शहरातील पर्यावरणीय बदलांमुळे चिमण्या ( house sparrows ) व इतर पक्ष्यांच्या ( common birds ) रोडावत जाणा-या संख्येविषयी जागरूकता निर्माण
करण्याच्या हेतुने `द नेचर फॉरएव्हर सोसायटी
ऑफ इंङीया ‘ या संस्थेने फ्रान्स व
इतर अनेक देशांतील संस्थांच्या मदतीने सुरू केलेला हा उप्रकम. सर्व प्रथम २०१०
मध्ये काही देशांमधे जागतिक चिमणिदिन पाळला गेला. या निमित्ताने जागरूकता निर्माण
करण्यासाठी अनेक मोहिमा, कलास्पर्धा,
चिमण्यांची मिरवणुक व इतर अनेक उपक्रम राबवले
जातात. २०११ पासून तर ` स्पॅरो अवॅार्डस्
‘ ही सुरू करण्यात आले आहेत. कुठल्याही सरकारी
अनुदानाशिवाय अथवा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वयंप्रेरणेने पर्यावरण
वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो. उपक्रम स्तुत्य असला
तरी आपल्या सर्वांच्याच बालपणाशी नात जोडणा-या चिमणिसाठी हे करण्याची पाळी यावी
याची खंत वाटली.
चिमणी म्हणताच
रम्य बालपण आठवण साहजिकच. चिमणी व बाळ हे
नातच अतूट. लगेचच आई अथवा आजी वा आजोबांच्या कडेवर बसून अंगणातली दाणा टिपणारी चिऊ
कुतुहलाने बघणा-या बाळाचे दृष्य डोळ्यांसमोर तरळते. बाळाच्या प्रत्येक जेवणात चिऊचा एक घास हक्काचा ठरलेला. कदाचित् आजपावेतो प्रत्येक घरात पिढ्यान्
पिढ्या बाळाला सांगितली जाणारी पहिली गोष्ट चिऊताईचीच असेल. ` एक चिऊ आली आणि दाणा देऊन गेली ‘ व ` एक होती चिऊ व एक
होता काऊ
‘ या गोष्टींशिवाय बालपण अपू्र्णच वाटत.
लहानपणी आम्ही
रहात असलेल्या वाड्याच्या चारी बाजुंनी ऐसपैस आंगण होते व त्याला मेंदी, टगर, जास्वंद, गुलाब, आंबा, पेरू, इ. आजीने लावलेल्या
झाडांचे कुंपण. त्यामुळे चिमणी, कावळे, पोपट, साळुंकी अशा पक्षांचा मुबलक सहवास. चिमण्यांचा तर आंगणात व घरात सतत चिवचिवाट
व मुक्त संचार असायचा. कधीकधी तर त्यांच्या चिवचिवाटाला कंटाळून त्यांना घरातून
हुश्श्य करायला लागायचे. पण चिमणिचं घरटुल व
त्यातील चिमणबाळ पहायला मोठी मजा यायची. बालपणी पक्षी
पाळण्याचे दादाचं एक मोठं स्वप्न होतं आणि त्याला अर्थातच वाड्यातील सर्वच बालगोपाळांचा
पाठींबा होता. मे महिन्याच्या सुट्टीत कधितरी चिमणी पकडून पाळण्याचे खुळ डोकं वर
काढायचे. मग घरात घुसलेल्या एकट्या चिमणीला हळुच दारखिडक्या बंद करून पकडण्याचा
प्रयत्न होई. चिमुकला जीव बिचारा घाबरून घरभर उडायचा व दमून एखाद्या फोटोफ्रेमचा
आसरा घ्यायचा. मग आईला अथवा आजीला सुगावा लागला की मुक्या जिवाला असा त्रास नाही
द्यायचा अशी दटावणी करून कोंडलेल्या चिमणीची सुटका करायला लावायचे.
बालपण सरून शाळा,
कॉलेज व नंतर नोकरीच्या धकाधकीत रोजच्या जीवनात
चिमणीचं स्थान जरा मागेच पडलं. पुढे चिऊची आठवण झाली पहिलं चिमुकलं जन्मल्यावर.
