Saturday, 24 November 2012

लहर

अचानकच अघटीत घडून जात
`का' हा प्रश्न सर्व व्यापुन उरतो
एकमेव उत्तर `नियती' हेच असतं
जर तर च्या विचार गुंत्यात
माणुस आपली अगतिकता अधोरेखित करत रहातो.

***********************************************************************************

बदल

बदल, अशाश्वत जगातील शाश्वत गोष्ट
नव्या पिढीचा जीवनमंत्र, सळसळत्या तारुण्याचा अमृतकुंभ

बदलाव स्वतःला, प्रवाहाशी मिळत जुळत घ्यायला
कधी बदलावा प्रवाह ही, नवी क्षितिज रेखाटायला.

बदला आचार, बदला विचार, आणि सर्व समाज
बदलू नका जीवनमुल्ये आणि आपली नाती.

***********************************************************************************

 माणुस आणि पक्षी

प्रत्येक चिमणीला एक चिमणा आवडतो,
प्रत्येक चिमण्याच्या मनात एक चिमणी भरते.
झटून दोघे घरकुल साकारतात,
भावी आयुष्याचे चित्र रेखाटतात.
पिल्लू दोघांना प्राणप्रिय असतं,
कारण ते दोन श्वासांचा एक श्वास असतं.

पिल्लाला नवीन आकाश दाखवण्यासाठी चिमणा चिमणी झटत रहातात
विस्तारीत क्षितिजा बरोबर दुराव्याचे पदर येतात,
कालची नाती रक्तापेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
उबदार घरटयात जीव कोंडतो,
पिलू घरटे सोडून जातो 
चिवचिवणारे घरटे छोटे उदास एकटे खायला उठते

माणसांपेक्षा पक्षी शहाणे.
पिलु उडायला शिकल्यावर आपणहुन घरटे मोडून टाकतात
माया, बंध, पाश यांचा चिरा स्वतःच उखडून टाकतात

संतांप्रमाणे पक्षी शिकवतात मार्ग खरा सुखाचा,
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय ठेवा मोकळा.

*********************************************************************************** 



Wednesday, 7 November 2012

चवीने खाणार त्याला झिल ओ झेस्ट देणार
खमंग, खुसखुशीत वॉफल कोन, त्यामधे थंडगार आइस्क्रीमचा गोल, त्यावर ड्रायफ्रुट, ठ्रुटिफ्रुटी, चोको चिप्स्ची पखरण आणि त्यावर खोवलेले चॉकलेटचे पिस ! नेहमी कप, कोन अथवा केक व ब्राउनी बरोबर खालले जाणारे आइस्र्कीम जरा वेगळ्या कल्पकतेने आपल्याला सादर केले तर त्याची लज्जत काय वाढते याचा अनुभव घ्यायला एकदा दादर शिवाजी पार्क येथिल `झिल ओ झेस्ट' ला एकदा भेट द्याच.
`सतत बदल व नाविन्य' हाच जीवन मंत्र जपणा-या तरूणाईला आकर्षित करण्यासाठी, वेगळ व नवीन काही देण्याचा प्रयत्न येथे दिसतो आणि हे वेगळेपण देणारे स्वतः तीन तरूणच – शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या फंदात न पडता धंद्यात पडणारे ! शेवटी जावे त्याच्या वंशा हेच खरे.
नुसत सादरीकरणात नाविन्य नसून काही हटके चविची आइस्क्रिमही येथे ऋतू प्रमाणे मिळतात. मे महिन्यात येऊन एकदा इथल फणसाचं अथवा ताडगोळ्याच आइस्क्रीम जरूर चाखा.
तरुणाईचा `कूल अँड कॅज्युअल' हा फंडाही इथे अंर्तगत सजावटीत जपलेला आढळतो. लाकडी ओंडक्यावर काच टाकून केलेली छोटी टेबलं आणि भोवताली बसायला छोटे ओंडके व जोडीला ईंग्लिश गाणी म्हणजे अड्डा जमायला एकदम कूल जागा.
आइस्क्रीम पचायला हलकं असल तरी इथल आइस्क्रीम खिशाला थोड जडच. उन्हाळ्यात जस रोज नाक्यावर जाउन कप अथवा कोनचा आस्वाद घेउन जीव शांत करतो तस इथे ऱोजच यायला परवडण जरा कठीणच. पण तरी इथल्या Thank you, bye and see you soon या प्रेमळ आगत्यपूर्ण निरोपाला लवकरच प्रतिसाद दिल्याशिवाय रहात नाही.

