Monday, 4 August 2025

 

गार्लिक आईस क्रीम

     लसूण आणि आईस्क्रीम ! कॉम्बिनेशन ऐकून चक्रावलात ? माझं हि असच झालं; पण छान लागतं; साध्या व्हाईट वॅनिला किंवा हनी क्रीमि आईस क्रीमला किंचितसा गार्लिक फ्लेवर मस्त वाटतो आणि या इंनोव्हेशनची दाद देणे प्राप्त होत.  

सॅन होसे ते योसेमिटी नॅशनल पार्कला जाताना वाटेत गिलरॉय लागले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेटमधील सांता क्लारा कॉउंटीमधील गिलरॉय हे एक शहर.`गार्लिक कॅपिटॉल ऑफ द वर्ल्ड ' ( Garlic Capital of the world) हि या शहराची ओळख. अमेरिकेतील ५०% पेक्षा जास्त लसूण गिलरॉयच्या आसपासच्या परिसरात पिकवले जाते आणि देशातील ९०% लसूण पिकावर येथे प्रक्रिया केली जाते. त्या मुळे या परिसरात लसणाचा सुगंध सर्वत्र जाणवतो. दरवर्षी आयोजित होणारा `गिलरॉय लसूण महोत्सव' ( Gilroy Garlic Festival ) ही गिलरॉयची वेगळी ओळख. हा अन्न महोत्सव लसूणयुक्त नानाविध पदार्थांच्या विस्तृत श्रेणीसाठी ओळखला जातो. इथे खवैयांसाठी  गार्लिक  ब्रेड आणि गार्लिक  फ्राईज सारख्या नेहमीच्या सर्वश्रुत  पदार्थांपासून ते लसूण आइस्क्रीम आणि लसूणयुक्त पेये अशा अनोख्या पदार्थांपर्यंत सर्व काही मिळते.

वाटेत रस्त्याच्या बाजूला छोटी दुकानं लागतात - रोड साईड फ्रुट स्टँड्स . अशा एका दुकानाला भेट दिली असता लसणापासून बनवलेले अनेकविध प्रकार पाहून थक्क व्हावे. लोणची, मसाले, सॉस, साल्सा, तेल, चीझ, चिप्स, ड्रायफ्रुटस, ब्रेडस, पेस्ट, पावडर या सर्वात प्रचंड व्हरायटी तर झालीच पण चक्क जेली, जॅम, कॅण्डी सुद्धा ! 

 शिवाय वेगवेगळ्या रंगांचे - काळा, जांभळा, गुलाबी लसूण इथे विकायला होते.

एका मसाल्याच्या पदार्थाचाही किती वैविध्यपूर्ण उपयोग करू शकतो - फक्त प्रयोगशीलतेला कल्पकतेची जोड हवी !

Saturday, 28 September 2024

                               गिफ्ट

गिफ्ट एक छोटासा चार अक्षरी शब्द. गिफ्ट- एक भेटवस्तू ! पण किती अर्थपूर्ण; किती भावना त्या मागे - गिफ्ट देणाऱयांच्या आणि घेणाऱयाच्या. देण्याचा आनंद आणि आपल्या साठी कुणी काही आणलं याचा आनंद व कृतार्थ भावना ! दोन्ही अगदी नैसर्गिक भावना.

कुणाला गिफ्ट देताना किती भावना असतात, किती विचार करतो  - देण्याचा आनंद, ती व्यक्ती, तिच्या गरजा, आवडीनिवडी, अभिरुची, उपयुक्तता, प्रसंगाचे महत्त्व अशा अनेक गोष्टी समजून घेणे. मुख्य म्हणजे, तुम्ही त्या व्यक्तीला किती चांगले ओळखता; तुम्ही त्या व्यक्तीशी किती जवळचे आणि जोडलेले आहात याची उमज ! घेणाऱ्या व्यक्तीला ती भेटवस्तू आवडते आणि ती त्याचे ग्रेट, आयडियल, फॅब्युलंस, थॉटफुल वगैरे कौतुक करते तेव्हा किती आनंद होतो !

