Saturday, 8 December 2012

भारत 4 इंडिया.कॉम

८.१२.२०१२, मुंबई
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब र्जन्यालिझमच्या आजच्या सत्रात भारत4इंडिया.कॉम चे प्रमोटर मंदार फणसे यांची भेट झाली. तेरा वर्षे टि. व्ही पत्रकारीतेच्या विविध अंगांचा अनुभव घेतल्यावर मंदार फणसे यांनी, सॉफ्टवेअर क्षेत्रातील त्यांच्या अनुभवी मित्राच्या जोडीने भारत4इंडिया.कॉम हा आगळा वेगळा संकल्प सोडला.  
भारत4इंडीया.कॉम मागची भुमिका स्पष्ट करताना फणसे म्हणाले की, भारत व इंडीया ही आपल्या देशाची दोन विरुद्ध टोकं असली तरी ती एकमेकांना पुरक आहेत, हा विरोधाभास हेच कटु सत्य आहे तरीही पत्रकारीतेमधे ग्रामिण भागाला कमी प्राधान्य दिलं जातं. ग्रामिण भागातील घडामोडी, तिथे राबवल्या जाणा-या विविध योजना, शेतितील विविध प्रयोग, इ. अनेक गोष्टींना एक व्यासपिठ देऊन त्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी भारत4इंडीया.कॉम ची कल्पना आकारास आल्याचं ते म्हणाले. भारत4इंडिया हिच टॅग लाईन असुन `ब्रेकिंगच्या पलीकडे ही आपली भुमिका असेल असेही ते म्हणाले.
गावोगावी स्मार्ट फोन व टॅब्ज् पोहोचले असुन त्या द्वारे विज कपातिच्या काळात लोकं या संकेत स्थळावरचे व्हिडीओ बघतिल असा विश्वास फणसेंना वाटतो. भारत4इंडीया.कॉम च्या उपयुक्ततेच्या दृष्टिने यात ग्रामिण कला, संस्कृती, कृषि विषयक नविन प्रयोग व तंत्रज्ञान यांची माहिती, परदेशी विद्यापिठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्या संबंधी मार्गदर्शन इत्यादी गोष्टिंचा अंतर्भाव असेल. पिकपाण्याची माहिती कमॉडिटी बाजारात सुसुत्रता आणेल तर प्रती किलोत दिलेले बाजार भाव शहरी ग्राहकांना दलालांच्या नफेखोरी बाबत जागृत करतील अशी आशा फणसेंना वाटते.
तंत्रज्ञानाच्या दृष्टिने हे संकेतस्थळ प्रगत असुन अमेरीकेतुन अद्यावत तंत्रज्ञान शिकुन आलेली टीम यावर काम करत असून सर्व प्रकारच्या फोन व ब्राउजर्स वर ते पाहता येईल. वेबकास्टिंग हे या संकेत स्थळाचं वैशिष्ठ्य असुन प्रत्यक्ष व संकेतस्थळावर प्रक्षेपण य़ात केवळ ७ सेकंदांची तफावत असल्याचे फणसे य़ांनी सांगितले. प्रसिद्धीपराङमुख राहुन शांतपणे आपल्या क्षेत्रात काम करणारी दिग्गज मंडळी भारत4इंडीया.कॉम साठी ब्लॉग लिहिणार आहेत.
उत्पादनासाठी जाहिरातींवर अवलंबुन न रहाता इव्हेंट्स आयोजित करुन त्या द्वारे हे संकेत स्थळ चालवायला पैसा उभा केला जाईल अशीही माहिती फणसेंनी दिली. सद्धया या संकेत स्थळाची चाचणी चालु असुन लवकरच ते अधिकृतरित्या सर्वांसाठी उपलब्ध केले जाईल.  

