चाफा सर्व प्रथम भेटला लहानपणी अंगणात. अंगणातच देवचाफ्याचे झाड होते. पूजेला त्याची फुलं आजी बरोबर तोडण्याचा रोजचा नेम होता. छान झाडावरच ताज फुल तोडून त्याच्या पाकळ्या उलट्या बाजूला मुडपून देठात अडकवायच्या आणि मग ते फुल अंगठी म्हणून बोटात पकडायचे व अधूनमधून त्याचा सुगंधही घ्यायचा. बालपणीच्या साध्या निर्भेळ आनंदातला तो एक !
कवठी चाफा गौरीच्या पूजेला पाहायला मिळायचा पण हिरवा चाफा मात्र त्यावेळी फक्त माणिक वर्मांच्या गाण्यात ऐकायला मिळायचा. पण एक दिवस अचानक ``लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का '' या ओळींचे प्रत्यंतर आले. झाले असे कि, साधारण बारा तेरा वर्षांची असताना बांद्राला मामीच्या माहेरी गेले असता त्यांच्या बंगल्यात घमघमाट सुटला होता. चौकशी करता कळले की पाठीमागच्या प्रचंड मोठ्या व दूरवर पसरलेल्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या चाफ्याचे झाड होते व त्यावर फुललेल्या फुलाचा सुगंध लांब बंगल्यात दरवळत होता.
चाफ्याच्या सुगंधाची एक गंमत आहे. निदान माझ्या बाबतीत तरी हे होत. गुलाबाच्या फुलांचा वास आला की म्हणतो, ``व्वा गुलाबाचा वास छान आहे '' आणि अलगद तो हुंगतो. रातराणी आणि मदनबाण तर धुंदच करतात. मोगरा छान फुललाय वास मस्त सुटलाय म्हणतो. पण चाफ्याची तऱ्हा ज़रा न्यारीच ! चाफ्याचा वास आला की प्रथम अनाहुतपणे चमकायलाच होत - अचानक खडबडून भानावर आल्यासारख आणि तोंडातून सहज आनंदोच्चार ओघळतात - अरे व्वा चाफा ! जणू काही किती अवकाशानंतर भेंट झाली. गंमत म्हणजे प्रत्येक वेळेस हेच होत.
No comments:
Post a Comment