कचेरीतील कारकून अतिशय
गरीब प्राणी. कधी कुणाला काही न बोलणारा ; उलट उत्तरं न देणारा; जणू काही वाचाहीनच. एखाद्या कामगाराकडे रोखून पहा, तो पण तुमच्याकडे तसाच रोखून बघेल; हमालाशी उद्धटपणे बोला, तो सरळ सामान टाकून चालू पडेल; एखाद्या भिकाऱ्याला हटका, तो तुमच्याकडे रागाने बघून जाईल. अगदी एखाद्या गाढवाला वाईट
वागणूक दिली तर तो पण लाथा झाडेल. पण, गरीब बिचारा कारकून ! त्याला शिव्या घाला, लाथा मारा, तो यत्किंचितही
राग दर्शवणार नाही. अगदी एखाद्या साधूसंतालाही शक्य नसेल एवढा ताबा त्याचा स्वतःवर
असतो. मानवजातीचे सर्वोत्तम गुण - समाधान, सहनशीलता व आज्ञाधारकपणा – यांची जणू मूर्तीच !
अगदी भग्नावशेषांनाही त्यांचा एक वैभवशाली
इतिहास असतो. दिवाळीच्या रात्री ते ही दिव्यांनी उजळतात, पावसाळ्यात हिरवळीने नटतात - निसर्गाच्या बदलत्या रूपाचं
प्रतिबिंब ती दर्शवतात. पण गरीब कारकून कधीच बदलत नाही; त्याचा म्लान चेहरा हास्याने कधी उजळत नाही, की रेताडासारख्या रुक्ष आयुष्यात पावसाच्या
सरींनी सुखाचा शिडकावा होत नाही.
लाला फतेचंद
अशांपैकीच एक कारकून. माणसाचं नाव त्याचं नशीब ठरवत असं म्हणतात. पण लाला
फतेचंदच्या बाबतीत हे अगदी खोटं ठरलं होतं. नावाचा अर्थ जरी `विजयी' असला तरी त्याला `हारचंद' म्हटलं असतं तरी काही अतिशयोक्ती झाली नसती.
कचेरीत, मित्रांमध्ये सर्वत्र
त्याच्या नशिबी हारच आली. आयुष्यभर तो फक्त अडचणी व निराशेशीच झगडत राहिला.
फतेचंदला मुलगे
नव्हते, फक्त तीन मुलीच. त्याला
भाऊही नव्हते, होत्या फक्त दोन
मेहुण्या. गाठीशी पैसा तुटपुंजा असला तरी हृदयाचा खजिना सोन्याने भरलेला. दयाळूपणा
व सहनशीलतेचं जणू मूर्तिमंत रूपच. अनेकांकडून फसवणूक झाल्यामुळे मनमोकळं बोलावं
असा जवळचा कुणी मित्र ही नव्हता. तोळामासाची प्रकृती, वयाच्या बत्तिसाव्या वर्षीच डोक्यावरचे अर्धे केस पिकलेले,
पचनशक्तीही डोळ्यांप्रमाणेच अतिशय नाजूक,
निस्तेज वर्ण, बसलेली गालफट, पाठीला पोक व कसलीच हिंमत नसलेलं काळीज - असा हा फतेचंद रोज सकाळी नऊ वाजता
कचेरीत जायचा आणि संध्याकाळी सहाला घरी परतायचा. संध्याकाळी परत बाहेर पडायची
त्याच्यात ताकतच नसायची. बाहेरच्या जगात काय चाललंय याची त्याला खबरबतही नव्हती.
पूर्ण आयुष्य त्याच कचेरीशीच निगडित होतं. नोकरी जायची भीती त्याला कायम पोखरत
राहायची. जातीधर्म, गोरगरीब या
कशाचंच त्याला सोयरसुतक नव्हतं. त्याला कला, वाङ्मय, नाटक,सिनेमा, खेळ कशातही काडीचा रस नव्हता. तो पत्ते कधी खेळाला होता हे
ही त्याला आठवत नव्हतं.
