Wednesday 29 April 2020



नयन मावशी

आयुष्यात अनेक माणसं भेटतात; नाना कारणे व प्रसंगांमुळे कायम मनात घर करून राहतात. कधी फावल्या वेळात सहज काही स्मृती जागृत होतात व ही  माणसे बुडबुड्या सारखी वर येतात. नयन मावशी ही यातलीच एक.
सत्तरीच्या दशकाच्या शेवटी मुंबईच्या उपनगरांमध्ये मोठ्या सोसायट्या व ब्लॉक संस्कृती रुजत होती. याच सुमारास आम्हीही वाड्यातून मोठ्या सोसायटीत राहायला आलो आणि योगायोग असा की आमच्याच वरती पहिल्या मजल्यावर आईची शालेय मैत्रीण पण राहायला आली. हीच माझी व नयन मावशीची पहिली ओळख. आईची शालेय मैत्रीण असल्यामुळे अर्थातच घसट वाढली. पण कुठचंही नातं स्नेहाच्या व मदतीच्या खतपाण्याशिवाय रुजत व फोफावत नाही आणि यात  नयन मावशीचा पुढाकार जास्त होता म्हणायला हरकत नाही.
नाव आणि रूप यांचा कसलाही मेळ नसलेलं हे व्यक्तिमत्व. कृश, शामल वर्णीय, कमी उंचीची , बारीक चणीची, डोळे आत खोबणीत गेलेले अशी ही  मूर्ती  कायम आनंदी आणि उत्साहीत असायची. कधी निराशा, मरगळ आजूबाजूला फिरकलेच नाही जणू. सकाळी धावतपळत गाडी गाठून नोकरीला जाणार; संध्याकाळी येताना बाजारहाट करून घरी येताना पण चेहरा हंसराच, कधी दमलेला नाहीच. एव्हडीशी कुडी हे सगळं कसं झेपते आणि ही एवढी ऊर्जा कुठून येते हा प्रश्न मला नेहमी पडायचा. शाळेत ती उत्तम खेळाडू होती त्यामुळेच असेल कदाचित.
बाह्य रूपाने एखाद्या खुरटलेल्या झाडाच्या फांदीसारखी दिसणारी नयन मावशी आतून मात्र केवडा होती; कायम सुगंधाने दरवळणारी; सतत सगळ्यांना मदत करणारी, कौतुक करणारी; कुजकटपणा, असूया अश्या नकारात्मक भावनांना तिच्या आयुष्यात थाराच नव्हता. आमचं घर तळाला असल्यामुळे पावसाळ्यात कधी जास्त पाऊस झाला की पाणि यायचं. अशावेळी नयन मावशी स्वतःच्या घरी येण्याचा आग्रह करायचीच  पण ऑफिसाला जाताना घराची चावीही देऊन जायची, निसंकोच कधीही घर वापरा म्हणून आणि यात उपकार वगैरे म्हटलेले कधीही आवडायचं नाही; उलट जणू मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असच समजायची.
सगळ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळेच कदाचित तिला एकदा मोठाच फटका बसला. पत्ता विचारण्याच्या निमित्ताने दोन भामट्यानी तिला भूल घालून मंगळसूत्र आणि बांगड्या लुबाडल्या. पाठोपाठच काका आजारी पडले आणि कालांतरानी निवर्तले. आगामी दग्याचा तो नियतीनी दिलेली ईशारा तर नव्हता ?
केवडा कोमेजला तरी सुगंध देत राहतो. नयन मावशीचा स्मृतिगंध कायम दरवळत राहील.

Wednesday 15 April 2020


                                                                                                    




घरपणाचं सुख
                                                                                 
                                                                                                                                                                
कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं; घरातच मला लॉकडाऊन केलं       
घरात मी निवांत बसले; अन घर माझे खुद्कन हसले
बैस निवांत कुशीत माझ्या; घे तर खरा पाहुणचार माझा
मोकळी हवा; निळं आकाश
पक्ष्यांची किलबिल; फुलांचा गंध
निरव शांतता; पर्णांची सळसळ
चांदणसडा; पहाट झुळूक
उपभोगायला सगळं असायचीस ना उत्सुक ?

शोधात जायचीस लांब दूरवर; चार दिवसांच्या खर्चीक टूरवर
सगळं इथेच उपभोगून घे; कुशीत माझ्या विसावून घे
सजवलंस मला उत्साहानी पण नाही उपभोगलस निवांतपणी
निवांतपणा हा उपभोगून घे; पाहुणचार माझा झोडून घे
कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं; घरपणाचं सुख मला दिलं.

