Tuesday, 22 January 2013

मुंबईत स्त्रिया सुरक्षित ?

डिसेंबर २०१२ च्या अखेरीस, नविन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहाची धुंदी जनमानसांच्या डोळ्यांवर चढत असतानाच एका विदारक घटनेने सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घातले. तिळमात्रही माणुसकी शिल्लक न उरल्याचा पुरावा देणारी राजधानी दिल्लीत घडलेली घटना – सहा नराधमांनी एका तरुणीवर सामुहीक बलात्कार करून तशाच अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. या घटने नंतर देशभर संतापाची लाट उसळली, आंदोलने झाली, प्रसार माध्यमांनी सर्वभर स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बातम्यांना पहिल्या पानाचे स्थान दिले; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कायद्यात आवश्यक ते बदल तात्कळ करण्याच्या मागणीने जोर धरला.
एकंदरीतच, या घटनेनंतर स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बराच चर्चीला गेला. या दरम्यान गेल्या काही वर्षांतील देशभरातील बलात्काराच्या घटनांची राज्यांगणीत आकडेवारी सादर करण्यात आली व कुठले राज्य अथवा शहर यात अग्रणी वगैरे चर्चिले गेले. दिल्लीत बलात्काराच्या घटना वरचेवर राजरोस होतच असतात ( कदाचित् म्हणुनच टिकेची झोड उठून अंगाशी य़ेईपर्यंत दिल्लीतील राजकीय नेते मुग गिळून बसले होते) त्या मानाने मुंबईत अशा घटना कमी प्रमाणात घडत असल्यामुळे मुंबईत स्त्रियांना सुरक्षित वाटते असा दिलासादायक सुरही काही चर्चांमधे निघाला. पण मुळात प्रश्ण असा की, स्त्रियांची सुरक्षितता घडणा-या घटनांच्या टक्केवारीच्या मोजपट्टीवर ठरवायची का ?
आज रात्री अपरात्री एकटयाने प्रवास करताना स्त्री जीव मुठीत घेऊन असते का ?  घराबाहेर पडलेल्या मुलींच्या सुरक्षेबाबत घरातील इतर लोक चिंतीत असतात का ? गर्दीतुन चालताना अथवा बस वा ट्रेनमधे ओंगळ स्पर्श होतात का ? अचकट विचकट शेरे रस्त्यानी जाताना ऐकावे लागतात का? बस अथवा ट्रेन मधला सह्प्रवासी घाणेरड्या नजरेने टक लावुन बघतो का ? कामाच्या ठिकाणी एखादा सहचारी लोचटपणा करतो का ? काही घरांमधे स्त्रियांची पिळवणुक, मारहाण होते का ? जो पर्यंत या सर्व प्रश्णांची उत्तरे `होय अशिच आहेत तो पर्यंत स्त्री सुरक्षित नाही कारण अशी वागणारी सर्व मंडळी ही बलात्का-याची मानसिकता असलेल्या गटात मोडतात (आणि अवती भोवती अशा मंडळिंचाच सुकाळ असतो). अशी मंडळी केवळ योग्य संधी न मिळाल्यामुळे अथवा अंगात तेवढे धारीष्ठय नसल्यामुळे प्रत्यक्ष बलात्कार ( कायद्याच्या व्याख्ये प्रमाणे ) करत नाहीत परंतु वरीलपैकी कोणतेही कृत्य स्त्रीच्या मनाविरूद्ध करून तिला संकोचित करणे हा ही एक मानसिक बलात्कारच असतो व अशा प्रसंगांना स्त्रियांना वरचेवर तोंड द्यावे लागते. 
स्त्री ही पूर्वी सुरक्षित नव्हती व आता ही नाही. जे अनुभव आताच्या स्त्रीयांच्या वाटेला येत आहेत तशाच प्रकारच्या अनुभवांना आगोदरच्या पिढीतील स्त्रियांनीही तोंड दिले आहे. गेल्या काही वर्षांतील आपला प्रगतीचा व साक्षरतेचा उंचावणारा आलेख पाहून आपण सुखावतो पण स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या वाचल्यावर जाणवतं की आपली प्रगती केवळ वरवरची व शिक्षण साक्षरतेपुरतंच सिमित आहे. दृष्टिकोन, मानसिकता बदलणारे शिक्षण दिलेलेच नाही. म्हणुनच घराघरांतील स्त्रियांवरचे अत्याचार अजुनही थांबले नाहीत.