हिवाळ्याचे दिवस
होते, आकाशात थोडे ढग जमले
होते. फतेचंद घरी आला तेव्हा दिवेलागण झाली होती. कचेरीतुन आल्या आल्या तो कधीच
कुणाशी काही बोलत नसे. आधी फक्त पंधरा - वीस मिनिटं शांत पडून राहायचा आणि मग बोलायचा.
त्या संध्याकाळी तो असाच शांतपणे पडलेला असताना कुणीतरी त्याला हाक मारली. धाकटी
मुलगी कोण आलंय बघायला बाहेर गेली तर कचेरीतुन कुणी निरोप घेऊन आल्याचं समजलं.
शारदा आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भांडी घासत होती.
``काय हवंय विचार
त्यांना, हे आत्ताच कचेरीतून आलेत;
परत बोलावलंय का ?''
``साहेबानी त्यांना
तात्काळ यायला सांगितलंय. काही तातडीचं काम आहे.''
``काय आहे ?''
फतेचंदनी त्याचं मौन सोडलं.
``काही नाही
कचेरीतला शिपाई '' शारदा उत्तरली.
``कचेरीतला शिपाई ? साहेबांनी बोलावलं की काय ? ''
``तसा निरोप घेऊन
तो आलाय. कसले हे साहेब तुमचे ? नेहमी तुम्हाला
बोलावून घेत असतात. आत्ताच तर घरी आलात. परत कशाला बोलावलंय ? सांगा, म्हणावं नाही येत. फार तर काय, नोकरीवरुन काढून
टाकतील; अजून काय वाईट करू शकणार ?
''
``बघतो का बोलावलंय
ते. माझ्या मेजवरची सगळी कामं मी आटपून आलो होतो. पटकन बघून येतो''
``जायच्या आधी जरा
काही खाऊन तरी जा. एकदा त्या शिपायाशी बोलायला लागलात की सगळं विसराल.'' शारदा फराळाचं
काही घेऊन आली.
``मुलींना खायला
काही दिलंस की नाही ?'' फराळाच्या बशीकडे बघत फतेचंदनी विचारलं.
``हो दिलं, तुम्ही खा जरा ''
तेवढ्यात त्याची
धाकटी मुलगी आली. शारदाने तिच्याकडे रागाने बघत फटकारले, `` का आलीस इथे माझ्या डोक्यावर बसायला ? जा, बाहेर खेळ जा ''
``कशाला रागावतेस
तिला ? '' फतेचंदनी विचारले. ``चुन्नी, हे घे, खा .''
चुन्नीनी घाबरून
आईकडे बघितलं आणि बाहेर पळाली.
``कशाला बाहेर
पिटाळलीस तिला ? '' फतेचंदनी नाराजी दाखवली.
``आता या बशीत आहेच
कितीस असं ? तिला दिलं असतं
तर बाकीच्या दोघी नसत्या आल्या वाटा मागायला ? ''
तेवढ्यात बाहेर
उभ्या असलेल्या शिपायांनी आवाज दिला , ``मला उशीर होतोय ''
``आत्ता नाही येऊ
शकत म्हणून का नाही सांगत त्याला ?'' शारदानी विचारले
``असं कसं सांगू ?
नोकरीचा प्रश्न आहे ''
``म्हणजे काय ?
नोकरी पायी जीव का देणार आहात ? चेहरा पाहिलाय आरशात ? सहा महिने आजारी असल्यासारखे दिसताय ''
फतेचंदनी कांही
घास घेतले, पेलाभर पाणि प्यायला आणि
बाहेर पडला. शारदा बनवत असलेले पान तसेच राहिले.
