Saturday, 20 December 2014

उत्तर


एवढ्या गर्दीत तो माणुस आपल्याशीच बोलण्याचा प्रयत्न करतोय हे कळायलाच लताला काही वेळ लागला आणि तो चक्क भीक मागतोय हे समजायला तर आणखी काही क्षण गेले. धडधाकट दिसणारा, चांगले कपडे घातलेला, मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या चार चौघांसारखा सभ्य दिसणारा हा गृहस्थ चक्क भीक मागतोय ?
`फक्त शंभर रुपये मॅडम, मला गोव्याला परत जायला फक्त शंभर रुपयेच हवेत. गोव्याला माझ घर आहे '
लतानी  एक दीर्घ श्वास घेतला . तिची पर्सवरची पकड घट्ट झाली आणि दुसरा हात आपसूकच गळयापाशी गेला  - अलीकडेच घालायच सोडून दिलेलं मंगलसूत्र धरायला. एवढया प्रचंड गर्दीत या माणसाने नेमकं आपल्यालाच का हेरावं ?
मुंबईच्या वातावरणाशी ती आता चांगलीच परिचीत झाली होती, पदोपदी सावध राहायला शिकली होती . मुंग्यांसारखी अगणीत माणस असलेल्या , प्रत्येक श्वासासाठी झगडाव लागणाऱ्या अफाट गर्दीच्या या मुंबई शहराचा एक भाग होणे नशिबी आल्यावर हे सगळ भान येण साहजिकच होत - काही पर्यायच नव्हता . अनेकविध प्रकारची माणस - रस्त्यावरचे गुंड, लोचट दुकानदार , गर्दीचा फायदा घेऊन बायकांशी लगट करू पहाणारे ट्रेन मधले आंबटशौकीन , दार खिडक्यामधून डोकावणारे, संशयित नजरेने पाहणारे शेजारीपाजारी – या सगळ्यांच्या नजरा आता तिला परिचीत झाल्या होत्या . पण हा माणूस तर यांपैकी कुणीच वाटत नव्हता.
`तुम्हाला सांगतो मॅडम, या शहरात चोरांचा इतका सुळसुळाट आहे. का माझ्या पाकिटात पाच हजार रुपये होते. माझं पाकीट कुणी तरी मारलं. आता माझ्याकडे काहीच नाही - घरी जाण्या एवढे पैसेही ! मला फक्त माझ्या घरी जायचय – गर्दी , खोटेपणा व अप्रामाणिकपणापासून दूर.
लताला देखील हेच हव होतं - या जीवघेण्या गर्दीपासून लांब पळून जाण्यासाठी तिनी खरं तर काहीही  केलं असत.
या एवढ्या गर्दीत त्या माणसाच्या बोलण्यानी लता एकटीच चक्रावली होती. नाईलाजास्तव जेमतेम सरकून लताला टेकायला जागा देणारी बाजूची बाई खिडकीतून बाहेर बघत होती. डब्यातले बाकीचे एकतर वर्तमानपत्रावर नजर खिळवून बसले होते अथवा धावत्या गाडीत जेमतेम दोन पायांवर उभे राहण्याच्या कसरतीत मग्न होते .या सर्वांसाठी तो केवळ भीक मागण्याचा एक प्रकार होता. हातांची थोटकी बोटे तोंडासमोर नाचवून भीक मागण्यापेक्षा एक वेगळा प्रकार, एक बरा बदल बस्स !
तिच्या ऑफिसमधल्या काही लोकांपेक्षाही जास्त सफाईदार इंग्रजीत तो माणूस बोलत होता,
`` तुम्हाला मी खोट बोलत असेन असं वाटत असेल न ? मी माझ्या गावचा एक प्रतिष्ठीत माणूस आहे. अस भीक मागणे मला शोभेल तरी का ? ''    
अचानक आवाजात आर्जव आणून तो म्हणाला ,  ``तुम्ही या इतर लोकांपेक्षा वेगळ्या वाटता दयाळू वाटता म्हणून तुम्हाला विनंती करतो.
तिच्या क्षमाशील व दयाळू , दुसऱ्यावर पटकन विश्वास टाकणाच्या स्वभाववृत्तीला आवाहन करणारी कालपासूनची ही दुसरी व्यक्ती !
