या गुंतावळ्यानी एकही घर गुंडाळायचे सोडले नाही. आता मॅगी हद्दपार होतेय म्हटल्यावर यांच्या मेदुचा भुगा !
``अरे एवढच ना? आपल्याकडे आहेत ना टू मिनिट पर्याय - उपमा , पोहे , डोसा. एवढ टोक कुठे गाठताय ? "  इती मी.
मुलांच्या तोंडावर पटत पण वळत नाही असे भाव.
काही महिन्यांपूर्वी मॅगी मध्ये लेडचे प्रमाण  मान्यताप्राप्त प्रमाणापेक्षा जास्त आढळल्या मुळे बंदी घालण्यात आली होती. पाच महिन्यात काय गुंतावळे झाले नाहीत ? करोडोंच्या नुकसानीचे दावे , आरोप प्रत्यारोप, कुणाच्या नोकरीवर गदा तर कुणाचे उखळ पांढरे ! कंपनीने ज्या लॅब मध्ये परीक्षण झाले त्यांच्याच  विश्वसनीयते बाबत प्रश्न उपस्थित केला आणि कोर्टाने त्या लॅब व त्यांचे रिपोर्ट विश्वसनीय नसल्याचे मान्य करून मॅगी सुरक्षित असल्याचे मान्य केले. झालेबंदी उठली.
आता पुन्हा नव्याने पदार्पण. वर ग्वाही, `तुमची मॅगी सेफ होती आणि आहे' . झाले ! पुन्हा मॅगी घराघरात; नव्हे अगदी घरपोच सुद्धा ! घरबसल्या ऑर्डर आणी मॅगी घरात. स्नॅपडील वर म्हणे पाच मिनिटात साठ हजार `मॅगी वेलकम कीट ' विकले गेले.
एकच गोष्ट परत परत सांगून डोक्यात ठासून भरायची - अगदी विचारशक्ती कुंठीत होई पर्यंत. 
धन्य ती जाहिरात कला !

Thursday, 26 November 2015

ओवन फ्रेश वन !     
ओवन फ्रेश, दादर शिवाजी पार्क येथील खव्वैयांची कायम गर्दी खेचणारे एक लोकप्रिय फूड जइन्ट. प्रत्येक विकएन्डला येथे ३०-४० मिनिटांचे वेटिंग असतेच. पूर्णतः शाकाहारी असलेल्या या जागी इटालियन, मेक्सिकन, कॉन्टीनेन्ल पदार्थांची भरपूर व्हरायटी मिळते. शिवाय इथल्या मेनूत वेळोवेळी बदल केले जात असल्यामुळे प्रयेक वेळेला नवीन काहीतरी ट्राय करायला मिळत. त्यामुळे नेहमी तिथेच जाऊन तेचतेच खायचा कंटाळा आला वगैरेचा प्रश्नच येत नाही.
एक मात्र नक्की, इथल्या डिशेश वर ताव मारताना वजन,लरीची चिंता घरी विसरून यायची. इथल्या बऱ्याचशा डिशेशमध्ये क्रीम व चीज अगदी भरभरून असत. डाएट च्या बाबतीत जास्त जागरूक असाल तर पोटाला हलक आणि ताजतवान करणार लेमन कोरीयांर सूप  आणि जोडीला वेज वोक एकदम मस्त मेनू . बाकी सूप पासून डीझर्ट पर्यंत काहीही डोळे झाकून मागवा, रसना तृप्त होणारच.
जेवणा व्यतिरिक्त ओवन फ्रेशला मुद्दाम अगदी वाट वाकडी करून  जाव ते त्यांच्या पेस्ट्री व बेकरी प्रडक्ट्ससाठी. त्यांचे ताजे डोनट्स, वेगवेगळे ब्रेड्स , ब्रेड स्टिक्स , किश , बिस्किट्स , केक विशेषतः डेट वलनट केक यांचा मोह टाळणे अशक्य.  त्यांची केक आणि पेस्ट्री लाजबाब. स्पेशल ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जाणारे बर्थडे केक अप्रतीम. एक से एक डिझाईन छोट्यांना आणि आई बाबानाही वेड  लावणारे. एन्टरन्स पाशीच असलेला खास चकलेटचा काऊन्टरही खुणावतोच. आता अशा खास  केक, पेस्ट्री व चकलेट साठी खिसा जरा हलका करायला लागणार हे सांगायला नकोच.  

एक गोष्ट मात्र खटकते - सततची गर्दी आणि दाटीवाटीने केलेली आसन व्यवस्था या मुळे या जागेला एका गजबज गोंधळ असलेल्या कॉलेज कन्टनचे स्वरूप येते. तेवढ सोडल तर, ओवन फ्रेश एकदम एवन !      