``बाबुजी खुप वेळ घेतलात तुम्ही. आता लवकर चला नाही तर जाम
ओरडतील ते तुम्हाला''
``आता ते रागावोत अथवा खरडपट्टी काढोत, मी काही यापेक्षा
भरभर चालु शकत नाही. कुठे त्यांच्या बंगल्यावर आहेत का ते ?''
``आता या वेळेस काय ते कचेरीत असणार ? ते काय कुणी
ऐरेगैरे आहेत ? मोठे महाराज ते !''
शिपाई झपाझप चालत
होता. फतेचंदला काही भरभर चालत येई ना. थोड्यात वेळात त्याला धाप लागली. पाय भरून
येई पर्यंत तो पाऊले टाकत राहिला. शेवटी पाय साथ देईनासे झाले. तो घामाने थपथपला, डोकं गरगरू लागलं
आणि डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली.
``बाबू चला लवकर ''
शिपाई ओरडला.
``तू जा, मी येतो मागून, '' तो हातात डोकं धरून
रस्त्याच्या बाजूला कठड्यावर बसला व धाप टाकू लागला. शिपाई पुढे निघून गेला.
`` हा नाठाळ माणूस पुढे जाऊन साहेबांना भलतंच काही सांगायचा '' फतेचंद घाबरला. त्राण एकवटून तो उठला आणि परत
चालू लागला.
फतेचंद
साहेबांच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा साहेब व्हरांड्यात येरझाऱ्या घालत होते.
शिपाई दृष्टिस पडताच ते डाफरले, ``एव्हडा का वेळ लागला ?''
``काय सांगू साहेब ? फतेचंद बाबूंनी एवढा वेळ घेतला. मी धावतच आलो ''
``काय म्हणाले बाबू ?''
तेव्हड्यात
फतेचंदने अंगणाच्या कुंपणातून आत डोकावले. साहेबांना सलाम करून त्यांच्या समोर मान
झुकवून उभा राहिला.
``कुठे होतात इतका वेळ ?'' साहेब गुरकले.
``साहेब, नुकताच कचेरीतून घरी पोचलो होतो. शिपाई निरोप
घेऊन आला तसा लगेच निघालो''
``खोटं बोलताय तुम्ही. मी एक तास इथे उभा आहे ''
``साहेब, मी खोटं नाही बोलत. मी भरभर नाही चालू शकत.
शिपायानी निरोप दिल्याक्षणीच मी निघालो''
``गप्प बस. गाढवा, मी तासभर वाट पहातोय. कान धर तुझे '' साहेब गरजले
``हुजूर, गेली दहा वर्षे मी तुमची चाकरी करतोय. मी कधीच
.....
``चूप ! कान धर तुझे ''
``पण मी काय केलं ?''
`` चपरासी, या गाढवाचे कांन ओढ; नाही तर मी तुला झोडीन ''
``साहेब, मी येथे काम करायला येतो, मार खायला नाही.
मलाही काही मानसन्मान आहे. तुमची नोकरी ठेवा तुमच्याकडे. साहेब, तुम्ही मला काही
शिक्षा दिलीत तर चालेल पण मी असा दुसऱ्याचा अनादर करणार नाही''
साहेबांचा राग
अनावर झाला. ते त्यांची चालण्याची काठी घ्यायला गेले. साहेबांचा रागरंग पाहून
शिपायाने पळ काढला. फतेचंद तिथेच उभा राहिला. शिपाई आसपास नाहीसे पाहून साहेबानींच
फतेचंदचे कान पकडले व त्याला गदगदा हालवला, ``माझी आज्ञा न पाळण्याच
धाडसच कसं करतोस तू ? आत्ताच्या आत्ता कचेरीत जाऊन फाईल घेऊन ये.''
``कुठली फाईल आणू साहेब?'' फतेचंदनी नम्रपणे
विचारले.
``फा sss ईल , फाईल अजून काय ? बहिरा आहेस ? ऐकू नाही येत ?मी फाईल मागतोय. ''
``कोणती फाईल पाहिजे आपल्याला ? '' फतेचंदनी धीर एकवटून
विचारले ?