कोणत्याही वयात भेटवस्तू मिळणे ही एक छान आनंद, आश्चर्य, कुतूहल मिश्रित भावना असते. सर्व अबालवृद्धांमध्ये ही भावना असते. वृद्धांमध्ये खास करून - कुणी आपलाही विचार केला, आठवण ठेवली याचा आनंद. म्हणूनच आता काय घेऊन करायचंय, वय झालं म्हणणारे आजी आजोबा जेव्हा दिलेली शाल, पातळ किंवा शर्ट घालतात तेव्हा त्यांनी तो आनंद, ती आपुलकी लपेटलेली असते ! निरागस चिमुकल्यांचा आनंद तर काय वर्णांवा. ती अधीरता, कुतूहल,आनंद फक्त डोळ्यांत साठवावा.

मार्सेल मॉसच्या भेटवस्तूच्या सिद्धांतानुसार, भेटवस्तू केवळ भौतिक वस्तू नसून, ते एक प्रतीक असतं जवळीक, आपुलकी, स्नेहबंध दृढ करण्याचं. भेटवस्तू देण्याच्या कृतीमुळे परस्परतेची भावना निर्माण होते आणि सामाजिक बंधने वाढतात. पण याचाच जेव्हा अतिरेकी धंदा केला जातो; जेव्हा भेटवस्तू एक ओझे बनते; माणसांची किंमत त्यांनी दिलेल्या भेटवस्तूवरुन केली जाते तेव्हा  निखळ आनंद, प्रेम, आपुलकी  हद्दपार होतात आणि उरतो व्यवहार. आज काल आमंत्रणपत्रिकेत `नो गिफ्ट्स प्लीज ' अशी तळटीप असली की लोकं श्वास सोडतात कारण मग काय द्यायचं, आवडेल का, किती पर्यंत देऊन बरं दिसेल, डबल होईल का, अशा अनेक व्यावहारिक इंगळ्या सतावतात. यात व्यवहार आणि आपुलकी यांचा समन्वय साधणारा अमेरिकन मार्ग योग्य वाटतो -  घरासाठी अथवा येणाऱ्या बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी निमंत्रितांना पाठवायची आणि त्यांनी इच्छेनुसार कोणती वस्तू देणार अथवा किती पैसे देणार ते कळवायचे. यातून सगळे प्रश्न सुटले - काय देऊ, उपयोग होईल का, किंवा नको असलेली वस्तू पुढे कुणाला गिफ्ट देऊ वगैरे वगैरे.

भेटवस्तू देण्याच्या प्रथेचा उगम पूर्वीच्या ईजिप्त, रोम व ग्रीस संस्कृतीत आढळतो. इजिप्शियन लोक त्यांच्या देवतांना संरक्षण, आरोग्य, संपत्ती इत्यादीच्या बदल्यात भेटवस्तू देत. त्यांच्यात मृत व्यक्तींना नंतरच्या जीवनात मदत करण्यासाठी भेटवस्तू देखील पुरल्या जात. प्राचीन ग्रीक लोकांचा विश्वास होता की तुमच्या वाढदिवशी दुष्ट आत्मे भेट देतात आणि भेटवस्तू देणे हा या आत्म्यांना थोपवण्याचा एक मार्ग होता. ग्रीक लोकांचा विश्वास होता की तुमच्या घरी भेट देणाऱ्या लोकांना भेटवस्तू दिल्या पाहिजेत, न जाणो ते देवाच्या वेशात असतील तर!

भेटवस्तू देणे हे केवळ मानवापुरते मर्यादित नाही. शास्त्रज्ञांच्या मते, नर चिंपांझी मादी चिंपांझींना संबंध जोडण्यासाठी आणि विश्वास संपादित करण्यासाठी अन्न भेट देताना आढळून आले आहेत.