स्त्रियांना सुरक्षितता देण्यासाठी कडक व तात्काळ अवलंबिल्या जाणा-या कायद्यांची आवश्यकता आहेच त्यामुळे काही प्रमाणात धाक व अंकुश रहातो जसा शिवाजी महाराजांच्या काळात होता अथवा मुस्लिम राष्ट्रांत आजही आहे. पण त्याही पलीकडे जाऊन गरज आहे मानसिकता बदलण्याची. बलात्कार नेहमी लैंगिक वासनेमुळेच होतात असे नाही. बरेचदा बलात्कार वचपा काढण्यासाठी, पुरुषी अहंकार जपण्याचे एक अंतीम व प्रभावी अस्त्र म्हणुन केले जातात. म्हणुनच समाजमनात वर्षानुवर्ष खोलवर रुजलेले काही विचार बदलणे गरजेचे आहे.
युगानुयुगांपासुन दृढ असलेला विचार म्हणजे स्त्री ही उपभोगाची वस्तु असून तिला स्वतंत्र अस्तित्व नाही, पुरुषाचा स्त्रीवर पूर्ण अधिकार असुन तो तिला कशीही वापरू शकतो. आजही ब-याच घरांमधे मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो, स्त्रियांकडुन सहनशिलतेची म्हणजेच पुरुषी वर्चस्वाला शरण जाण्याची, अन्याय सहन करण्याची अपेक्षा केली जाते. स्त्री ही स्वतंत्र विचार, मते, संवेदना असलेली व्यक्ती असून तिच्या विचारांचा, मतांचा, मनाचा आदर केला गेलाच पाहिजे ही मानसिकता सर्वदूर तळागाळापर्यंत रुजणे गरजेचे आहे. जेव्हा हे होईल तेव्हाच स्त्री ही उपभोगाची वस्तू व तिचा विरोध म्हणजे पुरूषी अहंकार दुखावणे ही मानसिकता बदलून काही प्रमाणात तरी अत्याचार कमी होतील.
स्त्रीच्या अब्रुविषयीचा विचार बदलणे ही गरजेचे आहे. स्त्रिची अब्रु परमोच्च महत्वाची यात वाद नाहीच पण जर कधी अब्रुवर घाला आलाच तर त्यामुळे ती जिवनातुन उठली वगैरे विचारधारा बदलायला हवी. हा एक इतर अपघातां सारखाच अपघात आहे हे जाणुन घरातील व समाजातील इतरांनी तिला टाकुन न देता, दूषण न देता आधार देऊन खमकेपणाने उभे रहाण्यास, गरज पडल्यास लढण्यासाठी सर्व मदत करण्याची गरज आहे.
तिसरी अतिशय घातक मानसिकता, असं काही आपल्या बाबतीत घडणारच नाही व इतरांच्या बाबतीत घडलं त्याचं आपलं देण घेण नाही, नसत्या फंदात प़डा कशाला. (कदाचित् म्हणुनच दिल्लीतील त्या तरुणीच्या अंगावर हातभर कपडा टाकायलाही कुणी पुढे आले नाही.) जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होताना दिसतो तेव्हा तो आपल्यावर अथवा आपल्या जवळच्या कुणा स्त्रीवर होऊ शकतो हा विचार करून घडणा-या गोष्टीकडे काणाडोळा न करता मदत करून अद्दल घडवल्यास काही प्रमाणात जरब बसु शकते.
अर्थातच या सर्वांच्या जोडीला एक प्रामाणिक, तत्पर व प्रभावी शासन यंत्रणा हवीच कारण बरेचदा असे उपद्रव समाजकंटकांकडून अथवा स्थानिक राजकारण्यांकडूनच होत असतात व त्यांना घाबरून सामान्य माणसे इच्छा असून मदतीला धजावत नाहीत.
कदाचित् विधवांचा उद्धार करून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी वा स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडणा-यांपासून वाचविण्यासाठी जसे व्यापक प्रयत्न त्या काळच्या समाजसुधारकांनी केले तशी व्यापक चळवळ उभी राहील्याशिवाय अत्याचारांना आळा बसणार नाही व स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्ण वारंवार ऐरणीवर येतच रहाणार व तो पर्यंत मुंबईच नव्हे, कुठेच स्त्रिला सुरक्षित वाटणार नाही.    

1 comment:

  1. "असं काही आपल्या बाबतीत घडणारच नाही व इतरांच्या बाबतीत घडलं त्याचं आपलं देण घेण नाही, नसत्या फंदात प़डा कशाला"
    ही मानसीकता बदलणे फार कठीण आहे.

    आपल्याला भगतसिंग, विवेकानंद हवेत. आपल्याला राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा हव्यात. पण त्यांचा जन्म शेजारच्या घरात व्हायला हवा. आपल्या घरात engineer, doctors असेच हवेत. ही मानसीकता पण बदलण्याची गरज आहे... शक्य आहे?

    पण तू कळीचा मुद्दा उचलला आहेस. खूप छान_! हे जास्तीत जास्त लोकांनी वाचायला हवे.

    SSS

    ReplyDelete