``मी मागतोय ती फाईल. तिच ती फाईल. घेऊन ये पटकन.''
फतेचंदचे अजून
काही विचारण्याचे धाडस झाले नाही. एक तर साहेब अतिशय तापट, त्यात सत्तेची व
दारूची धुंदी ! जर त्यांनी छडीने मारले
असते तर फतेचंद काहीही करू शकला नसता. तो गुपचूप कचेरीत जाण्यासाठी चालू पडला.
``जा पटकन ; धाव '' साहेब ओरडले.
``साहेब मला धावता येत नाही ''
``फारच आळशी झालायस तू. थांब , तुला दाखवतो कसं धावतात
ते. '' साहेबानी फतेचंदला जोरात ढकललं. ``धाव, आता तरी धावतोस
की नाही ?''
साहेब त्यांची
छडी आणायला गेले. कचेरीतला कारकून झाला म्हणून काय झालं? फतेचंद शेवटी माणूसच. जर तो हट्टाकट्टा असता तर
साहेबांचं नरडंच धरलं असतं, हातात एखादं
शस्त्र असतं तर वार केला असता ; पण त्या क्षणी
मार खाण्यापलीकडे त्याच्या नशिबी काहीच नव्हतं. आता आपल्याला मार पडणार हे ओळखून
फतेचंद पटकन फाटकातून बाहेर पडून रस्त्याला लागला.
फतेचंद कचेरीत
गेलाच नाही. जाऊन करणार तरी काय ? साहेबानी काय
फाइलच नाव सांगितलं नव्हतं ; दारूच्या नशेत
नाव सांगायलाच विसरले होते. फतेचंद हळूहळू पाय ओढत घराकडे निघाला -जणू अपमानाच्या
बेड्या पायात पडल्या होत्या. मानलं की फतेचंद साहेबांपेक्षा खूपच कमजोर होता; शिवाय बचावासाठी हातातही काही नव्हतं. पण उलट
उत्तर द्यायला काय हरकत होती ? निदान पायात बूट
तर होते ?
ते फेकून मारायला काय
हरकत होती ? का एवढा अपमान सहन केला ? पण काही इलाज ही नव्हता. समजा रागाच्या भरात
गोळी वगैरे मारली असती तर त्याचं काय गेलं असतं ? फार तर काय एक -
दोन महिने तुरुंगवास झाला असता, कदाचित दोन चारशे
रूपये दंड भरावा लागला असता. पण कुटुंबाचा सत्यानाश झाला असता. या जगात तो सोडून
अजून कुणी होतं ज्यांनी त्याच्या बायको व मुलींची काळजी घेतली असती ? कुणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं त्यांनी ? रस्त्यावर आल्या असत्या. कुटुंबाला पोसण्याएवढा
पुरेसा पैसा त्याच्याकडे असता तर आज एवढीं बेइज्जती सहन करायला लागली नसती. एक तर
जीव तरी गेला असता नाही तर त्या राक्षसाला धडा तरी शिकवला असता. फतेचंदला स्वतःच्या जिवाची पर्वा नव्हती.
एवीतेवी आयुष्यात असं काय मोठंस सुख होतं ? काळजी होती फक्त कुटुंबाची ज्यामुळे तो एवढा कच खात होता.
आयुष्यात प्रथमच
फतेचंदला आपल्या शारीरिक दुर्बलतेचं फार वाईट वाटलं. जर त्यानी पहिल्यापासून
तब्येतीची नीट काळजी घेतली असती, रोज थोडा व्यायाम
केला असता, लाठी चालवायला शिकला असता
तर आज काय त्या सैतानाची हिम्मत झाली असती फतेचंदचे कान पकडायची ? डोळेच फोडले असते त्याचे. घरातून निदान एक सुरी
तरी बरोबर आणायला हवी होती. काहीच नाही तर चार सहा लगावून द्यायला हव्या होत्या -
काय जेलबील मध्ये जायचं ते नंतर बघता आलं असतं.