एकंदरीत पूर्वीपासून भेटवस्तूंचा वापर अनेकदा नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि देवांना आपल्या बाजूला ठेवण्यासाठी केला जात आला आहे. यातील दुसऱ्या कारणात तर आपण भारतीय एकदम अग्रेसर! भेटवस्तू देण्याचे मानसशास्त्र, व्यापारीकरण आणि संबंधित गैरप्रकार हा खूप मोठा आणि भिन्न विषय आहे. सध्या त्यात खोलात न जाण ईष्ट.


गिफ्टचा अजून एक वेगळा अर्थ मला कळला. गिफ्ट हे एक संक्षिप्त रूप गेमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर ( GIFT = Gamete Intra Fallopian Transfer) या प्रजनन उपचार पद्धतीचं. ज्या जोडप्याला नैसर्गिकरीत्या गर्भधारणा रहात नाही अशा जोडप्यांसाठी मुलं होण्याची उपचार पद्धती. एंडोक्रिनोलॉजिस्ट रिकार्डो एश ( Endocrinologist Ricardo Asch) यानं मानव जातीला दिलेली एक अमूल्य भेट.

सणासुदीचे दिवस सुरु झाले की जिथे तिथे खास ऑफर्स आणि गिफ्टिंग आईडियासचा भडीमार सुरु होतो. आज केवळ भारतातील भेटवस्तू उद्योगाची बाजारपेठे $30 अब्ज डॉलर्स एवढी आहे ! डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, ईकॉमर्स यांच्या वरचा धुमाकूळ तर विचारायलाच नको  आणि म्हणूनच फेसबुक वर जेव्हा `बुक्स आर अ  गिफ्ट यु  कॅन ओपन अगेन अँड अगेन ' असा संदेश लिहिलेल्या टी शर्ट ची जाहिरात मला दिसली तेव्हा माझ्यातली पुस्तकप्रेमी चित्कारली ` वा हीच माझी गिफ्ट ( ग्रेट आयडिया फॉर दी )'

 कधी स्वतःलाच गिफ्ट देण्याचा आनंदही छान असतो नाही का ?

Wednesday, 29 April 2020



नयन मावशी

आयुष्यात अनेक माणसं भेटतात; नाना कारणे व प्रसंगांमुळे कायम मनात घर करून राहतात. कधी फावल्या वेळात सहज काही स्मृती जागृत होतात व ही  माणसे बुडबुड्या सारखी वर येतात. नयन मावशी ही यातलीच एक.
सत्तरीच्या दशकाच्या शेवटी मुंबईच्या उपनगरांमध्ये मोठ्या सोसायट्या व ब्लॉक संस्कृती रुजत होती. याच सुमारास आम्हीही वाड्यातून मोठ्या सोसायटीत राहायला आलो आणि योगायोग असा की आमच्याच वरती पहिल्या मजल्यावर आईची शालेय मैत्रीण पण राहायला आली. हीच माझी व नयन मावशीची पहिली ओळख. आईची शालेय मैत्रीण असल्यामुळे अर्थातच घसट वाढली. पण कुठचंही नातं स्नेहाच्या व मदतीच्या खतपाण्याशिवाय रुजत व फोफावत नाही आणि यात  नयन मावशीचा पुढाकार जास्त होता म्हणायला हरकत नाही.
नाव आणि रूप यांचा कसलाही मेळ नसलेलं हे व्यक्तिमत्व. कृश, शामल वर्णीय, कमी उंचीची , बारीक चणीची, डोळे आत खोबणीत गेलेले अशी ही  मूर्ती  कायम आनंदी आणि उत्साहीत असायची. कधी निराशा, मरगळ आजूबाजूला फिरकलेच नाही जणू. सकाळी धावतपळत गाडी गाठून नोकरीला जाणार; संध्याकाळी येताना बाजारहाट करून घरी येताना पण चेहरा हंसराच, कधी दमलेला नाहीच. एव्हडीशी कुडी हे सगळं कसं झेपते आणि ही एवढी ऊर्जा कुठून येते हा प्रश्न मला नेहमी पडायचा. शाळेत ती उत्तम खेळाडू होती त्यामुळेच असेल कदाचित.
बाह्य रूपाने एखाद्या खुरटलेल्या झाडाच्या फांदीसारखी दिसणारी नयन मावशी आतून मात्र केवडा होती; कायम सुगंधाने दरवळणारी; सतत सगळ्यांना मदत करणारी, कौतुक करणारी; कुजकटपणा, असूया अश्या नकारात्मक भावनांना तिच्या आयुष्यात थाराच नव्हता. आमचं घर तळाला असल्यामुळे पावसाळ्यात कधी जास्त पाऊस झाला की पाणि यायचं. अशावेळी नयन मावशी स्वतःच्या घरी येण्याचा आग्रह करायचीच  पण ऑफिसाला जाताना घराची चावीही देऊन जायची, निसंकोच कधीही घर वापरा म्हणून आणि यात उपकार वगैरे म्हटलेले कधीही आवडायचं नाही; उलट जणू मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असच समजायची.
सगळ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळेच कदाचित तिला एकदा मोठाच फटका बसला. पत्ता विचारण्याच्या निमित्ताने दोन भामट्यानी तिला भूल घालून मंगळसूत्र आणि बांगड्या लुबाडल्या. पाठोपाठच काका आजारी पडले आणि कालांतरानी निवर्तले. आगामी दग्याचा तो नियतीनी दिलेली ईशारा तर नव्हता ?
केवडा कोमेजला तरी सुगंध देत राहतो. नयन मावशीचा स्मृतिगंध कायम दरवळत राहील.

