Tuesday, 4 December 2012

निमित्त सह्याद्रिच्या चाळिशीचे

२ ऑक्टोबर १९७२ रोजी राष्ट्रपित्याच्या जयंतिचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शनने पहिला कार्यक्रम सादर केला. आठ मिनीटे उशिराने सुरू झालेला हा कार्यक्रम अनेक अडचणिंवर मात करत पार पडला. तेव्हा पासून गेली ४० वर्षे अनेक व्यत्यय पार करत त्या वेळच्या निर्मात्यांनी अनेक दर्जेदार मनोरंजक व ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून एक पिढी सुसंस्कारीत केली. ४० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने `लोकमानस मध्ये त्यावेळी मुंबई दूरदर्शनवर शिलेदार व शिल्पकार अशी दुहेरी भुमिका पार पाडलेल्या नामवंत दिग्गज मंडळींच्या मुलाखतिचा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. डॉ. विश्वास मेहेंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अरविंद मर्चंट, अशोक डुंबरे, विजया जोगळेकर-धुमाळे, डॉ. किरण चित्रे, सुधीर गाडगिळ, प्रदीप भिडे, निना राऊत, तसेच पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ डि. एस्. एल्. प्रसाद व के. एल्. सोमनाथ यांच्या गप्पांतून अनेक पूर्वस्मृतिंना उजाळा मिळाला.
आजही गज-याचा सुगंध स्मृतिमधे दरवळतो. `प्रतिभा आणि प्रतिमा द्वारे भेटलेली अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व, याकुब सईद- बबन प्रभू जोडगोळीचे निखळ विनोद विसरुच शकत नाही. युवादर्शन, शब्दांच्या पलिकडले, अभिरुचिसंपन्न मनोरंजनात्मक मालिका असे अनेक ठसे य़ा मंडळिंनी आपल्या कामाद्वारे उमटवले. दुरदर्शन हे केवळ entertainment चे माध्यम नसुन education, information  entertainment यांचा सुरेख संगम आहे याचे भान ठेवुन हे दृकश्राव्य माध्यम कसे वापरावे याचे पायंडे या मंडळींनी घातले. म्हणुनच ज्ञानदिप, अक्षरधारा, आमची माती आमची माणसं सारखे कार्यक्रमही ग्रामिण तसेच शहरी भागांतही लोकप्रिय होते. अनेक असुविधा, अप्रगत तंत्रज्ञान यांतुन मार्ग काढत, विचारमंथनाला कष्टांची जोड देऊन अनेक रत्ने यांनी भेट दिली व एक पिढी घडवली.
गप्पांच्या ओघात उलगडलेले य़ांच्या व्यक्तिमत्वाचे पैलु त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणित करून गेले. `आम्ही दूरदर्शनच्या पडद्यावर आणुन कलाकारांना मोठे केले नाही ते मोठे होतेच त्यांनी दूरदर्शनला मोठे केले हा चासकरांचा विनम्रपणा; `इतर चांगल्या पगाराच्या नोक-या सोडून इथे काम केले कारण इथल काम अधीक समाधान द्यायचं यातुन दिसणार डॉ. चित्रेंच कामावरचं प्रेम; आणि `त्या वेळेला आम्ही इथेच असायचो; घरदार जणु नव्हतच आणि आमच्यात एकमेकांशी स्पर्धा नव्हती तर एकत्र काम करण्याची वृत्ती होती या विजया जोगळेकर धुमाळेंच्या विधानातुन दिसणारी झोकुन देउन काम करण्याची वृत्ती, टिमवर्क व खिलाडुपणा मनाला स्पर्शुन गेले आणि उमगलं त्यांच्या यशाचं रहस्य.
डॉ. मेहेंदळेंचे `या मिडियाला retention value नाही हे विधान फारसे पटले नाही. तसं असतं तर एवढे कार्यक्रम चीरस्मरणात राहीले नसते. आज वानवा आहे तेवढे अभिरुचीसंपन्न कार्यक्रम करणा-यांची ( `नक्षत्रांचे देणे सारखा एखादा अपवाद ).टीआरपी व व्यावसायिक गणितांचं कारण दाखवत सगळं सवंग, दर्जाहीन काम खपवल जातं. विजयाताई म्हणाल्या तसं, `आजही करण्यासारखं खुप आहे इतर वाहिन्यांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग परत आणणं शक्य आहे; हा सकारात्मक विचार आशा पल्लवित करून गेला.

No comments:

Post a Comment