तोवर सर्वत्र वाडा व आंगण संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती बोकाळली होती. त्यामुळे
बाल्कनीच्या खिडक्या उघडल्यावरच चिमण्यांशी संपर्क येऊ लागला.थोडक्यात्, सकाळ होताच हक्कानी घरात घुसून मुक्त संचार
करणा-या, चिवचिवाट करून कधी झोपमोड
करणा-या चिमण्यांना घरप्रवेश सहजसोप्पा नव्हता. सकाळी बाल्कनीच्या खिडक्या उघडल्या
की जणु वाट पहात असल्यासारख्या दोन- चार चिमण्या घरात घुसून भुर्रर्र उडत रहायच्या
व त्यांना टकमक पहात पाळण्यातली चिमणी जोरदार हातपाय हलवायची.चिमण्यांचा हा रोजचा
खेळ पहायला फार मजा यायची ( व्हिडिओ शुट करायला तेव्हा स्मार्टफोन नव्हता याची आता
खंत वाटते.)
पाच वर्षांनी
दुसरी चिमणी जन्मल्यावर अचानक जाणवलं की चिऊताईच गायब झालेय. काऊ, कबु, क्वचित् पोपटही दिसतोय पण चिऊताई काही दिसेना. घराच्या
आजुबाजुला भरपुर झाडं, काही झाडांच्या फांद्या अगदी खिडकी
बाल्कनीपर्यंत टेकलेल्या. त्यावरून येऊन खारूताईपण सर्रास घरात फेरफटका मारून
जाताहेत. मग चिऊताई गेली कुठे. विचार करता लक्षात आलं, शहरात उभ्या राहिलेल्या कल्पक रचनेच्या उंच चकाचक इमारतिंच्या जंगलात पक्षांचे
घरटी बांधायचे कोनाडे गायब झाले. घरात पक्षांनी घरटी बांधून घाण करू नये म्हणून
पक्षांना अटकाव करण्यासाठी खिडक्या बाल्कन्यांना जाळ्यांनी वेढले. वाडे गेले, अंगणे गेली, रेडी रिफाइंड फुडच्या जमान्यात दारात बसून
धान्य निवडताना अंगणातील पक्षांना दाणा टाकणा-या आज्या व आया गेल्या. थोडक्यात, काळाच्या प्रवाहात बदलती जीवनशैली अंगिकारताना आपणच चिऊला हद्दपार केलं. त्यात
भर सर्वत्र बोकाळलेल्या मोबाईलची. शहरात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला व मोबाईल टॉवर्सची संख्या वाढली अन्
फटका बसला चिमण्या जिवाला. मोबाईल टॉवर्सच्या लहरींमुळे चिमण्यांच्या
प्रजननक्षमतेवर दुष्परीणाम होऊ लागले. साहजिकच चिऊ दिसणं दुरापास्त झालं.
वास्तविकतः वाघ
जेवढा पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करतो तेवढाच मोलाचा वाटा चिमुकल्या चिमणिचाही
आहे हा विचार कधी आपण केलाच नाही. अलिकडेच मोहम्मद दिलावर हे पर्यावरणशास्त्र
अभ्यासक व इतर पक्षिमित्र मिळून चिमण्या वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्नशील असल्याचे
वाचनात आले. अवतिभोवती चिवचिवणा-या चिमण्यापाहून त्यांच्या प्रयत्नांना यश येत
असल्याचे जाणवते व मनाला समाधान वाटते. हो, आता पुढच्या पिढीला उड्या
मारत दाणे टिपणारी चिऊ मोबाईल अथवा इंटरनेटवरच दाखवायला लागणार असच वाटू लागलं
होतं. अवतिभोवती वावरणा-या ख-या काऊ, चिऊ, माऊ, भुभू शिवाय बालपण ही कल्पनाच करवत नाही.
आजकाल बाल्कनीत
कुड्यांमधील झाडांत धुडगुस घालणा-या, कोवळी पाने कुरतडणा-या
चिमण्या बघून समाधान वाटते व आपोआपच चेह-यावर स्मितलकेर उमटते.
छानच लिहिलयस की ग ....खरच जुने दिवस आठवले. एक खूप जुनी कविता पण आठवली "क्षणो क्षणी पडे .. परी बळे उठे .. उडे बापडी" .... मध्ये मध्ये क्रीयापदाविना वाक्य सोडून देण्याची तुझी शैली खूपच सुरेख आहे. माझ्या फुटकळ लिखाणापेक्षा हे खूप सुंदर आहे. तू लिहीत रहा ग .. आम्ही चांगले चांगले लेख आणि विचारांना मुकतोय.
ReplyDelete