एवढ्या गर्दीत तो
माणुस आपल्याशीच बोलण्याचा प्रयत्न करतोय हे कळायलाच लताला काही वेळ लागला आणि तो
चक्क भीक मागतोय हे समजायला तर आणखी काही क्षण गेले. धडधाकट दिसणारा, चांगले कपडे घातलेला, मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या चार चौघांसारखाच सभ्य दिसणारा हा गृहस्थ चक्क भीक मागतोय ?
`फक्त शंभर रुपये
मॅडम, मला गोव्याला परत
जायला फक्त शंभर रुपयेच हवेत. गोव्याला माझ घर आहे '
लतानी एक दीर्घ श्वास घेतला . तिची पर्सवरची पकड घट्ट
झाली आणि दुसरा हात आपसूकच गळयापाशी गेला
- अलीकडेच घालायच सोडून दिलेलं मंगलसूत्र धरायला. एवढया
प्रचंड गर्दीत या माणसाने नेमकं आपल्यालाच का हेरावं ?
मुंबईच्या
वातावरणाशी ती आता चांगलीच परिचीत झाली होती, पदोपदी सावध राहायला शिकली होती . मुंग्यांसारखी अगणीत माणस
असलेल्या , प्रत्येक श्वासासाठी
झगडाव लागणाऱ्या अफाट गर्दीच्या या मुंबई शहराचा एक भाग होणे नशिबी आल्यावर हे सगळ
भान येण साहजिकच होत - काही पर्यायच नव्हता . अनेकविध प्रकारची माणस - रस्त्यावरचे गुंड, लोचट दुकानदार ,
गर्दीचा फायदा घेऊन बायकांशी लगट करू पहाणारे
ट्रेन मधले आंबटशौकीन , दार खिडक्यामधून
डोकावणारे, संशयित नजरेने पाहणारे
शेजारीपाजारी – या सगळ्यांच्या
नजरा आता तिला परिचीत
झाल्या होत्या . पण हा माणूस तर यांपैकी कुणीच वाटत नव्हता.
`तुम्हाला सांगतो मॅडम, या शहरात चोरांचा इतका सुळसुळाट आहे. काल माझ्या पाकिटात पाच हजार रुपये होते. माझं पाकीट कुणी तरी मारलं. आता माझ्याकडे काहीच नाही - घरी
जाण्या एवढे पैसेही ! मला फक्त माझ्या घरी जायचय – गर्दी , खोटेपणा व
अप्रामाणिकपणापासून दूर.
लताला देखील हेच
हव होतं - या जीवघेण्या गर्दीपासून लांब पळून
जाण्यासाठी तिनी खरं तर काहीही केलं असत.
या एवढ्या गर्दीत
त्या माणसाच्या बोलण्यानी लता एकटीच चक्रावली होती. नाईलाजास्तव जेमतेम सरकून
लताला टेकायला जागा देणारी बाजूची बाई खिडकीतून बाहेर बघत होती. डब्यातले बाकीचे
एकतर वर्तमानपत्रावर नजर खिळवून बसले होते अथवा धावत्या गाडीत जेमतेम दोन पायांवर
उभे राहण्याच्या कसरतीत मग्न होते .या सर्वांसाठी तो केवळ भीक मागण्याचाच एक प्रकार होता. हातांची थोटकी बोटे तोंडासमोर नाचवून भीक
मागण्यापेक्षा एक वेगळा प्रकार, एक बरा बदल बस्स !
तिच्या
ऑफिसमधल्या काही लोकांपेक्षाही जास्त सफाईदार इंग्रजीत तो माणूस बोलत होता,
`` तुम्हाला मी खोट बोलत
असेन असं वाटत असेल न ? मी माझ्या गावचा
एक प्रतिष्ठीत माणूस आहे. अस भीक मागणे मला शोभेल तरी का ? ''
अचानक आवाजात
आर्जव आणून तो म्हणाला , ``तुम्ही या इतर लोकांपेक्षा वेगळ्या वाटता दयाळू
वाटता म्हणून तुम्हाला विनंती करतो. “
तिच्या क्षमाशील
व दयाळू , दुसऱ्यावर पटकन विश्वास
टाकणाच्या स्वभाववृत्तीला आवाहन करणारी कालपासूनची ही दुसरी व्यक्ती !
लतानी हातानीच पर्स मधला विनोदच्या इमेलचा कागद
चाचपडला. काळ आल्या पासून चारचारदा वाचून तो अगदी तोंडपाठ झाला होता .