पुढे पुढे चालता
चालता फतेचंदला आपल्या भित्रेपणाचा व नेभळटपणाचा जामच संताप येऊ लागला. साहेबांना
दोन चार थपडा दिल्या असत्या तर होऊन होऊन काय झालं झालं असतं ? त्यांचे नोकर सगळे आपल्यावर तुटून पडले असते
आणि सगळ्यांनी धरून मारला असता. पण निदान साहेबांना हे तरी समजलं असतं की विनाकारण
गरीब निरपराधी माणसाला त्रास देणं, अपमानित करणं
शक्य नाही. समजा तो आज मेला तर मुलं उघड्यावर पडणार. उद्या जरी मेला तरी परिस्थिती
काय अशी बदलणार ? मग आजच का नाही ? या विचाराने फतेचंदला अचानक जामच जोर आला. तो
अपमानाचा बदला घ्यायला चार पावलं परत पण गेला; पण परत विचार
केला - आता काय उपयोग ? जो काही अपमान व्हायचा तो झालाच. आणि काय माहीत
साहेब बंगल्यावर असतील की नाही; नाही तर क्लबवर
गेले असायचे. फिरून एकदा शारदाच्या अगतिकतेचा विचार त्याच्या मनाला शिवाला.
मुलींच्या पोरकं होण्याच्या विचाराने त्याला पूर्णच परावृत्त केलं. तो परत घराच्या
दिशेने वळला.
घरी गेल्या
गेल्या शारदानी विचारले, ``कशाला बोलावलं
होतं ? एवढा का वेळ लागला ? ''
``काही नाही , जाम दारू प्यायला होता; शिव्या दिल्या, अपमान केला. परत
परत `उशीर का केला ' च पालुपद लावून
बसला. हरामखोरानी शिपायाला माझे कान धरायला सांगितले.
``चपलेने मारला नाही त्याला
?'' शारदा फुत्कारली.
शिपाई आमचा भला
माणूस. त्यानी सरळ सांगितलं - साहेब, हे काही
माझ्याच्यानी होणार नाही; भल्या माणसांना
अपमानित करायला काही मी नोकरी घेतली नाही - आणि
सरळ रामराम ठोकून तो चालू पडला.
``चांगलाच धीराचा निघाला.
तुम्ही पण का नाही साहेबांची कान उघाडणी केलीत ? ''
``केली तर; सोडतो की काय ? त्यांनी काठी
आणली , मी बूट काढून तयार. त्यांनी काठीनं मारलं ; मी बुटांनी''
``उत्तम ! त्यांची लायकी
दाखवलीत त्यांना''.
``चांगलाच अवाक झाला तो ''
``चांगलंच केलंत. पुरा
झोडूनच यायचंत त्याला. मी असते तर जीवच घेतला असता.''
``मारून तर आलोय; आता परिणाम भोगावे लागणार. बघु काय होतंय ते. नोकरी तर जाईलच , कदाचित तुरुंगातही जावं लागेल ''
``काय म्हणून तुरुंगात
जायचं ? न्याय वगैरे काही आहे की नाही ? त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या , काठीने मारलं.''
``त्याच्या पुढे माझं कोण
ऐकणार ? कोर्ट पण त्याचीच बाजू घेईल ''
``झाली तर झाली, बघू. पण या पुढे कोणत्याच साहेबाची कारकुनाला
शिवीगाळ करण्याची हिम्मत होणार नाही. खरं तर तुम्ही त्यानी शिवी दिल्यादिल्या
मुस्कटात ठेवून द्यायला हवं होत ''
``मग तर त्यांनी मला गोळी घालून
ठारच केलं असतं''
``तेव्हाच तेव्हा पाहिलं
असतं ''
``हो पण मग तुमचं काय झालं
असतं ? कुठे गेला असतात ? ''
``परमेश्वराची इच्छा !