लतानी  हातानीच पर्स मधला विनोदच्या इमेलचा कागद चाचपडला. काळ आल्या पासून चारचारदा वाचून तो अगदी तोंडपाठ झाला होता .
लता , तुझी माफी मागायलाही मला तोंड नाही . मला तुझ्या प्रेमाची किमत कळली नाही . पण आता मला परत तुझ्याकडे यायचं आहे. तू मला माफ करशील आणि परत पूर्वीसारखच प्रेम करशील अशी अपेक्षा करतो . मी तुला परत कधीच सोडून न जायचं वचन  देतो.'
      `मॅडम , मी तुम्हाला माझा शब्द देतो . मला तुमचा पत्ता द्या. घरी गेल्या गेल्या मी तुम्हाला पैसे पाठवीन. '
एव्हाना त्याच्या सफाईदार इंग्रजी बोलण्याचे कौतुक व आश्चर्य संपून त्याच्या बडबडीचा वैताग लताला  येऊ लागला होता . भरीतभर म्हणजे आता आजूबाजूचे लोक या दोघांकडे पाहू लागले होते.  अगदी वृत्तपत्र वाचण्यात दंग असल्याचा बहाणा करणारेही आता कान टवकारून या दोघांचे संभाषण ऐकू लागले होते. त्यामुळे लताला अगदीच अवघडल्या सारखे झाले .  त्या माणसाचा पिच्छा सोडवून घेण्यासाठी तिनी पर्समध्ये हात चाचपडून एक नोट काढली
``हे पन्नासच रुपये आहेत '
`पण माझ्याकडे द्यायला अजून नाहीत '
` पण मला हे पुरणार नाहीत . विश्वास नसेल बसत तर मला काही देऊ नका . विश्वास ठेवा माझ्यावर . मी घरी गेलो की तुमचे पैसे पाठवतो .'
एव्हाना सर्वच सहप्रवासी या दोघांकडे उत्सुकतेने एकटक बघू लागले होते  त्यामुळे लताला अजूनच अवघडल्यासारखे झाले . तिनी पर्समधून पटकन एक नोट काढून त्या माणसाला दिली.
`धन्यवाद , आपला पत्ता ? '
लतानी पत्ता सांगायला सुरुवात केली आणि पत्ता देण शहाणपणाच नाही हे लक्षात येताच थांबली. `नको , असू दे '.
`तुम्ही एवढी दया व विश्वास दाखवलात, परमेश्वर नक्कीच तुमचं भलं करेल ' , जाता जाता तो माणूस बडबडला . पुढच्याच स्टेशनला तो माणूस उतरून पटकन गर्दीत दिसेनासा झाला .
गाडी सुरु झाल्याझाल्या लताच्या बाजूची बाई  म्हणाली , ` काही पैसे द्यायला  नको होते तुम्ही त्याला. अहो हा यांचा रोजचाच धंदा आहे .'
` काय माहीत , कदाचीत तो खरही बोलत असेल ' खांदे उडवून लता म्हणाली . इतका वेळ तो माणूस गळी पडला होता तेव्हा नाही तोंड उघडलं आणि आता सल्ले देते - लताला त्या बाईचा मनातून खूप राग आला होता . पण राग लपवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली , `` प्रत्येकाला एक संधी तर द्यावीच. कधी कधी लोकांवर विश्वासही ठेवावा .''
``हो पण मुंबईत तर नक्कीच नाही '' तोंडावरच हसू लपवीत  ती बाई म्हणाली.      
``असे सगळ्यांना वाटण्या इतके पैसे माझ्याकडेही असायला हवे होते '' वृत्तपत्राआडून कुणीतरी पुटपुटले.
लतानी सर्वांकडे दुर्लक्ष केल . सीएसटी स्थानकात गाडी आल्यावर  तिला हायसे वाटले. ऑफिसात लंचब्रेक मध्ये तिनी विनोदच पत्र परत एकदा शांतपणे वाचले . दिवसभर ती त्याचाच विचार करत होती .
रात्री जेवल्यावर ती विनोदच्या पत्राला उत्तर लिहायला बसली . उद्या लंचला सगळे बाहेर गेल्यावर फक्त उत्तर टाईप करण्या एवढाच वेळ तिला ऑफिसमधे मिळणार होता.
