करोना आणि मासे
१२ एप्रिलच्या लोकसत्ता बालमैफिलीत प्रकाशीत
(करोनाच्या पार्श्वभूमीवर सागरीजीवनात
मारलेला काल्पनीक फेरफटका - हलका फुलका; अंतर्मुख करणारा)
मत्स्यनगरीत पापलेटबाई आजकाल
काहीश्या संभ्रमित होत्या. अचानक अलीकडे जरा गर्दी वाढलेली वाटत होती. कालच मि. पापलेट
त्रागा करत होते, `` आजकाल चांगले ऐसपैस
पोहता येत नाही. पोरांना शिस्तीत पोहता येत नाही; सारखी मधेमधे येतात. अंग कसं आखडून गेल्यासारखं वाटतंय.''
सकाळचा फेरफटका पापलेटबाईंनी
सुरमईअळीच्या अंगानी मारला तर तिथे पण नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटली. संध्याकाळी पापलेट
भाऊंना घरी यायला जरा उशीरच झाला. कारण विचारलं तर म्हणे बोंबील कट्ट्यावर आज बरेचजण
भेटले, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात
वेळ गेला. अलीकडे मुलं एकसारखी तोंड वासून खायला मागत नव्हती. स्वतःच कोलंब्या गट्ट
करून आपलं पोट भरत होती. हल्ली पाणिही कमी प्रदूषित वाटत
होतं.
बराच विचार करूनही काही उमजेना
तेव्हा त्यांनी थेट आपल्या भावाशी म्हणजेच हलव्याशी संवाद साधला. हलवाभाऊंनी बहिणीच्या
निरीक्षणाला दुजोरा दिला, `` खरंय गं; आमच्याकडे पण अलीकडे गर्दी वाढलेय. शोध घ्यायला
पाहिजे.''
रात्री पापलेटबाईंनी पापलेट
भाऊंच्या कानावर आपला गोंधळ घातला. नेहमी प्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव
आणला पण थोडे विचारात पडले. बाजूला पोरांच्या कंपूत जरा जास्त खुसखुस वाटल्यामुळे त्यांनीं
पोरांना फटकारले.
सकाळपासून पोरं गायब असल्यामुळे
पापलेटबाई सचिंत होत्या. पोरांचा शोध घेत फिरता फिरता त्यांना बांगडे वहिनी भेटल्या.
त्याही मुलांचाच शोध घेत होत्या. ``हल्ली भारीच द्वाड
झालेत मुलं ! काल पण अशीच बराच वेळ गायब होती. कुठे जातात कोण जाणे ,'' बांगडे वहिनी म्हणाल्या. आल्यावर खरपूस समाचार घ्यायला
हवा या विचारावर दोघी सहमत होऊन निरोप घेणार तेवढ्यात मुलं उड्या मारत येताना दिसली.
एखादं अडवेंचर करून आल्याच्या आनंदात उसळत तरंगत होती. खडसावून विचारल्यावर लांबवर
किनार्याच्या दिशेकडे पोहून आल्याचं म्हणाली. पापलेट बाईंनी शेपटीनी पोरांना फटकारलं,
``किती वेळा सांगितलं तिथे जाऊ नका, माणसं पकडतात. तरी नाही ऐकायचं, नसते धंदे करतात,''
``पण काकू हल्ली तिथे
कुणीच नसतं आम्ही रोजच जातो,'' इति बांगडे पिल्लावळ.
``हो, तिथे किती मजा आली. मी पाण्याच्या वर जाऊन आलो आणि
वरचं निळंशार आकाश पण बघितलं, '' कावळटाच्या या चिवचिवटानी
पापलेटबाई अधिकच संभ्रमित झाल्या.
आता मात्र मत्स्य नगरीत हा
एक चर्चेचा व चिंतनाचा विषय झाला. पापलेट भाऊंनी हलवा, सरंगा , बोंबील, बांगडा, घोळ, पाला ई सर्वांची मिटिंग
भरवली. पापलेट भाऊंनी विषयाला हात घातला. ``आजकाल बोटी व माणसं कमी दिसतात खरी'' सरंग्यानी दुजोरा दिला. बहिणीशी हा विषय आधीच झाला असल्यामुळे
हलवाभाऊ तयारीनिशी आले होते. त्यांनी आधीच खेकडे भाऊंना कामाला लावले होते. आजकाल खेकडेवाडीत
माणसं खेकडे पकडायला येत नसल्याची, इतकेच नव्हे तर आजकाल
समुद्र किनारे सुद्धा ओस असतात त्यामुळे खेकड्यांची
पोरं समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालू शकतात अशी ग्वाही खेकडे भाऊंनी दिली.
माणसं अलीकडे कुणा सूक्ष्म जिवाणूच्या भीतीनं घरीच दडी मारून बसल्याची गोटातली खबर
त्यांनी काढली होती.
हे ऐकताच सर्व मत्स्य आयांचा
जीव भांड्यात पडला; `` चला, सध्या तरी मुलांची काळजी नाही, जरा मोकळेपणानी पोहतील तरी.''
तेवढ्यात माश्यांची काही पोर
तोंडात नवीनच काही धरून येताना दिसली. खेकड्यानी लगेच ते ओळखलं, ``आजकाल माणसं विषाणूच्या भितीनी तोंडाला हे बांधून
फिरतात. समुद्रकिनारी अशी बरीच पडली होती''.
हे ऐकताच सर्वांच्या छातीत
धडकी भरली,
अरे बापरे ! म्हणजे माणसांमुळे
येऊ घातलेलं हे आणखी एक संकट !
कीर्ति कुळकर्णी
०४. ०४. २०२०
No comments:
Post a Comment