Saturday 4 April 2020


करोना आणि मासे

१२ एप्रिलच्या लोकसत्ता बालमैफिलीत प्रकाशीत

(करोनाच्या पार्श्वभूमीवर सागरीजीवनात मारलेला काल्पनीक फेरफटका - हलका फुलका; अंतर्मुख करणारा)

मत्स्यनगरीत पापलेटबाई आजकाल काहीश्या संभ्रमित होत्या. अचानक अलीकडे जरा गर्दी वाढलेली वाटत होती. कालच मि. पापलेट त्रागा करत होते, `` आजकाल चांगले ऐसपैस पोहता येत नाही. पोरांना शिस्तीत पोहता येत नाही; सारखी मधेमधे येतात. अंग कसं आखडून गेल्यासारखं वाटतंय.''
सकाळचा फेरफटका पापलेटबाईंनी सुरमईअळीच्या अंगानी मारला तर तिथे पण नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटली. संध्याकाळी पापलेट भाऊंना घरी यायला जरा उशीरच झाला. कारण विचारलं तर म्हणे बोंबील कट्ट्यावर आज बरेचजण भेटले, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात वेळ गेला. अलीकडे मुलं एकसारखी तोंड वासून खायला मागत नव्हती. स्वतःच कोलंब्या गट्ट करून आपलं पोट भरत होती. हल्ली पाणिही कमी प्रदूषित वाटत होतं.
बराच विचार करूनही काही उमजेना तेव्हा त्यांनी थेट आपल्या भावाशी म्हणजेच हलव्याशी संवाद साधला. हलवाभाऊंनी बहिणीच्या निरीक्षणाला दुजोरा दिला, `` खरंय गं; आमच्याकडे पण अलीकडे गर्दी वाढलेय. शोध घ्यायला पाहिजे.''
रात्री पापलेटबाईंनी पापलेट भाऊंच्या कानावर आपला गोंधळ घातला. नेहमी प्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव आणला पण थोडे विचारात पडले. बाजूला पोरांच्या कंपूत जरा जास्त खुसखुस वाटल्यामुळे त्यांनीं पोरांना फटकारले.
सकाळपासून पोरं गायब असल्यामुळे पापलेटबाई सचिंत होत्या. पोरांचा शोध घेत फिरता फिरता त्यांना बांगडे वहिनी भेटल्या. त्याही मुलांचाच शोध घेत होत्या. ``हल्ली भारीच द्वाड झालेत मुलं ! काल पण अशीच बराच वेळ गायब होती. कुठे जातात कोण जाणे ,'' बांगडे वहिनी म्हणाल्या. आल्यावर खरपूस समाचार घ्यायला हवा या विचारावर दोघी सहमत होऊन निरोप घेणार तेवढ्यात मुलं उड्या मारत येताना दिसली. एखादं अडवेंचर करून आल्याच्या आनंदात उसळत तरंगत होती. खडसावून विचारल्यावर लांबवर किनार्याच्या दिशेकडे पोहून आल्याचं म्हणाली. पापलेट बाईंनी शेपटीनी पोरांना फटकारलं, ``किती वेळा सांगितलं तिथे जाऊ नका, माणसं पकडतात. तरी नाही ऐकायचं, नसते धंदे करतात,''
``पण काकू हल्ली तिथे कुणीच नसतं आम्ही रोजच जातो,'' इति बांगडे पिल्लावळ.
``हो, तिथे किती मजा आली. मी पाण्याच्या वर जाऊन आलो आणि वरचं निळंशार आकाश पण बघितलं, '' कावळटाच्या या चिवचिवटानी पापलेटबाई अधिकच संभ्रमित झाल्या.    
आता मात्र मत्स्य नगरीत हा एक चर्चेचा व चिंतनाचा विषय झाला. पापलेट भाऊंनी हलवा, सरंगा , बोंबील, बांगडा, घोळ, पाला ई सर्वांची मिटिंग भरवली. पापलेट भाऊंनी विषयाला हात घातला. ``आजकाल बोटी व माणसं कमी दिसतात खरी'' सरंग्यानी दुजोरा दिला. बहिणीशी हा विषय आधीच झाला असल्यामुळे हलवाभाऊ तयारीनिशी आले होते. त्यांनी आधीच खेकडे भाऊंना कामाला लावले होते. आजकाल खेकडेवाडीत माणसं खेकडे पकडायला येत नसल्याची, इतकेच नव्हे तर आजकाल समुद्र  किनारे सुद्धा ओस असतात त्यामुळे खेकड्यांची पोरं समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालू शकतात अशी ग्वाही खेकडे भाऊंनी दिली. माणसं अलीकडे कुणा सूक्ष्म जिवाणूच्या भीतीनं घरीच दडी मारून बसल्याची गोटातली खबर त्यांनी काढली होती. 
हे ऐकताच सर्व मत्स्य आयांचा जीव भांड्यात पडला; `` चला, सध्या तरी मुलांची काळजी नाही, जरा मोकळेपणानी पोहतील तरी.''
तेवढ्यात माश्यांची काही पोर तोंडात नवीनच काही धरून येताना दिसली. खेकड्यानी लगेच ते ओळखलं, ``आजकाल माणसं विषाणूच्या भितीनी तोंडाला हे बांधून फिरतात. समुद्रकिनारी अशी बरीच पडली होती''.
हे ऐकताच सर्वांच्या छातीत धडकी भरली
अरे बापरे ! म्हणजे माणसांमुळे येऊ घातलेलं हे आणखी एक संकट !


