लोकप्रियतेच्या
रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. लायकी नसणाऱ्याना तर पहिली.
लायकी असून प्रसिद्धीपरान्मुख राहणारे थोडेच. ते खरे कर्मवीर. पण वाचाळवीर बनून
सवंग प्रसिद्धी मिळवणार्यांचा बाजारच जास्त. सध्या चर्चेत असलेले तन्मय भट हे
त्यातलेच एक. हशा आणि टाळ्या ( हल्लीच्या भाषेत लाईक व फालोअर्स) घेण्याची पण एक
नशा चढते आणि नशेत सद्सद्विवेक बुद्धीचा अभाव व तोल जाऊन मर्यादा उल्लंघन होणे
ओघाने आलेच. अश्या बेताल वक्तव्यांची कितपत नोंद घ्यायची आणि त्याला कितपत महत्व
द्यायचं याची सुबुद्धी इतरांनी तरी दाखवावी. रस्त्यावरून एखादा वेडा जर वेडीवाकडी
बडबड करत चालला असेल तर कुणी त्याची दखल घेते का ? मानसिक संतुलन ढळलय म्हणून दुर्लक्ष करतोच न ? थोडे काही असतात जे त्यातून स्वताची करमणूक
करून घेतात. पण अशांची कीवच करावाशी वाटते कारण त्यांचेही मानसिक आरोग्य प्रश्नार्थक
वाटते. तन्मय भट व त्यांचा सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांच्या वरचा व्हिडीओ
चवीने पाहणारे याच गटातले. (आक्षेप कुणाची खिल्ली उडवण्यावर नाही. अत्रे तर त्यात
अग्रेसर होते. पण पातळी सोडून बेताल होणे
केव्हाही आक्षेपार्ह मग ते कुणीही का असे ना.) अशा व्यक्ती व त्यांचे कार्यक्रम
डोक्यावर घेतले जाणे हे एकंदरीत सामाजिक
अभिरुचीच्या घसरगुंडीचे द्योतक होय. दुर्दैवाची गोष्ट अशी कि या सर्व चर्चांना प्रसिद्धी माध्यमे जास्त हवा
देतात - रकाने भरवायला व टी आ र पी वाढवायला !
तन्मय भट यांनी
सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांची माफी मागो अथवा न मागो ; फरक काहीच पडत नाही. त्या दोघांनी याची दखलही न घेण योग्यच
. कर्तुत्वाच्या जोरावर प्रसिद्धी व सन्मान मिळतो
तेव्हा स्तुती सुमनांच्या जोडीला कधी पदरात निंदेचे व आसुयेचे निखारही
येतात याची जाणीव असण्या एवढे प्रगल्भ व संस्कारी दोघेही आहेत. तन्मय भट यांचा सध्याचा पराक्रम पाहता सचिन तेंडूलकर व लता मंगेशकर यांनी एक जन्मात
जो कर्तुत्व पहाड उभा केलाय तो तन्मय भट यांना सात जन्मात तरी जमेल का असा प्रश्नच
पडतो.
महा दुर्दैव असे
कि ज्यांच्या हातात देशरथाचे सारथ्य दिले ते राजकीय पुढारीही या अश्या गोष्टींची
दखल घेतात, देशाचे इतर महत्वाचे
मुद्दे सोडून ! शेवटी ते हि सवंग लोकप्रियतेला हपापलेले वाचाळवीरच !
No comments:
Post a Comment