दोन तास बसून लिहिलेल्या सहा पानी उत्तरात तिनी सर्व भावनांना वाट मोकळी करून दिली होती  - विनोदनी दुसऱ्या स्त्रीसाठी सोडल्याचा धक्का , दु:ख , असुरक्षितता , अपमान , दैनंदीन गरजा भागवण्यासाठी स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी करायला लागलेली धडपड,  आय् टी इंजिनीयरच्या नोकरी निमित्त वाट्याला आलेले मुंबईतलं धकाधकीचं जीवन आणि सर्वात महत्वाचा - भीतीदायक एकटेपणा.
पत्र परत वाचताना लताला शंका आली - कदाचित आपण जर जास्तच मोकळेपणाने सगळ्या भावना व्यक्त केल्यात आणि त्या पण अशा माणसा जवळ ज्यानी एकदा आपली फसवणूक केलेय. नाही , आता भावनावश न होता जास्त व्यावहारीक राहायला हवं .
तिनी परत ` या विषयावर प्रत्यक्ष भेटून बोलू , अशा आशयाच साध दोन ओळींच उत्तर लिहिल . निदान ती परत विनोद बरोबर राहायला उत्सुक आहे असा गैरसमज तरी त्याचा होऊ नये . अर्थात प्रत्यक्ष भेटल्यावर तिचा हा पावित्रा  कायम राहीलच याची तिलाही खात्री नव्हतीच. इतक्या महिन्यांनी विनोदला भेटण्याच्या विचारांनीच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती.
किती घोर फसवणूक करत होता विनोद - प्रेमाचा वर्षाव , एकत्र सिनेमाला जाण , स्वयंपाकात मदत करण आणि त्याच वेळी प्रतारणा देखील. कधी वागण्यात फरक नाही कि आवाजात कंप नाही. संशय कधी मनाला शिवला देखील नाही .
लता बरोबर न राहण्याचा निर्णय विनोद्नी तिला सांगितला तेव्हा सुद्धा त्याच्या आवाजात कंप नव्हता .
`` पण का ? का राहायच नाही एकत्र ? माझं  काय चुकलं ? मी काय केल ? '' ती परतपरत विचारत राहिली - या सगळ्याला केवळ तीच जबाबदार असल्याची खात्री असल्यासारखी .
`` नाही चूक माझीच आहे . माझाच संयम सुटला ; मीच मोहात पडलो '', विनोदनी प्रांजळपणे कबुली दिली .
अर्थात या प्रामाणिकपणा मागे परस्पर संमतीने घटस्फोट सहज विनासायास  मिळावा हा डाव होता हे तिला जर उशीराच उमगले .
दोन पैकी नक्की कोणते उत्तर विनोदला पाठवावे याचा निर्णय अजून होत नव्हता . तिनी दोन्ही उत्तरं पर्समध्ये ठेवली .
विनोदच्या इमेलवर विचार करून उत्तर लिहिण्यात तिला रात्री झोपायला उशीर झाला; पर्यायाने दुसऱ्या दिवशी उशीराच जाग आली . सगळ्या आवराआवरीत रोजच्यापेक्षा जवळजवळ तासभर उशीर झाला पण कधी तरी ऑफीसला तासभर उशिरा जाऊन चालण्यासारखे असल्या मुले ती तशी आरामातच होती . आजचा दिवस तिला छान प्रसन्न वाटला . आता ती तशी मुंबईच्या वातावरणात रुळू लागली होती . काळाच्या ओघात माणसाला कसलीही सवय होते - एकटेपणा , गर्दी, धक्काबुक्की .
रोजच्या ९. ४२ फास्ट पेक्षा आजच्या १०. ४८ फास्ट मधली वेगळी गर्दी , नवीन अपरिचित चेहरे .
    ``फक्त शंभर रुपये मॅडम, मला माझ्या गोव्याच्या घरी जायला फक्त शंभर रुपये हवेत ''
त्या माणसानी अर्थात तिला ओळखले नव्हते । कदाचित एवढ्या गर्दीत रोज अनेकांची फसवणूक करून चेहरे लक्षात ठेवणे कठीण जात असेल .

