नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला मैत्रीण भेटली; चांगलीच अपसेट आणि काळजीत होती .
झालं असं होतं की आदल्या रात्री तिची मुलीशी चर्चा चालली होती. मुलगी अलीकडेच
नोकरीला लागलेय - चांगली नामांकित कंपनी, गलेलठ्ठ पगाराचा आयटी जॉब ! पहिल्या नोकरीचे नवेनवे दिवस त्यामुळे रात्री रोज
आल्यावर गप्पा, चर्चा साहजिकच .
``आता तुला माहितेय आपल्यालाही नवीन नवीन नोकरीत नवखे असताना नाही का काही त्रास,
मनःस्ताप व्हायचे ? लोक कशी फशी पाडतात. जीव आपला तुटतो म्हणून जरा सल्ला दिला
- माणसांच्या दिसण्यावर आणि वरवरच्या बोलण्यावर जायचं नाही; बोलतात एक आणि करतात एक, राजकारण बरच चालतं वगैरे - तर ही एकदम चिडलीच.
मला काही समजत नाही का ? मला बावळट समजलीस का ? आणि कहर म्हणजे आता या पुढे मी तुला कधीच काही सांगणार नाही
म्हणून रागाने तिच्या खोलीत निघून गेली.''
तशी ती काही उठसूट सल्ले देणारी, प्रत्येक गोष्टीत दखल घेणारी,
सतत लक्ष्य ठेवणारी आई नव्हती. किंबहुना
तिच्याच मुलींच्या व त्यांच्या मित्रपरिवारांच्या शब्दात ती एकदम `कूल मॉम ' , मैत्रिणी सारखीच !
``काळजात असं चर्रर्र झालं सांगू. कसं गं वागायचं या मुलांशी ?''
मैत्रिणीची कळकळ आणि काळजी दोन्ही साहजिकच होतं; विशेषतः नुकत्याच घडलेल्या पार्श्वभूमीवर.
दोनच दिवसांपूर्वी उच्च शिक्षित, सधन, सुजाण, संस्कारी, जबाबदार पालकांच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी
आत्महत्येचा निष्कर्ष काढण्यात आला (
कदाचित घातपात अथवा अपघात असू शकतो - असल्यास दुर्दैव ) आणि सर्वत्र खळबळ माजली.
सामाजिक माध्यमांवर या घटनेची कारणमीमांसा करणारे लेख शेअर केले जाऊ लागले. विशेष भर पालकांकडे मुलांसाठी वेळ नसण्यावर, मुलांच्या एकाकीपणावर. सर्वाला पालकच
जबाबदार ! मुलं असमंजस, आततायी, असंयमी, आत्मकेंद्री असली तरी चूक पालकांचीच ! शेवटी मुलंच पालकांचं प्रगतीपुस्तक !
खरंच आज पालकत्वाची परीक्षा देणं भारीच कठीण झालंय. पूर्ण संभ्रमात टाकणारा
आणि कधी कधी तर अगदी सुन्न करणारा प्रश्न ! कारण निकषच
कळेनासे झालेत. नक्की काय हवंय आणि कुठे कमी पडलो हेच कळत नाही. अचानक धक्कादायक
निकाल समोर येतो - एखादे जिव्हाग्री लागणारे बोल, अबोला, घर सोडून जाणे, काहीच न सांगता घेतलेला घटस्फोटासारखा टोकाचा
निर्णय, तर कधी आत्महत्या ! आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही
अनाकलनीय कारणास्तव सुसंवादाच्या पुलाचे बांधकाम कच्चे अथवा अर्धवट होते हे वास्तव
स्वीकारण्याची पाळी पालकांवर येते.
आपणच अगदी प्रेमाने वाढवलेलं मुल आपल्याशी मनमोकळं बोलू शकत नाही, तेव्हढे आपण त्याला आपलं वाटत नाही हे विष
पचवणे किती कठीण आहे. याही पुढे जाऊन चांगलं खेळतं बोलतं मोकळेपणानी वागणारे मुलं
वास्तविकतः मनात काही ठेवून होतं आणि मित्रत्वाने सगळं `शेअर ' करण्याचा बहाणा
करत होतं हे तर किती भयंकर हादरवून टाकणारं.
आज घराघरात प्रत्येक सुजाण पालकाची झोप उडाली, प्रत्येकाला आज एकच प्रश्न भेडसावतोय - खरंच आपलं मुल
आपल्याला मित्र, जवळचं मानतय का ? आपण कुठे कमी पडतोय का ? आपल्या मुलातही कुठे `मन्मथ ' दडलाय का ?
No comments:
Post a Comment