Wednesday, 8 July 2015

रिकाम्या घरात आईनं करायचं काय?

  • First Published :
    Lokmat 09.07.2015
  • मुलं परदेशी शिकायला गेल्यावर जास्त पोकळी जाणवते ती आईला. साहजिकच म्हणा ! मुलं सतत आईभोवती असतात; तसंच आईचं जीवनही ही मूलकेंद्रित जास्त असतं. ब:याच जणींनी मुलांच्या संगोपनासाठी स्वखुशीने नोकरी सोडून पूर्णवेळ आई कम गृहिणी होणं स्वीकारलेलं असतं. त्यामुळे मुलं शिकायला बाहेर पडली की आईला पहिला प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे आता या रिकाम्या वेळेचं मी करू काय?   
    ब:याचदा अशा आया ‘एम्टी नेस्टर सिंड्रोम’ला बळी पडतात. आता आयुष्यात काही करायला नाही, रिकामपण कसं घालवायचं हा प्रश्न भेडसावतो. याचा परिपाक म्हणजे चिंता, चिंता आणि फक्त चिंता. सतत मुलांची काळजी आणि प्रश्नांचा भडिमार, सतत चौकश्या आणि बारीकसारीक गोष्टीत सल्ले. 
    ‘माझा मुलगा रोज अर्धा तास स्काइपवर असतो, जाताना त्याच्याकडून तसं प्रॉमिस घेतलं होतं’ - एक मैत्नीण अभिमानानं सांगत होती. 
    ब:याच आयांचा मुलांनी रोज स्काइपवर येऊन रोजचा अहवाल द्यावा असा अट्टहास असतो. पण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हेच अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांना तिथं घरकामापासून जेवण, अभ्यासार्पयत सगळी कामं एकटय़ानं करायची असतात. परत तिथली अभ्यास पद्धती जरा वेगळी असते. मुलांना त्यासाठी खूप वाचन, नेट सर्च करून बरीच माहिती गोळा करावी लागते. याव्यतिरिक्त इंटर्नशिप आणि नोकरीसाठी शोध, अर्ज करणं, नेटवर्किग करणं, मुलाखतीसाठी तयारी यासाठी वेळ द्यावा लागतो. 
    तेव्हा रोज आपण मुलांचा किती वेळ घ्यावा याचा आईनं विचार करायला हवा. तसंही नंतर नंतर मग ‘काय खाल्लं’ या व्यतिरिक्त रोज बोलायला काही शिल्लक राहत नाही. मुलं पण कंटाळतात. यापेक्षा रोज व्हॉट्स अॅपवर मुलांची खुशाली घेऊन आठवडय़ातून एकदा अथवा दोनदा मुलांच्या सोयीनं स्काइपवर गप्पा मारणं जास्त सयुक्तिक ठरेल. 
    तसंही मुलांचे तिकडचे प्रश्न नुस्ते समजून नुसती चिंताच करत बसल्यास मुलं त्यांचे प्रश्न सांगणं बंद करतात. केवळ एक चिंतातुर आई न बनता मुलांची मार्गदर्शक, एक भक्कम आधार व जवळची खंबीर मैत्नीण बनण्याकडे भर द्यायला हवा. त्यामुळे त्यांना सतत सल्ले, सतत प्रश्नांची विचारणा, सतत काही ना काही भुणभुण हे सारं बंद करून टाकायला पाहिजे. 
    मुलं परदेशी गेली म्हणजे आपल्याला आता कायमची दुरावली वगैरे विचार मनातून झटकून टाकावेत. आजकाल नोकरीच्या निमित्तानेही मुलांना बाहेर घरापासून लांब दुस:या शहरात अथवा देशात जावे लागतेच. बदलत्या काळाचे हे सत्य मान्य करणं आणि आपल्या जीवनातला आनंदाचा झरा झुळझुळता ठेवणं आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्या रिकामपणावर आपण उत्तर शोधावं. स्वत:साठी काहीतरी आवडेल असं करावं.
    सोपं नाही हे तसं. पण या नाजूक अवस्थेतून जावं लागतंच. आणि मग काही वर्षानी घरटय़ातून उडून पिलू जेव्हा जबाबदार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होऊन आपल्याला भेटतं, भरारी घेण्यासाठी सज्ज झालेलं दिसतं तेव्हा त्याला खुल्या आकाशात मोकळं सोडण्याचा, पंखांना बळ देण्याचा आपला निर्णय योग्यच होता याची खात्नी पटते. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मुलांना जन्मभर तर आपण पुरणार नसतोच! त्यांना त्यांच्या जीवनप्रवाहात तरण्यासाठी, गगनभरारीसाठी तयार करणं हेच तर आईचं काम. ते तिनं केलं की आपल्या ओढाताणीचंही चीज झाल्यासारखं वाटतं!
     
