गार्लिक आईस क्रीम
लसूण आणि
आईस्क्रीम ! कॉम्बिनेशन ऐकून चक्रावलात ? माझं हि असच झालं; पण छान लागतं; साध्या व्हाईट वॅनिला किंवा हनी क्रीमि आईस
क्रीमला किंचितसा गार्लिक फ्लेवर मस्त वाटतो आणि
या इंनोव्हेशनची दाद देणे प्राप्त होत.
सॅन होसे ते योसेमिटी नॅशनल पार्कला जाताना वाटेत गिलरॉय लागले. अमेरिकेतील
कॅलिफोर्निया स्टेटमधील सांता क्लारा कॉउंटीमधील गिलरॉय हे एक शहर.`गार्लिक कॅपिटॉल ऑफ द वर्ल्ड ' ( Garlic Capital of the world) हि या
शहराची ओळख. अमेरिकेतील ५०% पेक्षा जास्त लसूण गिलरॉयच्या आसपासच्या
परिसरात पिकवले जाते आणि देशातील ९०% लसूण पिकावर येथे प्रक्रिया केली जाते. त्या मुळे या परिसरात लसणाचा सुगंध सर्वत्र जाणवतो. दरवर्षी आयोजित होणारा `गिलरॉय लसूण
महोत्सव' (
Gilroy Garlic Festival ) ही गिलरॉयची वेगळी ओळख. हा अन्न महोत्सव लसूणयुक्त नानाविध पदार्थांच्या
विस्तृत श्रेणीसाठी ओळखला जातो. इथे खवैयांसाठी
गार्लिक ब्रेड आणि गार्लिक फ्राईज सारख्या नेहमीच्या सर्वश्रुत पदार्थांपासून ते लसूण आइस्क्रीम आणि लसूणयुक्त
पेये अशा अनोख्या पदार्थांपर्यंत सर्व काही मिळते.
वाटेत रस्त्याच्या बाजूला छोटी दुकानं लागतात -
रोड साईड फ्रुट स्टँड्स . अशा एका दुकानाला भेट दिली असता लसणापासून बनवलेले
अनेकविध प्रकार पाहून थक्क व्हावे. लोणची, मसाले, सॉस, साल्सा, तेल, चीझ, चिप्स, ड्रायफ्रुटस, ब्रेडस, पेस्ट, पावडर या सर्वात प्रचंड व्हरायटी तर झालीच पण चक्क जेली, जॅम, कॅण्डी सुद्धा !
शिवाय वेगवेगळ्या रंगांचे - काळा, जांभळा, गुलाबी लसूण इथे
विकायला होते.
एका मसाल्याच्या पदार्थाचाही किती वैविध्यपूर्ण
उपयोग करू शकतो - फक्त प्रयोगशीलतेला कल्पकतेची जोड हवी !