जपानी रहस्य चीरतारूण्याचे
जपान मधे एक म्हण आहे `Your skin is the mirror of your internal organs ‘ खरच, जपानी स्त्रियांकडे पाहून हे अगदी तंतोतंत पटत कारण त्या शिडशिडीत, सुडौल म्हणजेच अगदी well maintained तर असतातच पण याहून मोठं आश्चर्य म्हणजे त्यांच्या वयाबाबतचे आपले अंदाज हमखास चुकतात. सहसा वाढत्या वयाबरोबर त्वचा निस्तेज, सुरकुतलेली दिसायला लागते पण जपानी स्त्रियांच्या चेह-यावर मात्र वाढत्या वयाचा मागमुस नसतो – एक सुरकुती नाही की डाग नाही. अगदी स्वच्छ, नितळ, तुकतुकीत त्वचा ! या मागे आहेत काही खास जपानी रहस्ये.
`त्वचेचा ओलावा – बाह्य तसेच अंतर्गत – कायम ठेवणं महत्वाचं. मी माझा चेहरा सतत ओलसर ठेवते आणि भरपूर राइस साके (rice sake) पिते ‘ कोयोटो ओकुगावा यांनी त्यांच्या चीरतारूण्याचे रहस्य उलगडले. त्या ४८ वर्षांच्या आहेत यावर विश्वासच बसत नाही.
साके म्हणजे तांदुळ, पाणि (शक्यतो विहिरीचे) आणि कोजी (एक प्रकारची बुरशी) यां पासून बनवलेले एक पेय. साके आंबवण्याची (fermentation) प्रक्रिया करून बनवत असल्यामुळे यात अल्कोहोल काही प्रमाणात असते. काही देशांत याला राईस वाईन म्हणतात पण साके बनवण्याची प्रक्रीया वाईन व बिअर पेक्षा वेगळी आहे. साकेचे उल्लेख जपान मध्ये ७१२ ए डी पासून सापडतात. साकेचा इतिहास, बनवण्याची विशिष्ठ पद्धत, अनेकविध फायदे, आस्वाद घेण्याच्या पद्धती इ. सगळच मोठं मनोरंजक आहे.
साके आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेच ( अनेक व्याधींवर साके उपयुक्त असल्याचा दावा आहे ) शिवाय ते ब जीवनसत्वयुक्त असल्यामुळे उत्तम सौंदर्यवर्धकही आहे. ब जीवनसत्व त्वचेचा पोत सुधारून त्वचेची आर्दता राखून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच साकेमधे भरपूर प्रमाणात अमिनो असिड असल्यामुळे ते अंटि एजिंगचेही काम करते. यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी व तरूण दिसते. फार पूर्वीपासून जपानी गेशा साकेचा उपयोग करत आल्या आहेत. मेकअप उतरवल्यावर त्या चेह-याला साके लावत.
`बाहेरून त्वचेला ब जिवनसत्वाचे पोषणही खूपच फायद्याचे ठरते. माझी आजी स्वतःच्या हातांनी कोजी बनवायची आणि तिच्या इतके मऊशार हात मी कुणाचेच पाहिले नाहीत’ साके कॅफे चालवणा-या ओकुगावा म्हणाल्या. म्हणूनच आज जपान मधे साके बुरो म्हणजेच साकेची आंघोळ खुपच लोकप्रिय आहे. त्यासाठी खास प्रकारची साके मिळते. तसेच मसाज करायला भाताची तुसं भरलेल्या कापडी थैल्याही मिळतात. षोडश वर्षिय बालेसारखी सुंदर त्वचा असलेली चाळिशीची नेमोटो युको रोज असा मसाज करते.
वाकामे (wakame) हे जपानी सौंदर्याचे आणखी एक रहस्य. माशांच्या जोडीला जपानी लोक त्यांच्या सॅलड अथवा सुपामधे या सामुद्री वनस्पतीचा (sea weed) भरपूर प्रमाणात वापर करतात. यामुळे त्वचेचे U V Rays पासून रक्षण होते व त्वचा सुरकुतण्याच्या प्रक्रियेलाही आळा बसतो. तसेच यातील hyaluronic असिडमुळे त्वचेची लवचिकता वाढून त्वचा दीर्घकाळ तरूण दिसते. ब-याच जपानी सौंदर्य प्रसाधनांमधे याचा वापर करतात.
जपानचा सुप्रसिद्ध ग्रीन टी सुद्धा सौंदर्य अबाधीत राखायला हातभार लावतो. यातील विशिष्ठ प्रकारचे अमिनो असिड शरीरातील तणाव वाढवणा-या संप्रेरकांना (harmones) नियंत्रणात ठेवून कोलोजिन फायबर्स सुस्थितीत ठेवते. यामुळेही त्वचा घट्ट, तुकतुकीत व तरूण दिसते. म्हणुनच आजकाल ग्रीन टीचे चेह-याला लावायचे लेपही बरेच लोकप्रिय होत आहेत.
एकंदरीतच जपानी लोक तारूण्य टिकवायला नैसर्गिक अन्नघटकांवरच भर देतात. आपणही आपल्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, लसूण, चिकन, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा भरपूर प्रमाणात वापर करून वाढत्या वयाला आळा घालूया.