Wednesday, 15 April 2020


                                                                                                    




घरपणाचं सुख
                                                                                 
                                                                                                                                                                
कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं; घरातच मला लॉकडाऊन केलं       
घरात मी निवांत बसले; अन घर माझे खुद्कन हसले
बैस निवांत कुशीत माझ्या; घे तर खरा पाहुणचार माझा
मोकळी हवा; निळं आकाश
पक्ष्यांची किलबिल; फुलांचा गंध
निरव शांतता; पर्णांची सळसळ
चांदणसडा; पहाट झुळूक
उपभोगायला सगळं असायचीस ना उत्सुक ?

शोधात जायचीस लांब दूरवर; चार दिवसांच्या खर्चीक टूरवर
सगळं इथेच उपभोगून घे; कुशीत माझ्या विसावून घे
सजवलंस मला उत्साहानी पण नाही उपभोगलस निवांतपणी
निवांतपणा हा उपभोगून घे; पाहुणचार माझा झोडून घे
कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं; घरपणाचं सुख मला दिलं.

Saturday, 4 April 2020


करोना आणि मासे

१२ एप्रिलच्या लोकसत्ता बालमैफिलीत प्रकाशीत

(करोनाच्या पार्श्वभूमीवर सागरीजीवनात मारलेला काल्पनीक फेरफटका - हलका फुलका; अंतर्मुख करणारा)