लताचे डोळे पाण्यानी डबडबले . तिनी पर्स उघडली . 
काही क्षणात विनोदला लिहिलेल्या दोन्ही उत्तरांचे चिटोरे खिडकी बाहेर वाऱ्यावर भिरभिरत होते.  

Thursday, 4 December 2014

लढा

यवतमाळ जिल्ह्यात कंत्राटी ठेकेदारांनी केसांच्या पिना, टिकल्या अश्या क्षुल्लक वस्तुंचा मोह दाखवून गरीब आदिवासी मुलींची फसवणूक केली. आज शेकोडो कुमारी माता येथे तोंड लपवून जगत असल्याची धक्कादायक बातमी नुकतीच उजेडात आली .  त्या निमित्ताने...........

      लढा

जगणे झाले दुरापास्त मुली झाल्या स्वस्त
पिना टिकल्यांच्या बदल्यात शील झाले भ्रष्ट

कुणीही वापरा , कशिही  नागवा
कुणी काढा कसलाही फतवा
मानसिकता कधीच न ही बदलायाची
दोन पायांची वस्तु  ही भोगायाची

घाबरून सोसून चालत नाही
पदरी काहीच पडत नाही
झगडल्याशिवाय मिळत नाही
न्यायही याला अपवाद नाही

आत्मसन्मानार्थ द्रौपदी लढली
अपमानाची ठिणगी पेटती ठेवली
आत्मसन्मानाच्या महाकुंडात
नराधमांची राख  केली

अपहरण, वस्त्रहरण चालुच  आहे
दुर्योधन , दुशासन पिसाट  आहेत  
गरजच आहे आता पुन्हा महाभारत घडण्याची
अगदी शेवटपर्यंत लढण्याची

उठा  हो जागा द्रौपदी सकला
एकजुटीने पेटवा वणवा
नकोच अर्जून वा कृष्ण सखा
तुम्हीच लढा तुमच्या स्वबला

नुरलेच काही गमवायाला
लढा आता केवळ जिंकायाला

Saturday, 29 November 2014

डॅफोडिल्स्

सर्वदूर हिंडता जलदापरी
अचानकच येती सामोरी
डॅफोडिल्स्  सुंदर सोनेरी
तळ्य़ाकाठी तरुभोवती
 नाचती गाती डोलती
पवनासंगे  झुलती 

कटाक्षात येती लक्षलक्ष हे सारे
आनंदविभोर फेर धरती सारे
नाभोगणातील लखलखते तारे
पसरती अथांग ओळीत सारे
त्यासम भासती मज हे सारे

जलदलहरी आनंदे उधाण भरती
पण हे त्यावरही मात करती
आनंदे न्हाऊन निघाले 
कविमन हे यांच्यासंगती
अनिमिष लोचनी दिव्य देखता
खुळाची झालो बघताबघता
विचारच मनी जरा न शिवला
दिव्या खजिना निसर्गे  दावला

उदास खिन्न मानसी गमता
कधी कुठे निवांत बसता
रिकाम्या मनी एकांत क्षणी
झळकती अचानक मनपटलावरी
सुखानंदी आरूढ मन हे माझे
नाचते डोलते डॅफोडिल्स् संगे

( an attempt of free trancreation of Wordsworth's `Daffodils' ) 

Tuesday, 3 June 2014

प्रतीक्षा पावसाची

प्रतीक्षा पावसाची

वाट पहातेय पावसाची
गडगडणा-या नभांची, कडाडणा-या विजेची
पहिल्या वहिल्या सरीची, चिंबचिंब भिजण्याची
तप्त मनाला तृप्त शांत करण्याची
मृद्गंध श्वासात भरण्याची
दर वर्षीचा तोच आनंद पुन्हा नव्याने घेण्याची
वाट पहातेय पावसाची