` लता , तुझी माफी
मागायलाही मला तोंड नाही . मला तुझ्या प्रेमाची किमत कळली नाही . पण आता मला परत
तुझ्याकडे यायचं आहे. तू मला माफ करशील आणि परत पूर्वीसारखच प्रेम
करशील अशी अपेक्षा करतो . मी तुला परत कधीच सोडून न जायचं वचन देतो.'
`मॅडम , मी तुम्हाला माझा
शब्द देतो . मला तुमचा पत्ता द्या. घरी गेल्या गेल्या मी तुम्हाला पैसे पाठवीन. '
एव्हाना त्याच्या
सफाईदार इंग्रजी बोलण्याचे कौतुक व आश्चर्य संपून त्याच्या बडबडीचा वैताग
लताला येऊ लागला होता . भरीतभर म्हणजे आता
आजूबाजूचे लोक या दोघांकडे पाहू लागले होते.
अगदी वृत्तपत्र वाचण्यात दंग असल्याचा बहाणा करणारेही आता कान टवकारून या
दोघांचे संभाषण ऐकू लागले होते. त्यामुळे लताला अगदीच अवघडल्या सारखे झाले . त्या माणसाचा पिच्छा सोडवून घेण्यासाठी तिनी
पर्समध्ये हात चाचपडून एक नोट काढली
``हे पन्नासच रुपये आहेत '
`पण माझ्याकडे द्यायला
अजून नाहीत '
` पण मला हे पुरणार नाहीत .
विश्वास नसेल बसत तर मला काही देऊ नका . विश्वास ठेवा माझ्यावर . मी घरी गेलो की
तुमचे पैसे पाठवतो .'
एव्हाना सर्वच
सहप्रवासी या दोघांकडे उत्सुकतेने एकटक बघू लागले होते त्यामुळे लताला अजूनच अवघडल्यासारखे झाले .
तिनी पर्समधून पटकन एक नोट काढून त्या माणसाला दिली.
`धन्यवाद , आपला पत्ता ? '
लतानी पत्ता
सांगायला सुरुवात केली आणि पत्ता देण शहाणपणाच नाही हे लक्षात येताच थांबली. `नको , असू दे '.
`तुम्ही एवढी दया व विश्वास
दाखवलात, परमेश्वर नक्कीच तुमचं भलं करेल ' , जाता जाता तो माणूस बडबडला . पुढच्याच स्टेशनला
तो माणूस उतरून पटकन गर्दीत दिसेनासा झाला .
गाडी सुरु
झाल्याझाल्या लताच्या बाजूची बाई म्हणाली , ` काही पैसे द्यायला नको होते तुम्ही त्याला. अहो हा यांचा रोजचाच
धंदा आहे .'
` काय माहीत , कदाचीत तो खरही बोलत असेल ' खांदे उडवून लता म्हणाली . इतका वेळ तो माणूस
गळी पडला होता तेव्हा नाही तोंड उघडलं आणि आता सल्ले देते - लताला त्या बाईचा
मनातून खूप राग आला होता . पण राग लपवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली , `` प्रत्येकाला एक संधी तर द्यावीच. कधी कधी
लोकांवर विश्वासही ठेवावा .''
``हो पण मुंबईत तर नक्कीच
नाही '' तोंडावरच हसू लपवीत ती बाई म्हणाली.
``असे सगळ्यांना वाटण्या इतके पैसे माझ्याकडेही असायला हवे होते '' वृत्तपत्राआडून कुणीतरी पुटपुटले.
लतानी सर्वांकडे
दुर्लक्ष केल . सीएसटी स्थानकात गाडी आल्यावर
तिला हायसे वाटले. ऑफिसात लंचब्रेक मध्ये तिनी विनोदच पत्र परत एकदा
शांतपणे वाचले . दिवसभर ती त्याचाच विचार करत होती .
रात्री जेवल्यावर
ती विनोदच्या पत्राला उत्तर लिहायला बसली . उद्या लंचला सगळे बाहेर गेल्यावर फक्त
उत्तर टाईप करण्या एवढाच वेळ तिला ऑफिसमधे मिळणार होता.
दोन तास बसून
लिहिलेल्या सहा पानी उत्तरात तिनी सर्व भावनांना वाट मोकळी करून
दिली होती - विनोदनी दुसऱ्या स्त्रीसाठी सोडल्याचा
धक्का , दु:ख , असुरक्षितता , अपमान , दैनंदीन गरजा
भागवण्यासाठी स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी करायला लागलेली धडपड, आय् टी इंजिनीयरच्या नोकरी निमित्त वाट्याला
आलेले मुंबईतलं धकाधकीचं जीवन आणि सर्वात
महत्वाचा - भीतीदायक एकटेपणा.
