Tuesday, 31 July 2018

पुस्तक परीक्षण - काबूल ,कंदाहारकडील कथा


काबूल ,कंदाहारकडील कथा
                   - प्रतिभा रानडे

अफगाणिस्तानातील एकंदरीत राजकीय उलथापालथ व त्यात होरपळणारे नागरीक, विशेषतः स्त्रिया यांविषयी विविध माध्यमांतून ऐकून, वाचून आहोतच. त्यामुळेच    `अफगाणिस्तानातील रहिवाश्यांच्या जीवनातील व्यथा मांडणाऱ्या हृदयस्पर्शी कथा ' असं पुस्तकाच संक्षिप्त वर्णन वाचून पुस्तक विकत घेतलं. खरोखरीच केवळ या सात शब्दांत, नऊ कथा असलेल्या या कथासंग्रहाचा गाभा चपखल  मांडलाय. पार्श्वभूमी अफगाणिस्तान असल्यामुळे स्थानिक व आंतरराष्ट्रीय राजकीय संदर्भ येणारच. ही  पार्श्वभूमी नीट समजण्यासाठी थोडं गुगल करून अफगाणिस्तानच्या राजकीय घडामोडींची अधीक सुस्पष्टता आली ( अर्थात कथा समजण्यासाठी याची आवश्यकता नाही ) ही पण या पुस्तकाची जमेची बाजू.
माणसांची दुःख. भावनीक घालमेल, हुरहूर ही सर्व काळी व स्थळी सारखीच असतात असं आपण मानतो आणि अर्थात बरेचदा ती तशीच असतात पण जेव्हा ही दुःख त्या प्रांताच्या राजकीय उलथापालथी मुळे व त्या अनुषंगाने सामाजिक  शोषण व अत्याचारामुळे वाट्याला येतात तेव्हा या दुःखांची जातच वेगळी असते.
अमेरिकेत शिकलेला व देशाच्या नवनिर्माणासाठी काम करण्याच्या उद्देशाने परत आलेला, बदलाचे वारे वेगळ्याच दिशेनी वाहत असल्याच्या जाणिवेने प्रथम गोंधळला व नंतर हादरलेला व शेवटी राजकीय बदलानंतर स्वतःच्याच देशात परदेशी झालेला, सतत भीतीच्या सावटात जगणारा अन्वर सलीम सर्व स्तरातील लोकांच्या रोजच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतो.
उतार वयात नवरा दुसरी बायको आणेल या भितीनी तरुण दिसण्यासाठी ब्युटी पार्लरला आलेली मिसेस रहिमी व योगायोगाने त्याच पार्लर मध्ये आलेली तरुण , सुंदर, शिकलेली व मिसेस राहिमिच्याच नवऱ्याशी मनाविरुद्ध लग्न करायला भाग पडणारी झीनत; कुठलाही गुन्हा नसताना राज्यकर्त्यांनी तुरुंगात डांबून अत्याचार केलेली नुरजाद या तेथील समस्त स्त्रियांच दुःख अधोरेखीत करतात.
मुजाहिदींच्या हल्यात बळी गेलेल्या  हॉकीपटू बलबीर सिंगच्या निमित्ताने आंतराष्ट्रीय राजकारण व त्यापुढे कःपदार्थ ठरणारं वैयक्तिक नुकसान यावर पडणारा प्रकाशझोत अंतर्मुख करतो. लेखिका त्याही पुढे जाऊन कल्पनेच्या आधारे मृत बलबीर सिंगच्या आत्म्याची तडफड, बेवारश्यासारखे एका परकीय जमिनीत गाडलं  गेल्याचा   सल व पडणारे प्रश्न  मांडते व परदेशात  सतत भीतीच्या सावटात राहणाऱ्या सर्वांच्याच मनात खोलवर या शक्यता सतत तरळत असतात हे नमूद करून तेथील दशतवादाची तीव्रता जाणवून  देते .
`लिहायची राहून गेलेली एक कादंबरी ' हि या संग्रहातील एक वेगळी कथा. यात लेखिका कादंबरीसाठीअफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पार्शवभूमीवर  सुचलेला विषय, त्यासाठी केलेली तयारी, वाचन, अभ्यास, तेथील स्थळांना प्रत्यक्षात दिलेल्या भेटी , त्यातून आकाराला आलेली `शेवटचा माणूस ' ही  कथा यांचे सविस्तर वर्णन करते. यातून लेखिकेची चिकाटी, अभ्यासूवृत्ती, सच्चेपणा दिसतो.
एक वेगळा वाचनानंद देणारा हा कथासंग्रह अतिशय वाचनीय. 

No comments:

Post a Comment