कीर्ति कुळकर्णी

०४. ०४. २०२०

Tuesday 31 July 2018

पुस्तक परीक्षण - काबूल ,कंदाहारकडील कथा


काबूल ,कंदाहारकडील कथा
                   - प्रतिभा रानडे

अफगाणिस्तानातील एकंदरीत राजकीय उलथापालथ व त्यात होरपळणारे नागरीक, विशेषतः स्त्रिया यांविषयी विविध माध्यमांतून ऐकून, वाचून आहोतच. त्यामुळेच    `अफगाणिस्तानातील रहिवाश्यांच्या जीवनातील व्यथा मांडणाऱ्या हृदयस्पर्शी कथा ' असं पुस्तकाच संक्षिप्त वर्णन वाचून पुस्तक विकत घेतलं. खरोखरीच केवळ या सात शब्दांत, नऊ कथा असलेल्या या कथासंग्रहाचा गाभा चपखल  मांडलाय. पार्श्वभूमी अफगाणिस्तान असल्यामुळे स्थानिक व आंतरराष्ट्रीय राजकीय संदर्भ येणारच. ही  पार्श्वभूमी नीट समजण्यासाठी थोडं गुगल करून अफगाणिस्तानच्या राजकीय घडामोडींची अधीक सुस्पष्टता आली ( अर्थात कथा समजण्यासाठी याची आवश्यकता नाही ) ही पण या पुस्तकाची जमेची बाजू.
माणसांची दुःख. भावनीक घालमेल, हुरहूर ही सर्व काळी व स्थळी सारखीच असतात असं आपण मानतो आणि अर्थात बरेचदा ती तशीच असतात पण जेव्हा ही दुःख त्या प्रांताच्या राजकीय उलथापालथी मुळे व त्या अनुषंगाने सामाजिक  शोषण व अत्याचारामुळे वाट्याला येतात तेव्हा या दुःखांची जातच वेगळी असते.
अमेरिकेत शिकलेला व देशाच्या नवनिर्माणासाठी काम करण्याच्या उद्देशाने परत आलेला, बदलाचे वारे वेगळ्याच दिशेनी वाहत असल्याच्या जाणिवेने प्रथम गोंधळला व नंतर हादरलेला व शेवटी राजकीय बदलानंतर स्वतःच्याच देशात परदेशी झालेला, सतत भीतीच्या सावटात जगणारा अन्वर सलीम सर्व स्तरातील लोकांच्या रोजच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतो.
उतार वयात नवरा दुसरी बायको आणेल या भितीनी तरुण दिसण्यासाठी ब्युटी पार्लरला आलेली मिसेस रहिमी व योगायोगाने त्याच पार्लर मध्ये आलेली तरुण , सुंदर, शिकलेली व मिसेस राहिमिच्याच नवऱ्याशी मनाविरुद्ध लग्न करायला भाग पडणारी झीनत; कुठलाही गुन्हा नसताना राज्यकर्त्यांनी तुरुंगात डांबून अत्याचार केलेली नुरजाद या तेथील समस्त स्त्रियांच दुःख अधोरेखीत करतात.
मुजाहिदींच्या हल्यात बळी गेलेल्या  हॉकीपटू बलबीर सिंगच्या निमित्ताने आंतराष्ट्रीय राजकारण व त्यापुढे कःपदार्थ ठरणारं वैयक्तिक नुकसान यावर पडणारा प्रकाशझोत अंतर्मुख करतो. लेखिका त्याही पुढे जाऊन कल्पनेच्या आधारे मृत बलबीर सिंगच्या आत्म्याची तडफड, बेवारश्यासारखे एका परकीय जमिनीत गाडलं  गेल्याचा   सल व पडणारे प्रश्न  मांडते व परदेशात  सतत भीतीच्या सावटात राहणाऱ्या सर्वांच्याच मनात खोलवर या शक्यता सतत तरळत असतात हे नमूद करून तेथील दशतवादाची तीव्रता जाणवून  देते .
`लिहायची राहून गेलेली एक कादंबरी ' हि या संग्रहातील एक वेगळी कथा. यात लेखिका कादंबरीसाठीअफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पार्शवभूमीवर  सुचलेला विषय, त्यासाठी केलेली तयारी, वाचन, अभ्यास, तेथील स्थळांना प्रत्यक्षात दिलेल्या भेटी , त्यातून आकाराला आलेली `शेवटचा माणूस ' ही  कथा यांचे सविस्तर वर्णन करते. यातून लेखिकेची चिकाटी, अभ्यासूवृत्ती, सच्चेपणा दिसतो.
एक वेगळा वाचनानंद देणारा हा कथासंग्रह अतिशय वाचनीय. 