इज्जत जास्त महत्वाची. कुटुंबासाठी स्वत्वाची
का किंमत द्यायची ? तुम्ही निदान
त्या सैतानाला मारून तरी आलात; मला तुमचा अभिमान
आहे. त्याला प्रतिकार न करता मार खाऊन, अपमानित होऊन
तसेच आला असतात तर तुमचं तोंडही मला पाहावंसं वाटलं नसतं. बोलून दाखवलं नसतं तरी
तुम्ही मनातून अगदी पार उतरला असतात. आता जे काही वाट्याला येईल त्याला आनंदानी
तोंड देईन. अरे ! हे काय ? कुठे निघालात ? ऐका तर जरा. आता परत कुठे चाललात ?''
झपाटल्यासारखा
फतेचंद घराबाहेर पडला. शारदा हाक मारत राहिली. फतेचंद परत साहेबांच्या बंगल्याकडे
निघाला - धडधडत्या उराने नाही तर ताठ मानेने. चेहऱ्यावर ठाम निर्धार दिसत होता ; पायात आता बळ आलं होतं
आता त्याचा पूर्ण
कायापालट झाला होता. एक गरीब नाडलेल्या अशक्त कचेरी कारकून ऐवजी तो आता एक ठाम
निर्धार असलेला हिंमतवान तरुण झाला होता. साहेबांच्या बंगल्यावर जायच्या आधी
त्यानी मित्राकडे जाऊन एक काठी घेतली.
रात्रीचे नऊ
वाजले होते. साहेबांचं जेवण चालू होतं. फतेचंद त्यांचं जेवण होई पर्यंतही थांबला
नाही. वाढपी खोलीतून बाहेर पडल्या पडल्या
फतेचंद दाराआडून आत घुसला. पूर्ण खोली दिव्यांनी झगमगली होती. जमिनीवर उंची
गालिचा हातरला होता. फतेचंद आयुष्यात प्रथमच एवढा उंची गालिचा बघत होता. ``तुझी आत यायची हिम्मत कशी झाली ? चालता हो'' रागाने बघत साहेब
ओरडले.
``तुम्हीच मला फाईल आणायला
सांगितलं होतत. ती घेऊन आलोय. जेवण आटपा, मग दाखवतो.
सावकाश जेवा , कदाचित हे तुमचं शेवटचं
जेवण असेल तेव्हा पोटभर जेवून घ्या ''
रागानी आणि
भितीनी साहेबाची बोलती बंद झाली. त्याचा थरकाप उडाला, तो समजून चुकला की फतेचंद मरीन अथवा मारीन अश्या निर्धारानीच
आलाय. फतेचंदच हे रूप त्याला नवीनच होत. हा जशास तस उत्तर द्यायच्या तयारीनी आलाय
हे साहेबानी ओळखलं. समोरची व्यक्ती सहन करते , प्रतिकार करत
नाही तो पर्यंत आपण वाघ असतो. कुत्र्यालाही हाडहाड करा , दगड मारा , लाथ मारा; तो शांतपणे ऐकून घेतो तो पर्यंत ठीक ; एकदा का तो चवताळून अंगावर गुरकावत आला की आपली पळताभुई
थोडी होते. फतेचंद हातात काठी घेऊन दबा धरून उभा आहे; एक पण वेडावाकडा शब्द आणि आपल्या डोक्यात काठी
हे चतुर साहेबानी ओळखले. जो मारतो त्याला मार खाण्याची भीती असतेच.
प्रतिकारात आपण सरस ठरलो, अधिकाराचा वापर करून याला जेलमध्ये टाकला तरी
थोडा फार मार खावा लागेल शिवाय नाच्चकी होईल ती वेगळीच. सारासार विचार करून
साहेबानी गोडीगुलाबीने घ्यायचे ठरवले. ``अरे तुम्ही
चिडलेले दिसताय. मी चुकून तुम्हाला काही कमी अधीक बोललो का ? ''
``अर्ध्या तासापूर्वीच
तुम्ही माझे कान धरलेत, वेडीवाकडी
शिवीगाळ केलीत. लगेच सगळं विसरलात ?''