    मोकळ्या वेळाचं आईनं 
    करायचं काय?
    1) रिकामा वेळ घालवण्यासाठी स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यावं. एखादा छंद जोपासावा.
    2) मुलांशी संपर्कात राहण्यासाठी, संवाद साधण्यासाठी  नवीन तंत्नज्ञान आत्मसात करावं. फेसबुक, व्हॉट्स अॅप शिकून घ्यावं.
    3) मुलांच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर पुढील शिक्षण घेणा:या हल्ली अनेकजणी आहेत. आमची एक मैत्नीण दर सहा-आठ महिन्यांनी कुठलातरी कोर्स पूर्ण केल्याचे मेसेज व्हॉट्स अॅपवर टाकत असते. 
    4) आयुष्यात आलेलं रिकामपण भरून काढण्याचा हा सकारात्मक प्रयत्न. आपल्याला हवं ते, आवडेल ते, राहून गेलेलं करावं. पूर्ण आनंदानं आहे ती परिस्थिती स्वीकारून अधिक आनंददायी पर्याय शोधावेत. आनंदी राहावे.
     कीर्ती कुलकर्णी
    ‘keerti.anulekhan@gmail.com

Wednesday, 1 July 2015



स्वत:ला सावरशील ना.?

  • First Published :
    lOKMAT , jULY 2, 2015
  • कीर्ती कुलकर्णी
     
    मुलं परदेशी निघाली की,आधी स्वत:ला आणि मग त्यांना विचारायला हवं की, तिथल्या एकटेपणाचं काय करशील? स्वयंपाक येतो? मग काय खाशील? रोजचे खर्च, वेळेवर सगळं करण्याची शिस्त आणि स्वातंत्र्यात स्वत:ला सांभाळण्याची जबाबदारी. हे सारं कसं सांभाळशील?
    ------------
    मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना संपूर्ण कुटुंबानं करायच्या मानसिक तयारीचा विचार आपण मागच्या लेखात केला. आता या लेखात आपण मुलांच्या तयारीचा थोडा वेगळ्या अंगानं  विचार करून पाहू.
     
    मनोधैर्य 
     
    मुलं दाखवत नसली तरी प्रथमच लांब एकटं जाण्याचं टेन्शन त्यांनाही असतंच. अशातच आता एकदा गेल्यावर निदान सहा महिने ते वर्षभर भेट होणार नाही या विचारानं सतत वाईट वाटून घेणं, आपण एकटं कसं राहणार याची सतत चिंता करणं या धास्तीनंही मुलांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं. तेव्हा या विषयांवरच्या चर्चा आपण निदान मुलांसमोर तरी टाळायला हव्यात. आईवडील आपल्यासाठी बराच खर्च करत असल्याची जाण असण्याएवढी ही मुलं समजूतदार आणि प्रगल्भ असतात. पण ती या गोष्टींचं अवाजवी टेन्शन घेणार नाहीत हेदेखील पालकांनी पाहिलं पाहिजे. सकारात्मक विचार मुलांचे पंख अधिक बळकट करतात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
    त्यामुळे जाणं अगदी दोन दिवसांवर आल्यावर अचानक मुलांनी हातपाय गाळले तर सांगा त्यांना.
    ‘तुला तिथेही सगळा अभ्यास जमेलच, तेवढी तुझी पात्रता आहेच; पण यदाकदाचित त्या जागतिक स्पर्धेच्या महासागरात थोडं कमी पडलं तरी काही खूप फरक पडत नाही. गेलं म्हणजे अगदी जिंकूनच आलं पाहिजे असं थोडंच आहे? तिथली शिक्षण पद्धती, एकटं लांब जाऊन, राहून, सगळं पाहून येणं हेही एक शिक्षणच आहे, त्याचाही तुला खूप उपयोग होईल.’
     
    खर्चाचं नियोजन 
     
    तिथे गेल्यावर मुलांना दैनंदिन खर्चाचं नियोजन करावं लागतं. मोबाइल बिल, घरभाडं, क्रे डिट कार्ड, त्यांची बिलं न विसरता वेळेवर भरणं, टॅक्सची कागदपत्रं वेळेवर सबमिट करणं ही कामं  स्वत: करावी लागतात. तेव्हा शक्य असल्यास आधीपासूनच मुलांना बँक व्यवहार, बिलं भरणं अशा कामांची थोडी सवय करावी. 
    शिक्षणाच्या खर्चाव्यतिरिक्त दैनंदिन राहण्याचा खर्चही आपण उचलत असल्याची कल्पना मुलांना द्यावी. कारण शिकत असताना दर आठवडय़ाला काही तास काम करण्याची परवानगी असली, तरी लगेच गेल्या गेल्या सगळ्यांना नोकरी मिळेलच असं नाही. तसंच रोजचा खर्च उचलण्यासाठी नोकरीत वेळ आणि एनर्जी किती घालवायची, अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित जुळवणंही महत्त्वाचं. तेव्हा सध्या अभ्यासाला प्राध्यान्य असून, पैसा कमावणं महत्त्वाचं नाही हे त्यांना सांगायला हवं. बचत अथवा काटकसर कशासाठी करावी आणि कशासाठी करू नये हे वेळोवेळी चर्चा करून पटवून द्यावं. कारण तिकडे आजारी पडणं अतिशय खर्चिक असतं. (आर्थिक आणि भावनिकदृष्टय़ाही.)
     