Friday 26 January 2018

चाफा



Image result for images for all types of son chafa flowers


चाफा सर्व प्रथम भेटला लहानपणी अंगणात. अंगणातच देवचाफ्याचे झाड होते.  पूजेला त्याची फुलं आजी बरोबर तोडण्याचा रोजचा नेम होता.  छान झाडावरच ताज फुल तोडून त्याच्या पाकळ्या उलट्या बाजूला मुडपून देठात अडकवायच्या आणि मग ते फुल अंगठी म्हणून बोटात पकडायचे व अधूनमधून त्याचा सुगंधही घ्यायचा. बालपणीच्या साध्या  निर्भेळ आनंदातला तो एक ! 

कवठी चाफा गौरीच्या पूजेला पाहायला मिळायचा पण हिरवा चाफा मात्र त्यावेळी फक्त माणिक वर्मांच्या गाण्यात ऐकायला मिळायचा. पण एक दिवस अचानक ``लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का '' या ओळींचे प्रत्यंतर आले. झाले असे कि, साधारण बारा तेरा वर्षांची असताना बांद्राला मामीच्या माहेरी गेले असता त्यांच्या बंगल्यात घमघमाट सुटला होता. चौकशी करता कळले की पाठीमागच्या प्रचंड मोठ्या व दूरवर पसरलेल्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या चाफ्याचे झाड होते व त्यावर फुललेल्या फुलाचा सुगंध लांब बंगल्यात दरवळत होता. 

चाफ्याच्या सुगंधाची एक गंमत आहे. निदान माझ्या बाबतीत तरी हे होत. गुलाबाच्या फुलांचा वास आला की म्हणतो, ``व्वा गुलाबाचा वास छान आहे '' आणि अलगद तो हुंगतो.  रातराणी आणि मदनबाण तर धुंदच करतात. मोगरा छान फुललाय वास मस्त सुटलाय म्हणतो. पण चाफ्याची तऱ्हा ज़रा न्यारीच ! चाफ्याचा वास आला की प्रथम अनाहुतपणे चमकायलाच होत - अचानक खडबडून भानावर आल्यासारख आणि तोंडातून सहज आनंदोच्चार ओघळतात  - अरे व्वा चाफा ! जणू काही किती अवकाशानंतर भेंट झाली. गंमत म्हणजे प्रत्येक वेळेस  हेच होत.

अगर शायरी ना होती तो





Image result for images related to shayari kalam
अगर शायरी ना होती तो
दर्द ए दिल बया ना होता
हुस्न ए तारीफ़ लब्जों मे ना होती
जिने का बहाना ना होता
प्यार का इज़हार कैसे होता
दर्द बॉंटने का सुकून ना मिलता
महफ़िल के रंग ना जमते
दर्द ए यार दिल छू न जाता
जाम का नशा ना होता
आवाज़ मे दर्द का एहसास ना होता
आपके शायराने अंदाज से हम बेख़बर रहते

Tuesday 26 December 2017


२४.१२.२०१७


                           

राजस योग , रेशिमबंध
Related imageलगिनघाई, हास्यकल्लोल
वाटें जणू कालचेच सारे

हसत खेत दिवस गेले
बघता बघता वर्ष  सरले

कौतुक, आनंद, प्रेमाची उधळण 
असेच राहो भरजरी सहजिवन
                                                                                               
                                                                                      संसार होवो मोरपंखी सुंदर, आनंद अन सुखांच्या रंगांची उधळण 

                                                                                      प्रथम लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद
                                                                                      हा व सहजिवनाचा प्रत्येक दिवस आनंदी व अविस्मरणीय करा