मत्स्यनगरीत पापलेटबाई आजकाल काहीश्या संभ्रमित होत्या. अचानक अलीकडे जरा गर्दी वाढलेली वाटत होती. कालच मि. पापलेट त्रागा करत होते, `` आजकाल चांगले ऐसपैस पोहता येत नाही. पोरांना शिस्तीत पोहता येत नाही; सारखी मधेमधे येतात. अंग कसं आखडून गेल्यासारखं वाटतंय.''
सकाळचा फेरफटका पापलेटबाईंनी सुरमईअळीच्या अंगानी मारला तर तिथे पण नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटली. संध्याकाळी पापलेट भाऊंना घरी यायला जरा उशीरच झाला. कारण विचारलं तर म्हणे बोंबील कट्ट्यावर आज बरेचजण भेटले, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात वेळ गेला. अलीकडे मुलं एकसारखी तोंड वासून खायला मागत नव्हती. स्वतःच कोलंब्या गट्ट करून आपलं पोट भरत होती. हल्ली पाणिही कमी प्रदूषित वाटत होतं.
बराच विचार करूनही काही उमजेना तेव्हा त्यांनी थेट आपल्या भावाशी म्हणजेच हलव्याशी संवाद साधला. हलवाभाऊंनी बहिणीच्या निरीक्षणाला दुजोरा दिला, `` खरंय गं; आमच्याकडे पण अलीकडे गर्दी वाढलेय. शोध घ्यायला पाहिजे.''
रात्री पापलेटबाईंनी पापलेट भाऊंच्या कानावर आपला गोंधळ घातला. नेहमी प्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव आणला पण थोडे विचारात पडले. बाजूला पोरांच्या कंपूत जरा जास्त खुसखुस वाटल्यामुळे त्यांनीं पोरांना फटकारले.
सकाळपासून पोरं गायब असल्यामुळे पापलेटबाई सचिंत होत्या. पोरांचा शोध घेत फिरता फिरता त्यांना बांगडे वहिनी भेटल्या. त्याही मुलांचाच शोध घेत होत्या. ``हल्ली भारीच द्वाड झालेत मुलं ! काल पण अशीच बराच वेळ गायब होती. कुठे जातात कोण जाणे ,'' बांगडे वहिनी म्हणाल्या. आल्यावर खरपूस समाचार घ्यायला हवा या विचारावर दोघी सहमत होऊन निरोप घेणार तेवढ्यात मुलं उड्या मारत येताना दिसली. एखादं अडवेंचर करून आल्याच्या आनंदात उसळत तरंगत होती. खडसावून विचारल्यावर लांबवर किनार्याच्या दिशेकडे पोहून आल्याचं म्हणाली. पापलेट बाईंनी शेपटीनी पोरांना फटकारलं, ``किती वेळा सांगितलं तिथे जाऊ नका, माणसं पकडतात. तरी नाही ऐकायचं, नसते धंदे करतात,''
``पण काकू हल्ली तिथे कुणीच नसतं आम्ही रोजच जातो,'' इति बांगडे पिल्लावळ.
``हो, तिथे किती मजा आली. मी पाण्याच्या वर जाऊन आलो आणि वरचं निळंशार आकाश पण बघितलं, '' कावळटाच्या या चिवचिवटानी पापलेटबाई अधिकच संभ्रमित झाल्या.    
आता मात्र मत्स्य नगरीत हा एक चर्चेचा व चिंतनाचा विषय झाला. पापलेट भाऊंनी हलवा, सरंगा , बोंबील, बांगडा, घोळ, पाला ई सर्वांची मिटिंग भरवली. पापलेट भाऊंनी विषयाला हात घातला. ``आजकाल बोटी व माणसं कमी दिसतात खरी'' सरंग्यानी दुजोरा दिला. बहिणीशी हा विषय आधीच झाला असल्यामुळे हलवाभाऊ तयारीनिशी आले होते. त्यांनी आधीच खेकडे भाऊंना कामाला लावले होते. आजकाल खेकडेवाडीत माणसं खेकडे पकडायला येत नसल्याची, इतकेच नव्हे तर आजकाल समुद्र  किनारे सुद्धा ओस असतात त्यामुळे खेकड्यांची पोरं समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालू शकतात अशी ग्वाही खेकडे भाऊंनी दिली. माणसं अलीकडे कुणा सूक्ष्म जिवाणूच्या भीतीनं घरीच दडी मारून बसल्याची गोटातली खबर त्यांनी काढली होती. 
हे ऐकताच सर्व मत्स्य आयांचा जीव भांड्यात पडला; `` चला, सध्या तरी मुलांची काळजी नाही, जरा मोकळेपणानी पोहतील तरी.''
तेवढ्यात माश्यांची काही पोर तोंडात नवीनच काही धरून येताना दिसली. खेकड्यानी लगेच ते ओळखलं, ``आजकाल माणसं विषाणूच्या भितीनी तोंडाला हे बांधून फिरतात. समुद्रकिनारी अशी बरीच पडली होती''.
हे ऐकताच सर्वांच्या छातीत धडकी भरली
अरे बापरे ! म्हणजे माणसांमुळे येऊ घातलेलं हे आणखी एक संकट !


कीर्ति कुळकर्णी

०४. ०४. २०२०