मे महिन्यातलं रणरणतं ऊन. मुंबईतल्या बांद्राकुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीच्या अमेरिकन वकिलातीच्या बाहेर व्हिसासाठी भली मोठी रांग. माझ्या बाजूला एक मध्यमवयीन जोडपं.
‘‘तुम्ही स्वत: जाताय का अमेरिकेत फिरायला?’’
‘‘नाही. मुलगा गेलाय आत मुलाखतीला; तो चाललाय शिकायला तिकडे !’’ - उत्तरात वडिलांचा मुलाबद्दलचा रास्त अभिमान.
‘‘अरे व्वा ! मग, तयारी झाली बाकीची?’’
‘‘हो. आर्थिक तयारी पहिल्यापासून ठेवलीच होती. शैक्षणिक कर्जाचं कामही पटकन झालं. बाकी काय, हल्ली मुलांना आपल्यापेक्षा जास्त समजतं. त्यांचं नेटवर्किग जोरदार असतं. तेच नेट, गुगल वगैरेवरून सगळी माहिती काढतात. त्यांचं तेच बघतात. आपण फक्त त्यांना काय लागेल ते पुरवायचं, मदतनीस म्हणून! आता व्हिसा झाला की फक्त पॅकिंग !’’ -अगदी साचेबंद आणि अपेक्षित उत्तर.
तेवढय़ात मुलगा उजळ आनंदी हस:या चेह:यानं येताना दिसला. झालं, काम फत्ते ! आता अमेरिकेला शिकायला जाणं निश्चित.
माउलीचे डोळे अचानक पाण्यानं भरले.
अश्रू आनंदाचे की दु:खाचे ही संभ्रमावस्था.
माझ्या मनात मात्र प्रश्नचिन्ह. ‘खरंच यांची तयारी पूर्ण झालीय?’
‘हाऊ टू प्रिपेअर फॉर स्टडी अब्रॉड’ वगैरे तत्सम गुगल सर्च मारला तर परदेशी शिकायला जाताना काय काय तयारी करावी याच्या ब:याच साइट्स आणि ब्लॉग्ज मिळतात. त्यात प्रामुख्यानं अभ्यासक्रम व विद्यापीठाची निवड, प्रवेशप्रक्रिया व त्यासाठी लागणारी कागदपत्र, पासपोर्ट व व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज कसं मिळवावं, संवादकौशल्य व इंग्रजी सुधारायला काय करावं, जाण्यापूर्वी कोणत्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात, कोणत्या लसी टोचून घ्याव्यात इत्यादी सर्व माहिती इत्थंभूत मिळते. ही सगळी झाली अत्यंत गरजेची व्यावहारिक तयारी.
पण याहीपलीकडे जाऊन काही मूलभूत तयारी अत्यावश्यक असते , स्वत:ची आणि मुलांची! यावर काही विचार?
मुळात आपलं मूल प्रथमच आपल्यापासून दीर्घकाळासाठी हजारो मैल लांब आणि तेही एकटं जाणं हीच एक मोठी भावनिक उलथापालथ करणारी घटना. त्यातून आजकालच्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात तर फारच पोकळी निर्माण करणारी. तेव्हा यासाठी संपूर्ण कुटुंबाची भावनिक स्तरावर काही तयारी असणं अत्यंत गरजेचं असतं.
ब-याचदा अर्ज करणं ते व्हिसा मिळवणं या प्रक्रियांच्या मालिकेत सगळा वेळ भरभर निघून जातो आणि जाणं काही दिवसांवर येऊन थडकतं. ब-याचदा मुलाला निरोप दिल्यावर आई-वडिलांना जाणवत की, या धावपळीत मुलाबरोबर खरंतर वेळ मिळालाच नाही आणि दु:ख अधिकच तीव्र होतं. मुलालाही तिथे पोचल्यावर आता सगळं एकटय़ानं ‘फॅमिली सपोर्ट’ शिवाय करायचंय याची प्रथमच जाणीव होते आणि कुठे एकटं लांब येऊन पडलो या अचानक होणा-या जाणिवेनं जरा जास्तच होमसिक वाटू लागतं. तेव्हा परदेशी जाणारी मुलं, त्यांचे आईबाबा आणि घरातले इतर अशी सगळ्यांची ही भावनिक-मानसिक तयारी अगोदरपासून असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचाही विचार करायला हवाच!
भावनिक-मानसिक तयारीचे काही धडे
1) ब-याच विद्यापीठांमध्ये 2-3 सत्रांपर्यंत (एक सत्र सहा महिन्यांचे) प्रवेश राखून ठेवता येतो. तेव्हा जरुरी वाटल्यास एखादं सत्र उशिरा जावं पण मनाची पूर्ण तयारी करूनच जावं.
2) या कालावधीत संपूर्ण कुटुंबानं एकमेकांसाठी वेळ द्यावा. शक्य असल्यास आठपंधरा दिवस एकत्र फिरुन यावं.
3) घरात पाठोपाठची भावंडं असल्यास त्यांच्याही भावनांचा विचार आवश्यक आहे. कारण जोडीचा भाऊ/बहीण लांब गेल्यावर दुस-याला अचानक एकटं पडल्यासारखं वाटून अभ्यासावर व वागण्यावर परिणाम होऊ शकतो.
4) याबाबत माझ्या मैत्रिणीचं उदाहरण खूप बोलकं आहे. मैत्रिणीच्या मुलीला नोव्हेंबरमध्ये जानेवारीच्या सत्रापासून प्रवेश मिळाल्याचं समजलं. त्याचवेळी धाकटी मुलगी बारावीला होती. तिच्या अभ्यासावर परिणाम नको व मोठीच्या तयारीलाही पुरेसा वेळ मिळावा म्हणून एक सत्र उशिरा जाण्याचा सारासार निर्णय त्या कुटुंबानं घेतला. ज्याचा त्यांना फायदा झाला.
No comments:
Post a Comment