वाट पहातेय पावसाची
आणून डोळ्यांत पाणी, बाळगून आशा उरी
वेळीच यावा, मनमुराद बरसावा, मनमानी नसावा
पापणी लवता मनी साशंकता
राहील का कुंकू अबाधीत यंदा ?
उरी भरून अगतीकता, करतेय पावसाची प्रतीक्षा

Tuesday, 18 March 2014

जागतिक चिमणिदिनानिमित्ताने


 २० मार्च,  जागतिक चिमणिदिन !  
शहरातील पर्यावरणीय बदलांमुळे चिमण्या ( house sparrows ) व इतर पक्ष्यांच्या ( common birds ) रोडावत जाणा-या संख्येविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने `द नेचर फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंङीया या संस्थेने फ्रान्स व इतर अनेक देशांतील संस्थांच्या मदतीने सुरू केलेला हा उप्रकम. सर्व प्रथम २०१० मध्ये काही देशांमधे जागतिक चिमणिदिन पाळला गेला. या निमित्ताने जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक मोहिमा, कलास्पर्धा, चिमण्यांची मिरवणुक व इतर अनेक उपक्रम राबवले जातात. २०११ पासून तर ` स्पॅरो अवॅार्डस् ही सुरू करण्यात आले आहेत. कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय अथवा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो. उपक्रम स्तुत्य असला तरी आपल्या सर्वांच्याच बालपणाशी नात जोडणा-या चिमणिसाठी हे करण्याची पाळी यावी याची खंत वाटली.
चिमणी म्हणताच रम्य बालपण आठवण साहजिकच. चिमणी व बाळ हे नातच अतूट. लगेचच आई अथवा आजी वा आजोबांच्या कडेवर बसून अंगणातली दाणा टिपणारी चिऊ कुतुहलाने बघणा-या बाळाचे दृष्य डोळ्यांसमोर तरळते. बाळाच्या प्रत्येक जेवणात चिऊचा एक घास हक्काचा ठरलेला. कदाचित् आजपावेतो प्रत्येक घरात पिढ्यान् पिढ्या बाळाला सांगितली जाणारी पहिली गोष्ट चिऊताईचीच असेल. ` एक चिऊ आली आणि दाणा देऊन गेली व     ` एक होती चिऊ व एक होता काऊ या गोष्टींशिवाय बालपण अपू्र्णच वाटत.
लहानपणी आम्ही रहात असलेल्या वाड्याच्या चारी बाजुंनी ऐसपैस आंगण होते व त्याला मेंदी, टगर, जास्वंद, गुलाब, आंबा, पेरू, इ. आजीने लावलेल्या झाडांचे कुंपण. त्यामुळे चिमणी, कावळे, पोपट, साळुंकी अशा पक्षांचा मुबलक सहवास. चिमण्यांचा तर आंगणात व घरात सतत चिवचिवाट व मुक्त संचार असायचा. कधीकधी तर त्यांच्या चिवचिवाटाला कंटाळून त्यांना घरातून हुश्श्य करायला लागायचे. पण चिमणिचं घरटुल व त्यातील चिमणबाळ पहायला मोठी मजा यायची. बालपणी पक्षी पाळण्याचे दादाचं एक मोठं स्वप्न होतं आणि त्याला अर्थातच वाड्यातील सर्वच बालगोपाळांचा पाठींबा होता. मे महिन्याच्या सुट्टीत कधितरी चिमणी पकडून पाळण्याचे खुळ डोकं वर काढायचे. मग घरात घुसलेल्या एकट्या चिमणीला हळुच दारखिडक्या बंद करून पकडण्याचा प्रयत्न होई. चिमुकला जीव बिचारा घाबरून घरभर उडायचा व दमून एखाद्या फोटोफ्रेमचा आसरा घ्यायचा. मग आईला अथवा आजीला सुगावा लागला की मुक्या जिवाला असा त्रास नाही द्यायचा अशी दटावणी करून कोंडलेल्या चिमणीची सुटका करायला लावायचे.