Tuesday, 4 December 2012

निमित्त सह्याद्रिच्या चाळिशीचे

२ ऑक्टोबर १९७२ रोजी राष्ट्रपित्याच्या जयंतिचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शनने पहिला कार्यक्रम सादर केला. आठ मिनीटे उशिराने सुरू झालेला हा कार्यक्रम अनेक अडचणिंवर मात करत पार पडला. तेव्हा पासून गेली ४० वर्षे अनेक व्यत्यय पार करत त्या वेळच्या निर्मात्यांनी अनेक दर्जेदार मनोरंजक व ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून एक पिढी सुसंस्कारीत केली. ४० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने `लोकमानस मध्ये त्यावेळी मुंबई दूरदर्शनवर शिलेदार व शिल्पकार अशी दुहेरी भुमिका पार पाडलेल्या नामवंत दिग्गज मंडळींच्या मुलाखतिचा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. डॉ. विश्वास मेहेंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अरविंद मर्चंट, अशोक डुंबरे, विजया जोगळेकर-धुमाळे, डॉ. किरण चित्रे, सुधीर गाडगिळ, प्रदीप भिडे, निना राऊत, तसेच पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ डि. एस्. एल्. प्रसाद व के. एल्. सोमनाथ यांच्या गप्पांतून अनेक पूर्वस्मृतिंना उजाळा मिळाला.
आजही गज-याचा सुगंध स्मृतिमधे दरवळतो. `प्रतिभा आणि प्रतिमा द्वारे भेटलेली अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व, याकुब सईद- बबन प्रभू जोडगोळीचे निखळ विनोद विसरुच शकत नाही. युवादर्शन, शब्दांच्या पलिकडले, अभिरुचिसंपन्न मनोरंजनात्मक मालिका असे अनेक ठसे य़ा मंडळिंनी आपल्या कामाद्वारे उमटवले. दुरदर्शन हे केवळ entertainment चे माध्यम नसुन education, information  entertainment यांचा सुरेख संगम आहे याचे भान ठेवुन हे दृकश्राव्य माध्यम कसे वापरावे याचे पायंडे या मंडळींनी घातले. म्हणुनच ज्ञानदिप, अक्षरधारा, आमची माती आमची माणसं सारखे कार्यक्रमही ग्रामिण तसेच शहरी भागांतही लोकप्रिय होते. अनेक असुविधा, अप्रगत तंत्रज्ञान यांतुन मार्ग काढत, विचारमंथनाला कष्टांची जोड देऊन अनेक रत्ने यांनी भेट दिली व एक पिढी घडवली.
गप्पांच्या ओघात उलगडलेले य़ांच्या व्यक्तिमत्वाचे पैलु त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणित करून गेले. `आम्ही दूरदर्शनच्या पडद्यावर आणुन कलाकारांना मोठे केले नाही ते मोठे होतेच त्यांनी दूरदर्शनला मोठे केले हा चासकरांचा विनम्रपणा; `इतर चांगल्या पगाराच्या नोक-या सोडून इथे काम केले कारण इथल काम अधीक समाधान द्यायचं यातुन दिसणार डॉ. चित्रेंच कामावरचं प्रेम; आणि `त्या वेळेला आम्ही इथेच असायचो; घरदार जणु नव्हतच आणि आमच्यात एकमेकांशी स्पर्धा नव्हती तर एकत्र काम करण्याची वृत्ती होती या विजया जोगळेकर धुमाळेंच्या विधानातुन दिसणारी झोकुन देउन काम करण्याची वृत्ती, टिमवर्क व खिलाडुपणा मनाला स्पर्शुन गेले आणि उमगलं त्यांच्या यशाचं रहस्य.
डॉ. मेहेंदळेंचे `या मिडियाला retention value नाही हे विधान फारसे पटले नाही. तसं असतं तर एवढे कार्यक्रम चीरस्मरणात राहीले नसते. आज वानवा आहे तेवढे अभिरुचीसंपन्न कार्यक्रम करणा-यांची ( `नक्षत्रांचे देणे सारखा एखादा अपवाद ).टीआरपी व व्यावसायिक गणितांचं कारण दाखवत सगळं सवंग, दर्जाहीन काम खपवल जातं. विजयाताई म्हणाल्या तसं, `आजही करण्यासारखं खुप आहे इतर वाहिन्यांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग परत आणणं शक्य आहे; हा सकारात्मक विचार आशा पल्लवित करून गेला.