८.१२.२०१२, मुंबई
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब र्जन्यालिझमच्या आजच्या सत्रात भारत4इंडिया.कॉम चे प्रमोटर मंदार फणसे यांची भेट झाली. तेरा वर्षे टि. व्ही पत्रकारीतेच्या विविध अंगांचा अनुभव घेतल्यावर मंदार फणसे यांनी, सॉफ्टवेअर क्षेत्रातील त्यांच्या अनुभवी मित्राच्या जोडीने भारत4इंडिया.कॉम हा आगळा वेगळा संकल्प सोडला.
भारत4इंडीया.कॉम मागची भुमिका स्पष्ट करताना फणसे म्हणाले की, भारत व इंडीया ही आपल्या देशाची दोन विरुद्ध टोकं असली तरी ती एकमेकांना पुरक आहेत, हा विरोधाभास हेच कटु सत्य आहे तरीही पत्रकारीतेमधे ग्रामिण भागाला कमी प्राधान्य दिलं जातं. ग्रामिण भागातील घडामोडी, तिथे राबवल्या जाणा-या विविध योजना, शेतितील विविध प्रयोग, इ. अनेक गोष्टींना एक व्यासपिठ देऊन त्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी भारत4इंडीया.कॉम ची कल्पना आकारास आल्याचं ते म्हणाले. भारत4इंडिया हिच टॅग लाईन असुन `ब्रेकिंगच्या पलीकडे’ ही आपली भुमिका असेल असेही ते म्हणाले.
गावोगावी स्मार्ट फोन व टॅब्ज् पोहोचले असुन त्या द्वारे विज कपातिच्या काळात लोकं या संकेत स्थळावरचे व्हिडीओ बघतिल असा विश्वास फणसेंना वाटतो. भारत4इंडीया.कॉम च्या उपयुक्ततेच्या दृष्टिने यात ग्रामिण कला, संस्कृती, कृषि विषयक नविन प्रयोग व तंत्रज्ञान यांची माहिती, परदेशी विद्यापिठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्या संबंधी मार्गदर्शन इत्यादी गोष्टिंचा अंतर्भाव असेल. पिकपाण्याची माहिती कमॉडिटी बाजारात सुसुत्रता आणेल तर प्रती किलोत दिलेले बाजार भाव शहरी ग्राहकांना दलालांच्या नफेखोरी बाबत जागृत करतील अशी आशा फणसेंना वाटते.
तंत्रज्ञानाच्या दृष्टिने हे संकेतस्थळ प्रगत असुन अमेरीकेतुन अद्यावत तंत्रज्ञान शिकुन आलेली टीम यावर काम करत असून सर्व प्रकारच्या फोन व ब्राउजर्स वर ते पाहता येईल. वेबकास्टिंग हे या संकेत स्थळाचं वैशिष्ठ्य असुन प्रत्यक्ष व संकेतस्थळावर प्रक्षेपण य़ात केवळ ७ सेकंदांची तफावत असल्याचे फणसे य़ांनी सांगितले. प्रसिद्धीपराङमुख राहुन शांतपणे आपल्या क्षेत्रात काम करणारी दिग्गज मंडळी भारत4इंडीया.कॉम साठी ब्लॉग लिहिणार आहेत.
उत्पादनासाठी जाहिरातींवर अवलंबुन न रहाता इव्हेंट्स आयोजित करुन त्या द्वारे हे संकेत स्थळ चालवायला पैसा उभा केला जाईल अशीही माहिती फणसेंनी दिली. सद्धया या संकेत स्थळाची चाचणी चालु असुन लवकरच ते अधिकृतरित्या सर्वांसाठी उपलब्ध केले जाईल.