Saturday, 29 September 2012

जपानी रहस्य चीरतारूण्याचे
जपान मधे एक म्हण आहे `Your skin is the mirror  of your internal  organs ‘  खरच, जपानी स्त्रियांकडे पाहून हे अगदी तंतोतंत पटत कारण त्या शिडशिडीत, सुडौल म्हणजेच अगदी well maintained  तर असतातच पण याहून मोठं आश्चर्य म्हणजे  त्यांच्या वयाबाबतचे आपले अंदाज हमखास चुकतात. सहसा वाढत्या वयाबरोबर त्वचा निस्तेज, सुरकुतलेली दिसायला लागते पण जपानी स्त्रियांच्या चेह-यावर मात्र वाढत्या वयाचा मागमुस नसतो – एक सुरकुती नाही की डाग नाही. अगदी स्वच्छ, नितळ, तुकतुकीत त्वचा !  या मागे आहेत काही खास जपानी रहस्ये.
`त्वचेचा ओलावा – बाह्य तसेच अंतर्गत – कायम ठेवणं महत्वाचं. मी माझा चेहरा सतत ओलसर ठेवते आणि भरपूर राइस साके (rice sake)  पिते कोयोटो ओकुगावा यांनी त्यांच्या चीरतारूण्याचे रहस्य उलगडले. त्या ४८ वर्षांच्या आहेत यावर विश्वासच  बसत नाही.
साके म्हणजे तांदुळ, पाणि (शक्यतो विहिरीचे) आणि कोजी (एक प्रकारची बुरशी) यां पासून बनवलेले एक पेय. साके आंबवण्याची (fermentation) प्रक्रिया करून बनवत असल्यामुळे यात अल्कोहोल काही प्रमाणात असते. काही देशांत याला राईस वाईन म्हणतात पण साके बनवण्याची प्रक्रीया वाईन व बिअर पेक्षा वेगळी आहे. साकेचे उल्लेख जपान मध्ये ७१२ ए डी पासून सापडतात. साकेचा इतिहास, बनवण्याची विशिष्ठ पद्धत, अनेकविध फायदे, आस्वाद घेण्याच्या पद्धती इ. सगळच मोठं मनोरंजक आहे.
साके आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेच ( अनेक व्याधींवर साके उपयुक्त असल्याचा दावा आहे ) शिवाय ते ब जीवनसत्वयुक्त असल्यामुळे उत्तम सौंदर्यवर्धकही आहे. ब जीवनसत्व त्वचेचा पोत सुधारून त्वचेची आर्दता राखून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच साकेमधे भरपूर प्रमाणात अमिनो असिड असल्यामुळे ते अंटि एजिंगचेही काम करते. यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी व तरूण दिसते. फार पूर्वीपासून जपानी गेशा साकेचा उपयोग करत आल्या आहेत. मेकअप उतरवल्यावर त्या चेह-याला साके लावत.
`बाहेरून त्वचेला ब जिवनसत्वाचे पोषणही खूपच फायद्याचे ठरते. माझी आजी स्वतःच्या हातांनी कोजी बनवायची आणि तिच्या इतके मऊशार हात मी कुणाचेच पाहिले नाहीत साके कॅफे चालवणा-या ओकुगावा म्हणाल्या. म्हणूनच आज जपान मधे साके बुरो म्हणजेच साकेची आंघोळ खुपच लोकप्रिय आहे. त्यासाठी खास प्रकारची साके मिळते. तसेच मसाज करायला भाताची तुसं भरलेल्या कापडी थैल्याही मिळतात. षोडश वर्षिय बालेसारखी सुंदर त्वचा असलेली चाळिशीची नेमोटो युको रोज असा मसाज करते.
वाकामे (wakame) हे जपानी सौंदर्याचे आणखी एक रहस्य. माशांच्या जोडीला जपानी लोक त्यांच्या  सॅलड अथवा सुपामधे या सामुद्री वनस्पतीचा (sea weed) भरपूर प्रमाणात वापर करतात. यामुळे त्वचेचे U V Rays पासून रक्षण होते व त्वचा सुरकुतण्याच्या प्रक्रियेलाही आळा बसतो. तसेच यातील hyaluronic  असिडमुळे त्वचेची लवचिकता वाढून त्वचा दीर्घकाळ तरूण दिसते. ब-याच जपानी सौंदर्य प्रसाधनांमधे याचा वापर करतात.
जपानचा सुप्रसिद्ध ग्रीन टी सुद्धा सौंदर्य अबाधीत राखायला हातभार लावतो. यातील विशिष्ठ प्रकारचे अमिनो असिड शरीरातील तणाव वाढवणा-या संप्रेरकांना (harmones) नियंत्रणात ठेवून कोलोजिन फायबर्स सुस्थितीत ठेवते. यामुळेही त्वचा घट्ट, तुकतुकीत व तरूण दिसते. म्हणुनच आजकाल ग्रीन टीचे चेह-याला लावायचे लेपही बरेच लोकप्रिय होत आहेत.
एकंदरीतच जपानी लोक तारूण्य टिकवायला नैसर्गिक अन्नघटकांवरच भर देतात. आपणही आपल्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, लसूण, चिकन, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा भरपूर प्रमाणात वापर करून वाढत्या वयाला आळा घालूया.