पत्र परत वाचताना
लताला शंका आली - कदाचित आपण जर जास्तच मोकळेपणाने सगळ्या भावना व्यक्त केल्यात
आणि त्या पण अशा माणसा जवळ ज्यांनी एकदा आपली फसवणूक केलेय. नाही , आता भावनावश न होता जास्त व्यावहारीक राहायला
हवं .
तिनी परत `
या विषयावर प्रत्यक्ष भेटून बोलू , अशा आशयाचं साधं दोन ओळींचं उत्तर लिहिलं . निदान ती परत विनोद बरोबर राहायला उत्सुक आहे असा गैरसमज तरी त्याचा होऊ
नये . अर्थात प्रत्यक्ष भेटल्यावर तिचा हा पावित्रा कायम राहीलच याची तिलाही खात्री नव्हतीच.
इतक्या महिन्यांनी विनोदला भेटण्याच्या विचारांनीच तिच्या हृदयाची धडधड वाढली
होती.
किती घोर फसवणूक
करत होता विनोद - प्रेमाचा वर्षाव , एकत्र सिनेमाला जाण , स्वयंपाकात मदत
करण आणि त्याच वेळी प्रतारणा देखील. कधी वागण्यात फरक नाही कि आवाजात कंप नाही. संशय कधी मनाला शिवला देखील नाही .
लता बरोबर न
राहण्याचा निर्णय विनोद्नी तिला सांगितला तेव्हा सुद्धा त्याच्या आवाजात कंप
नव्हता .
`` पण का ? का राहायच नाही एकत्र ? माझं काय चुकलं ?
मी काय केल ? '' ती परतपरत विचारत राहिली - या सगळ्याला केवळ तीच जबाबदार
असल्याची खात्री असल्यासारखी .
`` नाही चूक माझीच
आहे . माझाच संयम सुटला ; मीच मोहात पडलो '',
विनोदनी प्रांजळपणे कबुली दिली .
अर्थात या
प्रामाणिकपणा मागे परस्पर संमतीने घटस्फोट सहज विनासायास मिळावा हा डाव होता हे तिला जर उशीराच उमगले .
दोन पैकी नक्की
कोणते उत्तर विनोदला पाठवावे याचा निर्णय अजून होत नव्हता . तिनी दोन्ही उत्तरं पर्समध्ये ठेवली .
विनोदच्या इमेलवर
विचार करून उत्तर लिहिण्यात तिला रात्री झोपायला उशीर झाला; पर्यायाने दुसऱ्या दिवशी उशीराच जाग आली . सगळ्या
आवराआवरीत रोजच्यापेक्षा जवळजवळ तासभर उशीर झाला पण कधी तरी ऑफीसला तासभर उशिरा
जाऊन चालण्यासारखे असल्या मुले ती तशी आरामातच होती . आजचा दिवस तिला छान प्रसन्न
वाटला . आता ती तशी मुंबईच्या वातावरणात रुळू लागली होती . काळाच्या ओघात माणसाला
कसलीही सवय होते - एकटेपणा , गर्दी, धक्काबुक्की .
रोजच्या ९. ४२
फास्ट पेक्षा आजच्या १०. ४८ फास्ट मधली वेगळी गर्दी , नवीन अपरिचित चेहरे .
``फक्त शंभर रुपये मॅडम, मला माझ्या गोव्याच्या घरी जायला फक्त शंभर
रुपये हवेत ''
त्या माणसानी
अर्थात तिला ओळखले नव्हते । कदाचित एवढ्या गर्दीत रोज अनेकांची फसवणूक करून चेहरे
लक्षात ठेवणे कठीण जात असेल .
लताचे डोळे
पाण्यानी डबडबले . तिनी पर्स उघडली .
काही क्षणातच विनोदला
लिहिलेल्या दोन्ही उत्तरांचे चिटोरे खिडकी बाहेर वाऱ्यावर भिरभिरत होते.
I dont have words. You are a true writer. Time pass म्हणून लिहिणाऱ्या तथाकथीत लेखकांच्या फुटकळ लिखाणापेक्षा हे खूप छान, मनाच्या गाभ्यातून, नेमक्या शब्दात, नेमक्या प्रसंगात, perfect सुरुवात, perfect शेवट .... कीर्ती हे दैवी देणगी आहे. Keep writing.
ReplyDelete