    खाण्याच्या सवयी, वेळेचे बंधन 
     
    परदेशात राहायचे तर स्वत:ला शिस्त लावून घेणं अत्यावशकच. ठरल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर जाणं म्हणजे वेळेवर, अगदी ठरल्या वेळेच्या ठोक्याला पोहोचणो म्हणजे उशीर आणि ठरल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचणो अक्षम्य हे त्यांचं तत्त्व.  वेळेच्या बाबतीत सगळे अगदी काटेकोर असतात.  त्यामुळे ‘अरे ! थांब. हा आलोच, हे काय झालंच’   म्हणत माणसाला 10-20 मिनिटं ताटकळत ठेवण्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वागणा:या आपल्याला ते वेळेचं बंधन पहिले आत्मसात करावं लागत. म्हणून मुलांना पहिल्यापासून वेळेची शिस्त लावलेली उत्तम. 
    परदेशात स्वत:चं जेवण स्वत: बनवावं लागत असल्यामुळे आधीपासूनच मुलांना जरु रीपुरता स्वयंपाक करायला शिकवणं उत्तम. जेवण करायला घरीच शिकवावं. कमीत कमी वेळात आणि कष्टात पोटभर व पौष्टिक काय खाता येईल हे मुलांना वेळोवेळी सांगत राहावं. अन्यथा वारंवार रेडी टू इट, न्यूडल्स, पिङझा, बर्गर खाऊन जाताना शिडशिडी शेलाटय़ा बांध्याची लेक सहा महिन्यात बर्गर साईज होते.
     
    जगण्याचं नवं स्वातंत्र्य
     
    गेल्याच आठवडय़ात अमेरिकेहून येताना माङया शेजारी तिथे शिकत असलेला एक भारतीय मुलगा सुट्टीसाठी घरी येत होता. विमान उड्डाण झाल्या झाल्या पठ्ठय़ाने हवाई सुंदरीला दारू कधी सव्र्ह करणार असं विचारलं! प्रवासात मनसोक्त दारू रिचवून झाल्यावर मुंबईला उतरण्याची वेळ झाल्यावर महाशय माउथ फ्रेशनरनं तोंड खळबळून मोकळे.
    ब:याचदा इथे पारंपरिक, सामाजिक बंधनात वाढलेली मुलं तिथे अचानक पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर बेताल वागतात आणि घरच्यांना त्याचा थांगपत्ता नसतो. अनेक गोष्टींबद्दल दबलेले कुतूहल, आकर्षण, स्वातंत्र्य, मित्रपरिवाराचा दबाव, तिथली स्वैर राहणी या सर्वाचा तो परिपाक असतो. तेव्हा बदलत्या काळाप्रमाणो मुलांना योग्य तेवढं स्वातंत्र्य द्यावं जेणोकरून त्यांचे काही गोष्टींचे आकर्षण कमी होऊन चांगलंवाईट यातील फरक, त्यातील सीमारेषा कळेल. म्हणून मुलांशी मित्रत्वाच्या नात्यानं संवाद असणं गरजेचं आहे.
     
    एकटेपणा 
     
    आयुष्यात एकटेपणासारखं दु:खद व भयावह काही नाही. कधी न कधी त्याला तोंड द्यावे लागतेच. अमेरिकेसारख्या समृद्ध देशाला जणू एकटेपणाचा शापच आहे. इथे जाण्यापूर्वी आपल्याला एकटं राहायला लागू शकतं ही खूणगाठ प्रत्येकाने बांधावीच. त्या तयारीतही असावं. इथून जाताना जरी मित्रमैत्रिणी रूममेट्स म्हणून असले, तरी नंतर नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरांत ते जाऊ शकतात. अशावेळी कुणी रूम पार्टनर मिळाला नाही तर एकटं राहण्याशिवाय पर्याय नाही. या सा:याची मानसिक तयारी करून घेतली, जाणीव असली की मग घेऊ द्यावी खुशाल भरारी!
     
    keerti.anulekhan@gmail.com