बालपण सरून शाळा, कॉलेज व नंतर नोकरीच्या धकाधकीत रोजच्या जीवनात चिमणीचं स्थान जरा मागेच पडलं. पुढे चिऊची आठवण झाली पहिलं चिमुकलं जन्मल्यावर. तोवर सर्वत्र वाडा व आंगण संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती बोकाळली होती. त्यामुळे बाल्कनीच्या खिडक्या उघडल्यावरच चिमण्यांशी संपर्क येऊ लागला.थोडक्यात्, सकाळ होताच हक्कानी घरात घुसून मुक्त संचार करणा-या, चिवचिवाट करून कधी झोपमोड करणा-या चिमण्यांना घरप्रवेश सहजसोप्पा नव्हता. सकाळी बाल्कनीच्या खिडक्या उघडल्या की जणु वाट पहात असल्यासारख्या दोन- चार चिमण्या घरात घुसून भुर्रर्र उडत रहायच्या व त्यांना टकमक पहात पाळण्यातली चिमणी जोरदार हातपाय हलवायची.चिमण्यांचा हा रोजचा खेळ पहायला फार मजा यायची ( व्हिडिओ शुट करायला तेव्हा स्मार्टफोन नव्हता याची आता खंत वाटते.)
पाच वर्षांनी दुसरी चिमणी जन्मल्यावर अचानक जाणवलं की चिऊताईच गायब झालेय. काऊ, कबु, क्वचित् पोपटही दिसतोय पण चिऊताई काही दिसेना. घराच्या आजुबाजुला भरपुर झाडं, काही झाडांच्या फांद्या अगदी खिडकी बाल्कनीपर्यंत टेकलेल्या. त्यावरून येऊन खारूताईपण सर्रास घरात फेरफटका मारून जाताहेत. मग चिऊताई गेली कुठे. विचार करता लक्षात आलं, शहरात उभ्या राहिलेल्या कल्पक रचनेच्या उंच चकाचक इमारतिंच्या जंगलात पक्षांचे घरटी बांधायचे कोनाडे गायब झाले. घरात पक्षांनी घरटी बांधून घाण करू नये म्हणून पक्षांना अटकाव करण्यासाठी खिडक्या बाल्कन्यांना जाळ्यांनी वेढले. वाडे गेले, अंगणे गेली, रेडी रिफाइंड फुडच्या जमान्यात दारात बसून धान्य निवडताना अंगणातील पक्षांना दाणा टाकणा-या आज्या व आया गेल्या. थोडक्यात, काळाच्या प्रवाहात बदलती जीवनशैली अंगिकारताना आपणच चिऊला हद्दपार केलं. त्यात भर सर्वत्र बोकाळलेल्या मोबाईलची. शहरात प्रत्येकाच्या हाती  मोबाईल आला व मोबाईल टॉवर्सची संख्या वाढली अन् फटका बसला चिमण्या जिवाला. मोबाईल टॉवर्सच्या लहरींमुळे चिमण्यांच्या प्रजननक्षमतेवर दुष्परीणाम होऊ लागले. साहजिकच चिऊ दिसणं दुरापास्त झालं.
वास्तविकतः वाघ जेवढा पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करतो तेवढाच मोलाचा वाटा चिमुकल्या चिमणिचाही आहे हा विचार कधी आपण केलाच नाही. अलिकडेच मोहम्मद दिलावर हे पर्यावरणशास्त्र अभ्यासक व इतर पक्षिमित्र मिळून चिमण्या वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्नशील असल्याचे वाचनात आले. अवतिभोवती चिवचिवणा-या चिमण्यापाहून त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे जाणवते व मनाला समाधान वाटते. हो, आता पुढच्या पिढीला उड्या मारत दाणे टिपणारी चिऊ मोबाईल अथवा इंटरनेटवरच दाखवायला लागणार असच वाटू लागलं होतं. अवतिभोवती वावरणा-या ख-या काऊ, चिऊ, माऊ, भुभू शिवाय बालपण ही कल्पनाच करवत नाही.
आजकाल बाल्कनीत कुड्यांमधील झाडांत धुडगुस घालणा-या, कोवळी पाने कुरतडणा-या चिमण्या बघून समाधान वाटते व आपोआपच चेह-यावर स्मितलकेर उमटते.