``मी काय तुमचे कान पकडले? हा हा हा .. हा काय विनोद ? मी काय वेडा आहे असं करायला ?''
``मग काय मी खोटं बोलतोय ? शिपाई साक्षी आहे , तुमचे नोकर सगळे बघत होते''
`` कधी झालं हे सगळं ?''
``अर्ध्या तासापूर्वी. मला
निरोप देऊन बोलावून घेतलंत आणि आल्यावर काहीही चुकी नसताना माझे कान धरलेत आणि मला
मारलं''
``बाबूजी, आज मला जरा थोडी जास्तच झाली होती त्यामुळे मला
काहीच आठवत नाही ''
``तुम्ही नशेत मला मारलं
असतत तर मी मेलो असतो. नशेत काहीही केलं की माफ का ? आता मी पण नशेत
आहे. आता मी काय सांगतो ते ऐका; कान धरा आणि वचन
द्या की या पुढे तुम्ही कुठल्याच निरपराध माणसाला वाईट वागणूक देणार नाही. कान धरा
नाही तर मी तुमचे कान धरतो. हलू नका. इथून उठण्याचा प्रयत्न केलात तर मी ही काठी
तुमच्या डोक्यात घातलीच समजा, मग डोकं फुटलं तर
मी जबाबदार नाही. कान धरा ! ''
साहेबानी
हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, ``अरे वा, तुमचीपण विनोदबुद्धी कमालीची आहे. जर मी तुम्हाला काही कमी अधिक बोललो असेल तर क्षमा
मागतो.''
``अ हं, ते काही नाही, कान धरा '' काठी उगारत फतेचंदनी हुकूम सोडला.
साहेबाला अपमान
असह्य झाला. फतेचंदच्या हातातली काठी हिसकावून घेण्याच्या उद्देशाने तो पटकन उठला.
फतेचंद सावध होताच. साहेब उठल्याउठल्या
त्यानी साहेबाच्या डोक्यात काठी हाणली. साहेब तिरमिरला; डोकं हाताने दाबत तो ओरडला, ``तुला नोकरीवरून काढून टाकला ''
``मला त्याची पर्वा नाही.आज
तुम्हाला कान धरून कुठच्याही भल्या माणसाला परत कधी वाईट वागणूक देणार नाही असं
वचन दिल्याशिवाय सोडणार नाही.''
फतेचंदनी परत
काठी उगारली. दुसऱ्या तडाख्याने कवटीच फुटेल या भीतीने साहेबानी पटकन दोन्ही हात
कानांवर ठेवले , `` बास ? झालं समाधान ? ''
``म्हणा, परत कधी कुणाला शिवीगाळ करणार नाही .''
``कधीच नाही; वचन देतो''
``ठीक, जातो मी आता. आजपासून मी नोकरीचा राजीनामा
दिला. माझ्या राजीनाम्यात मी कारण देणार आहे की तुम्ही मला शिवीगाळ केलीत म्हणून
मी राजीनामा देत आहे.''
``तुम्ही राजीनामा का देताय
? मी काही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकत नाहीये.''
``तुमच्या सारख्या वाईट
माणसाची चाकरी मला करायची नाही .''
बंगल्यावरून फतेचंद शांतपणे घराकडे निघाला. एवढा आनंद त्याने या पूर्वी कधीच अनुभवाला नव्हता. आज अनुभवत होता तो आनंद जीवनातल्या पहिल्या वाहिल्या फत्तेचा !
(हिंदी साहित्यिक मुन्शी
प्रेमचंद यांच्या `इस्तीफा ' या कथेचा अनुवाद)
No comments:
Post a Comment